युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि रक्षा खडसे यांच्या हस्ते बुद्धिबळ ऑलिंपियाड विजेत्यांचा गौरव, राष्ट्र-बांधणीकरता युवांना प्रेरित करण्यासाठी त्यांना दिले प्रोत्साहन
सर्व क्रीडा प्रकारांमधील प्रतिभेची जोपासना आणि प्रोत्साहन देणारी पोषक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध – डॉ. मांडवीय
प्रविष्टि तिथि:
26 SEP 2024 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2024
बुडापेस्टमध्ये झालेल्या 45व्या फिडे बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील विजेत्या भारतीय संघाला केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री आणि श्रम व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह आज नवी दिल्ली इथे सन्मानित केले. या संघाने ऑलिंपियाडमध्ये दोन सुवर्ण पदके पटकावली आहेत. अभिमानास्पद कामगिरी बजावून आपल्या विजयाने देशाला आनंद मिळवून देणाऱ्या बुद्धिबळ संघाचे यश साजरे करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बुद्धिबळपटूंशी संवाद साधताना डॉ. मनसुख मांडवीय यांनी सांगितले, बुद्धिबळाच्या खेळाची सुरुवात भारतात झाल्यामुळे देशाचा बुद्धिबळाशी मोलाचा संबंध आहे. हा खेळ देशाची संस्कृती आणि बौद्धिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. “जागतिक व्यासपीठावर विजय मिळवून तुम्ही देशासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे आणि त्याचबरोबर आपल्या पारंपरिक वारशाचाही सन्मान केला आहे,” असे ते म्हणाले. भारताचे सामर्थ्य केवळ मनुष्यबळातच नाही तर बुद्धीबळातदेखील आहे, असे डॉ. मांडवीय यांनी सांगितले. “सर्व क्रीडा प्रकारांमधील प्रतिभेची जोपासना आणि त्याला प्रोत्साहन देणारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे,” असे ते म्हणाले.

सरकारच्या क्रीडा विकासाच्या उद्दीष्टाचा त्यांनी पुनरुच्चार केला ते पुढे म्हणाले, “विकसित देश बनण्याच्या मार्गावर असलेल्या भारतासाठी आपले क्रीडा क्षेत्रातील यश जागतिक ओळख निर्माण करताना महत्त्वाचे ठरेल.”
पदक विजेत्यांना युवांचे सक्रीय सदिच्छा दूत होण्याचे आवाहन करत डॉ. मांडवीय यांनी या विजेत्यांना आपापल्या कष्टाच्या, चिकाटीच्या आणि समर्पणाच्या कथा पुढच्या पिढीसमोर कथन करण्यास प्रोत्साहन दिले, “तुम्ही युवा प्रतिमा आणि युवा दूत दोन्ही आहात आणि पुढच्या पिढीला ‘राष्ट्र प्रथम’चा हेतू बाळगण्याची प्रेरणा देणे ही तुमची जबाबदारी आहे.”मंत्रालयाच्या वतीने देशभरात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये होणार असलेल्या विकसित भारत दूत – युवा संपर्क कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांनी या खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
दोन सुवर्ण पदके मिळवून भारताने बुद्धिबळ इतिहासाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. खुल्या गटात पुरुषांच्या संघाने आणि महिलांच्या गटात प्रत्येकी एक अशी दोन सुवर्ण पदके भारतीय बुद्धिबळपटूंनी मिळवली.
चार भारतीय खेळाडूंनी असाधारण कामगिरी करून चार वैयक्तिक सुवर्ण पदके पटकावली.

या बुद्धिबळपटूंनी हृदयस्पर्शी शब्दांत कृतज्ञतेची भावना व्यक्त करून सांगितले की त्यांनी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधला. आज दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. यामुळे कष्ट करत राहून भविष्यात देशाला अभिमानास्पद यश मिळवण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
* * *
N.Chitale/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2059259)
आगंतुक पटल : 88