पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवसानिमित्त उद्या मुंबईत आयोजित किनारा स्वच्छता मोहिमेत केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव होणार सहभागी
दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या शनिवारी पाळला जातो आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस
Posted On:
20 SEP 2024 8:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2024
मुंबईत जुहू इथे समुद्रकिनाऱ्यावर उद्या (21 सप्टेंबर 2024) आयोजित किनारा स्वच्छता मोहिमेत केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव सहभागी होणार आहेत. भू विज्ञान मंत्रालय आणि राज्य सरकारच्या सहयोगाने या मोहिमेचे आयोजन केले आहे. किनारी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील 100 हून अधिक किनाऱ्यांवर किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.
मंत्रालयाने किनारा स्वच्छता मोहिमेची सुरुवात करून 2018 मध्ये जागतिक पर्यावरण दिनी “प्लास्टिकवर मात” या संकल्पनेसह #IamSavingMyBeach अभियानाचा आरंभ केला. 2018 पासून मंत्रालय नेमाने सर्व किनारी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये किनारा स्वच्छता उपक्रमांचे आयोजन राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेश प्रशासनांच्या सहयोगाने करत आहे.
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस (आयसीसीडी) दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या शनिवारी पाळला जातो. किनारे स्वच्छता आणि जगातील समुद्र, जलमार्ग जपण्या-राखण्याचे महत्त्व जनतेला समजावून देण्याच्या, त्यासाठी प्रेरित करण्याच्या आणि समुद्रातील कचऱ्याच्या समस्येची दखल घेण्याच्या उद्देशाने हा दिवस पाळला जातो.
2021 मध्ये मंत्रालयाने स्वातंत्र्याच्या 75 व्या, अमृत महोत्सवी वर्षात 10 ब्ल्यू फ्लॅग प्रमाणित किनाऱ्यांवर किनारे स्वच्छता उपक्रमांचे आयोजन केले होते. 2022 मध्ये आयसीसीडी साजरा करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने भू विज्ञान मंत्रालयाच्या सहयोगाने “स्वच्छ सागर, सुरक्षित सागर(क्लीन कोस्ट सेफ सी)”अभियानांतर्गत किनारा स्वच्छता उपक्रम राबवले होते. अभियानाची व्याप्ती 75 दिवस 75 समुद्रकिनाऱ्यांवर पसरली होती आणि त्यामध्ये 15,000 हून अधिक स्वयंसेवकांनी भारतीय किनारपट्टीवर 1,500 टन कचरा गोळा केला.
2023 मध्ये जी20 च्या अध्यक्षतेच्या काळात मंत्रालयाने समुद्र आणि किनारी भागातील प्रदूषणाबाबत संवेदनशीलता निर्माण करून जनजागृतीसाठी व जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी जनभागीदारी चळवळ हाती घेतली. तिचा हेतू सर्व किनारी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील किनारे स्वच्छतेसाठी कृतीशील होण्याचा होता. मुंबईत जुहूच्या किनाऱ्यावर 21 मे 2023 रोजी मोठ्या स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये जी20च्या शिष्टमंडळासह स्थानिक लोकप्रतिनिधी, बिगर-सरकारी संस्था, एनसीसी, एनएसएस, तटरक्षक दल, कंपन्या आणि राज्य व केंद्र सरकारी अधिकाऱ्यांसह जनतेतून 1000 पेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. इयत्ता 8वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व त्यात 5900 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.
जुहूच्या किनाऱ्यावरील त्या स्वच्छता कार्यक्रमात सुमारे 500 किलो प्लास्टिकसह अन्य कचरा – एकदा वापरून टाकून देण्याचे प्लास्टिक, खाद्यपदार्थांची वेष्टने इ. मिळून जवळपास 850 किलो कचरा जमा करण्यात आला. जुहूच्या किनाऱ्यासह देशातील सर्व किनारी राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील मिळून 35 किनाऱ्यांवर सुमारे 17392 स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन जवळपास 35243 किलो कचरा जमा केला. त्यापैकी 25% कचरा प्लास्टिकचा आणि त्यापाठोपाठ 11% कचरा काचेचा होता.
त्या स्वच्छता मोहिमेची थेट प्रसारणाची लिंक - https://youtube.com/live/C3Sf6Ouhvkw?feature=share
S.Kakade/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2057204)
Visitor Counter : 47