आयुष मंत्रालय
विविध नाविन्यपूर्ण पद्धतींद्वारे जागतिक आरोग्य प्रणालीमध्ये आयुर्वेदाच्या योगदानाची क्षमता
"जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेद नवोन्मेष" ही 9व्या आयुर्वेद दिनाची संकल्पना
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेची संपूर्ण देशभरात महिनाभराची मोहीम सुरू
Posted On:
27 SEP 2024 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2024
"जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेद नवोन्मेष" या 9 व्या आयुर्वेद दिनाच्या संकल्पनेची घोषणा केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी आज आयुष भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. यंदाचा आयुर्वेद दिन 29 ऑक्टोबरला असून मुख्य कार्यक्रम नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत (एआयआयए) साजरा होईल.
“ही संकल्पना विविध नवोन्मेषी अभ्यास उपायांद्वारे जागतिक आरोग्य प्रणालीमध्ये आयुर्वेदाच्या योगदानाची क्षमता अधोरेखित करते. भारतीय पारंपरिक औषध प्रणालीचा एक प्रमुख घटक म्हणून आयुर्वेदाचा प्रसार सुलभ करण्यासाठी, एआयआयएने महिनाभराची मोहीम देखील सुरू केली आहे ज्यामध्ये संपूर्ण देशभरातील कार्यक्रमांच्या मालिकेचा समावेश आहे” अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.
9व्या आयुर्वेद दिनाच्या संकल्पनेवर प्रकाश टाकताना ही संकल्पना आयुष मंत्रालयाच्या उपक्रमांशी सुसंगत असल्याचे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी नमूद केले.

भारतासह संपूर्ण जगाला आयुर्वेदाचा लाभ मिळण्याकरिता 9 वा आयुर्वेद दिन सर्वसमावेशक पद्धतीने साजरा करण्यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने केलेल्या प्रयत्नांची माहिती संस्थेच्या संचालिका डॉ. तनुजा नेसरी यांनी माध्यमांना दिली.
आयुर्वेद दिवस दरवर्षी धन्वंतरी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर येतो, ज्याला धनतेरस देखील म्हणतात. आयुर्वेद दिनाच्या महिनाभर चालणाऱ्या मोहिमेचा प्रारंभ आजच्या घोषणेपासून झाला असून 29 ऑक्टोबर, 2024 रोजी आयुर्वेद दिन सोहोळ्यात तिची सांगता होईल.
महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेदरम्यान देशभरात आयुर्वेद दिनासंबंधी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. आयुष मंत्रालयाच्या देखरेखीखाली जनजागृती मोहिमेपासून संलग्न उपक्रम आणि अनेक प्रचारात्मक उपक्रम राबवले जातील.
* * *
S.Kakade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2059691)