युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय गुजरातमधील पोरबंदर इथून देशव्यापी समुद्र किनारे आणि चौपाटी स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करणार
Posted On:
01 OCT 2024 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2024
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय, उद्या गुजरातमधील पोरबंदर या ऐतिहासिक शहरातून ‘माय भारत’ द्वारे आयोजित देशव्यापी समुद्र किनारे आणि चौपाटी स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करतील. भारतातील समुद्र किनारे आणि चौपाट्या एकदाच वापरता येण्याजोग्या प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्त करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट असून, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत "स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता" या संकल्पनेवर आयोजित करण्यात आलेल्या "स्वच्छता ही सेवा" या मोहिमेचा कळसाध्याय ठरेल.
केंद्रीय मंत्री डॉ. मांडवीय, हे तरुणांच्या नेतृत्वाखालील पर्यावरण विषयक कृतीला प्रोत्साहन देण्यात अग्रेसर असून, महात्मा गांधी यांचे जन्मस्थान म्हणून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पोरबंदर शहरातून ते स्वच्छता मोहिमेची सुरुवात करतील. केंद्रीय मंत्र्यांचा सहभाग, पर्यावरण विषयक शाश्वत पद्धतींप्रति असलेली देशाची वचनबद्धता अधोरेखित करत असून, ही मोहीम स्वच्छ आणि एकल वापर प्लास्टिक मुक्त भारताचा दृष्टीकोन अधोरेखित करते.
युवा व्यवहार विभागा अंतर्गत, ‘माय भारत’ अभियानाने यंदाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेत सक्रिय भूमिका बजावली असून, स्वच्छता आणि पर्यावरण विषयक जबाबदारीचा पुरस्कार करण्यासाठी, युवा वर्गाच्या सक्रीय सहभागाला प्रोत्साहन दिले आहे. 2 ऑक्टोबर, 2024 रोजी स्वच्छ भारत दिनी या मोहिमेची सांगता होणार असून, यावेळी ‘माय भारत’ युवा स्वयंसेवकांच्या नेतृत्वाखाली देशभरात किनारपट्टी स्वच्छता मोहीम राबवली जाईल.
भारताच्या 7,500 किमी लांबीच्या किनारपट्टीवर 1,000 हून अधिक स्थळांवर ही मोहीम राबवली जाणार असून, यावेळी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचे संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाट यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. 1,00,000 हून अधिक माय भारत स्वयंसेवक या देशव्यापी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन, पर्यावरण विषयक शाश्वतता प्राप्त करण्यात सामूहिक कृतीचे असलेले बळ प्रदर्शित करतील.
केंद्रीय मंत्र्यांनी देशातील समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या सर्व जिल्ह्यांच्या खासदारांना पत्र लिहिले असून, त्यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
यंदाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेला यापूर्वीच प्रचंड यश मिळाले असून, 5.6 दशलक्ष पेक्षा जास्त माय भारत युवा स्वयंसेवकांनी सक्रियपणे राबवलेल्या मोहिमेत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत देशभरातल्या समुद्र किनार्यांवरून लाखो किलो कचरा गोळा केला आहे. देशातील 1 लाखाहून अधिक गावे, 15,000 हून अधिक सामुदायिक केंद्रे, 9,501 अमृत सरोवरे आणि विविध ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
हा उपक्रम, युवा वर्गाचे स्वच्छ भारत मिशनप्रति असलेले समर्पण प्रदर्शित करत असून, भावी पिढ्यांसाठी हे एक प्रबळ उदाहरण ठरले आहे. महात्मा गांधी यांच्या कल्पनेतील स्वच्छ भारताची सुरुवात सामूहिक कृतीने होते, हा संदेश किनारपट्टी स्वच्छता मोहीम अधिक खोलवर रुजवते.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2060722)
Visitor Counter : 52