कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

बीसीसीएलच्या धोरणांमुळे देशांतर्गत कोकिंग कोळसा वापराला चालना

Posted On: 26 SEP 2024 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2024

 

देशातील सर्वात मोठ्या कोकिंग कोळसा उत्पादक असलेल्या आणि कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) ची उपकंपनी असलेल्या बीसीसीएल अर्थात भारत कोकिंग कोल लिमिटेड या कंपनीने आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत “कोकिंग कोळसा अभियानात” निभावलेल्या सक्रीय भूमिकेच्या माध्यामातून आयात कोळशा वरील देशाचे अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने लक्षणीय झेप घेतली आहे.

कोकिंग कोळशाच्या आयातीमुळे भारताच्या मौल्यवान परदेशी गंगाजळीवर ताण पडतो आणि ही आयात कमी करण्यासाठी, बीसीसीएलने देशातील पोलाद उत्पादकांसाठी स्वतःची कोकिंग कोळसा लिलाव प्रक्रिया अधिक लवचिक, पारदर्शक तसेच आकर्षक बनवून मोठी सुधारणा घडवून आणली आहे.
कोळसा खाणींच्या सहाव्या भागाच्या लिलावात देऊ करण्यात आलेल्या कोळशाची अजिबातच खरेदी न झाल्याने बीसीसीएलने हा प्रमुख प्रयत्न हाती घेतला. लिलावाला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीसएल ने स्वतःच्या धोरणांचे पुनर्मुल्यांकन केले आणि अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यापैकी अत्यंत महत्त्वाची सुधारणा म्हणजे सांघिक लिलाव. या प्रकारच्या लिलावामध्ये अनेक छोट्या ग्राहकांना सहयोगी तत्वावर एकत्र येऊन लिलाव प्रक्रियेत एकत्रितपणे सहभागी होता येते. यातून निविदा सादर करणाऱ्यांच्या संघाचा विस्तार होतो आणि ही प्रक्रिया देखील अधिक सुलभतेने उपलब्ध होते.

अधिकाधिक सहभागींना आकर्षित करण्यासाठी बीसीसीएलने लिलावातील बोलीदारांशी दुवा सांधण्यासाठी पात्रता निकषात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला. बीसीसीएलच्या कार्यकारी संचालकांच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाली आणि नंतर हा प्रस्ताव अधिक विचारार्थ सीआयएलकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावानुसार, पोलाद कारखाने, विद्यमान किंवा नव्या कोकिंग कोल वॉशरीज तसेच वॉशरीजमधून निघणारी पॉवर कोल उप-उत्पादने वापरण्यास सक्षम असणारे इतर कारखाने यांच्या संघांच्या सहभागाचा प्रस्ताव देण्यात आला होता. सीआयएलने तत्परतेने या संकल्पनेचा स्वीकार केल्यामुळे पोलाद उपक्षेत्रासाठी लिंकेज लिलावाच्या सातव्या भागाच्या नव्या योजना दस्तावेजाचे विकसन करण्यात आले.

योजना दस्तावेजाची अधिकृत सूचना जारी करण्यापूर्वी आणि विस्तृत सहभागाची सुनिश्चिती करून घेण्यासाठी बीसीसीएल आणि सीआयएलने दिल्ली येथे ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात पोलाद उत्पादक आणि इतर संबंधित उद्योग संघटनांकडून अभिप्राय मागवण्यात आले. संभाव्य बोलीदारांचा सातत्याने पाठपुरावा आणि सक्रीय सहभागासह, निरंतर संवादाच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळे लिलाव प्रक्रियेत बोलीदारांचा सहभाग लक्षणीय प्रमाणात वाढला.

या उपक्रमांच्या परिणामी, बीसीसीएलने पोलाद उपक्षेत्रासाठी नुकत्याच संपन्न झालेल्या दीर्घकालीन ई-लिलावात (भाग सात) विक्रमी सफलता मिळवली. लिलावात उपलब्ध असलेल्या 3.36 दशलक्ष टन कोकिंग कोळशापैकी 2.40 दशलक्ष टन कोळशाची विक्री करण्यात यश आले असून हा कोळसा खरेदीचा मोठा टप्पा गाठण्यात कंपनीला यश मिळाले आहे.

देशांतर्गत कोकिंग कोळशाचा वापर वाढवण्यासाठी, आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशातील पोलाद उद्योगाला सशक्त करण्यासाठी बीसीसीएल ने हे प्रयत्न केले आहेत. सांघिक लिलाव प्रक्रियेची यशस्वी अंमलबजावणी आणि लिलाव प्रक्रीयेविषयी सुस्पष्ट संवाद यांच्यामुळे या प्रक्रियेत सहभागाचे प्रमाण वाढून ग्राहक आणि कंपनी यांना लाभकारक ठरत, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेअंतर्गत आयातीला पर्याय निर्माण करण्याचे देशाचे अधिक व्यापक ध्येय साध्य होत आहे.

विभाग सातच्या लिलाव प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त करून बीसीसीएल चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक समीरण दत्ता म्हणाले की, लिलाव प्रकिया अधिक समावेशक आणि पारदर्शक बनवण्यासाठी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचा लक्षणीय परिणाम दिसून आला आहे. आता झालेली यशस्वी प्रक्रिया हा देशांतर्गत कोकिंग कोळसा उत्पादनाला चालना देण्याप्रती तसेच आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याप्रती देशाच्या कटिबद्धतेचा पुरावाच आहे.

 

* * *

NM/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2058953) Visitor Counter : 30


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu