संरक्षण मंत्रालय
परमवीर चक्र विजेत्यांच्या नावे नामकरण केलेल्या अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील 21 बेटांवर आयोजित वैशिष्ट्यपूर्ण पहिल्या खुल्या जलतरण मोहिमेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले ध्वजांकित
Posted On:
20 SEP 2024 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2024
परमवीर चक्र विजेत्यांच्या नावे नामकरण केलेल्या अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील 21 बेटांवर आतापर्यंतच्या पहिल्याच खुल्या जलतरण मोहिमेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, 20 सप्टेंबर 2024 रोजी, नवी दिल्ली येथे, ध्वजांकित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 जानेवारी 2023 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून पराक्रम दिनी अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील 21 बेटांना 21 परमवीर चक्र विजेत्या वीरांची नावे प्रदान केली होती. या नामांतराच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त, त्रिसेवा अंदमान आणि निकोबार कमांडने 'परमवीर मोहीम' आखली होती, या अंतर्गत भारतीय लष्कर, भारतीय नौदल, भारतीय हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने सर्व 21 बेटांवर 21 शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या शौर्याला आणि बलिदानाला आदरांजली म्हणून प्रत्येक बेटावर राष्ट्रीय ध्वज फडकवला. या 11 सदस्यीय मोहीम संघाचे नेतृत्व प्रसिद्ध ओपन वॉटर जलतरणपटू आणि तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार विजेते विंग कमांडर परमवीर सिंग यांनी केले.
सागरी मोहिमेदरम्यान येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करून ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या आणि परमवीरांच्या शौर्य आणि बलिदानाच्या गाथा लोकांसमोर आणणाऱ्या संघाच्या धैर्याचे आणि क्षमतेचे राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात कौतुक केले.
जागतिक जल दिनानिमित्त 22 मार्च 2024 रोजी या मोहिमेला श्री विजयपुरम येथून नेताजी सुभाष चंद्रद्वीपपर्यंत पोहून औपचारिक प्रारंभ करण्यात आला होता. या संघाने पाच महिन्यांच्या कालावधीत सर्व 21 बेटांवर पोहून 300 किलोमीटरहून अधिक अंतर कापले तर 15 ऑगस्ट 2024 रोजी 78 व्या स्वातंत्र्यदिनी या मोहिमेचा समारोप झाला. मोहिमेच्या अंतिम टप्प्यात सशस्त्र दल आणि तटरक्षक दलाच्या 78 जवानांनी नेताजी सुभाषचंद्र द्वीप ते श्री विजयपुरमपर्यंत पोहण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले.
सर्व जलतरणपटूंनी ‘मदतीशिवाय खुल्या पाण्यात पोहणे’ या श्रेणीसाठी आंतरराष्ट्रीय मानके आणि नियमांनुसार मोहीम हाती घेतली, ज्यात जलतरणपटूंना फक्त स्विम ट्रंक, गॉगल्स आणि कॅप असा पोशाख करणे बंधनकारक असते. या मोहिमेदरम्यान, जलतरणपटूंना तीव्र थकवा, शरीरात पाण्याची कमतरता जाणवणे, सनबर्न आणि समुद्रातील आव्हानात्मक परिस्थिती अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. याशिवाय अनेक प्राणघातक जलचरांचा सामना देखील त्यांना करावा लागला. यामध्ये भाग घेतलेल्या बहुतांश जणांचा खुल्या पाण्यात पोहण्याचा हा पहिलाच अनुभव होता हे लक्षात घेता संपूर्ण मोहित एकही दुर्घटना न होता यशस्वीरीत्या पूर्ण झाली, ही एक अद्भूत कामगिरी म्हणावी लागेल.
S.Kakade/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2057132)
Visitor Counter : 83