संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दलाच्या 92 व्या स्थापना दिनानिमित्त लडाखमधील थॉईस ते अरुणाचल प्रदेशातील तवांग अशा 7,000 किलोमीटर अंतराच्या 'वायू वीर विजेता' मेगा कार रॅलीचे आयोजन
औपचारिक उद्घाटनापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येत्या 1 ऑक्टोबरला नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून रॅलीला करणार रवाना
Posted On:
28 SEP 2024 7:29PM by PIB Mumbai
भारतीय हवाई दलाच्या 92 व्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधील थॉईस ते अरुणाचल प्रदेशातील तवांग अशा 7,000 किलोमीटर अंतराच्या 'वायू वीर विजेता' या मेगा कार रॅलीचे उद्घाटन 8 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 1 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून या रॅलीला रवाना करणार असून थॉईस येथे तिला औपचारिकपणे 8 ऑक्टोबरला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. थॉईस हा समुद्रसपाटीपासून 3,068 मीटर उंचीवर असलेला हवाई दलाच्या जगातील सर्वात उंच तळांपैकी एक आहे. 29 ऑक्टोबर 2024 रोजी तवांग येथे रॅलीचा समारोप होईल.
उत्तराखंड युद्ध स्मारकातील दिग्गजांच्या समन्वयाने हवाई दलाने ही रॅली आयोजित केली आहे. हवाई दलाच्या गौरवशाली इतिहासाची, वेगवेगळ्या युद्धांमध्ये सहभागी झालेल्या हवाई योद्ध्यांच्या शौर्यगाथांची आणि त्यांनी राबवलेल्या शोधमोहिमांची माहिती लोकांना करून देणे आणि युवा वर्गाला मातृभूमीच्या सेवेसाठी लष्करी सेवांकडे आकर्षित करणे हा या रॅलीच्या आयोजनामागचा हेतू आहे. या मेगा कार रॅलीमध्ये महिलांसह बावन्न (52) हवाई योद्धे आणि माजी हवाई दल प्रमुखही सहभागी होणार आहेत. ही रॅली 16 ठिकाणी थांबणार असून या ठिकाणी विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांशी हवाई योद्धे संवाद साधणार आहेत. हवाई दलाचा ॲडव्हेंचर सेल या रॅलीचे नेतृत्व करणार असून हा विभाग विविध पातळ्यांवर समन्वय साधत आहे.
***
M.Pange/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2059996)
Visitor Counter : 33