कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रम- देश कार्यक्रम सल्लागार समितीची आढावा बैठक

Posted On: 26 SEP 2024 2:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2024

 

कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी यांनी देश धोरणविषयक योजना (सीएसपी) 2023-2027 च्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी संयुक्त राष्ट्र जागतिक अन्न कार्यक्रम (UN WFP) आणि संबंधित मंत्रालय/विभागातील सदस्यांसोबत देश कार्यक्रम सल्लागार समिती (सीपीएसी) च्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. 

क्षमता निर्माण आणि तांत्रिक साहाय्याच्या माध्यमातून अन्न सुरक्षा आणि पोषण यातील राष्ट्रीय प्राधान्यक्रमांकडे लक्ष पुरवण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग आणि संयुक्त राष्ट्र जागतिक अन्न कार्यक्रम यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.  या सामंजस्य कराराअंतर्गत, सीएसपी अर्थात देश धोरणविषयक योजना 2023-27 चार धोरणात्मक परिणामांवर कार्य करते.  यात  (i) अधिक प्रभावी आणि कार्यक्षम राष्ट्रीय अन्न-आधारित सामाजिक संरक्षण प्रणाली (ii) वैविध्यपूर्ण, पौष्टिक आणि फोर्टिफाईड म्हणजेच वर्धित पोषणमूल्ये असलेल्या खाद्यपदार्थांचा वाढता वापर (iii) महिलांची सामाजिक आणि आर्थिक गतिशीलता वाढवणे आणि (iv) हवामान-लवचिक उपजीविका आणि अन्न प्रणाली तयार करण्यासाठी अनुकूल क्षमता मजबूत करणे, यांचा समावेश आहे. 

देश धोरणविषयक योजना अंतर्गत उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि समन्वयासाठी, अध्यक्ष डॉ. देवेश चतुर्वेदी आणि सदस्य म्हणून नीती आयोग व संबंधित मंत्रालयांचे संयुक्त सचिव यांची  देश कार्यक्रम सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची वर्षातून किमान एक बैठक होते. सीएसपी 2023-27 अंतर्गत सीपीएसीची ही पहिली बैठक होती. सध्या लागू असलेल्या देश धोरणविषयक योजनेची प्रगती आणि पूर्तता यांचा आढावा यावेळी चर्चेत घेण्यात आला. 

जागतिक अन्न कार्यक्रमाच्या (डब्ल्यूएफपी) देशातल्या संचालक एलिझाबेथ फौर यांनी समितीला सीएसपीच्या विविध लक्ष्यित परिणामांच्या स्थितीबद्दल माहिती दिली.  आसाम, ओडिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये शेतीमध्ये परिवर्तन आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा वाढवणे यासह सुरू असलेले विविध उपक्रम, भरडधान्य मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशव्यापी प्रयत्न, 'सुरक्षित मासेमारी' ॲपद्वारे मासेमारी समुदायांमध्ये लवचिकता निर्माण करणे, सार्वजनिक वितरण प्रणालीचा संपूर्णपणे वापर होण्यासाठी पुढाकार,  धान्य एटीएमबाबत अन्नपूर्ती उपक्रम, शालेय पोषण उद्यान आणि तांदूळ फोर्टिफिकेशन इत्यादींचा समावेश यात आहे. 

अन्न आणि पोषण सुरक्षितता या सामायिक उद्दिष्टाने प्रेरित,विभाग आणि डब्ल्यू एफ पी यांच्यातील प्रदीर्घ भागीदारी डॉ. देवेश चतुर्वेदी यांनी यावेळी अधोरेखित केली. त्यांनी अधिकाऱ्यांना परिणामकारक हस्तक्षेप आणि उपक्रम ओळखण्यासाठी आणि मंत्रालय/विभागांच्या चालू कार्यक्रमांमध्ये ते समाविष्ट करण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे सुचवले. विभागातील अधिकाऱ्यांसोबत, खास कृषी क्षेत्रातील प्रयोग आणि महत्त्वपूर्ण उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्याचा सल्ला त्यांनी डब्ल्यूएफपीला दिला. पौष्टिक परिणामांवर विचार करताना  आपण भारतीय लोकसंख्येसाठी लागू असलेल्या पोषणविषयक मानकांकडे देखील लक्ष दिले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. विविध तृणधान्यांच्या वर्धित पोषणमूल्य वाणांसह, सध्याच्या स्थानिक जाती लाल आणि काळा तांदूळ आणि  पौष्टिक भरडधान्य यांचा प्रचार झाला पाहिजे. शेतकरी उत्पादक संघटनांना विविध उपक्रमांमध्ये जोडून घेण्याच्या  शक्यतांचा शोध घेण्याचा सल्लादेखील त्यांनी  दिला.

या बैठकीला अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग, महिला आणि बाल कल्याण मंत्रालय, ग्रामीण विकास विभाग, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. 

 

* * *

NM/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2058952) Visitor Counter : 22