पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

विश्व भारतीय खाद्य महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश

Posted On: 19 SEP 2024 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2024

विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2024 च्या आयोजनाबद्दल जाणून घेणे औत्सुक्याचे आहे. जगातील विविध भागातून आलेल्या सर्व सहभागींचे स्वागत आणि खूप शुभेच्छा.

जागतिक खाद्य उद्योग, शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील कुशाग्र व्यक्तींना वाढत्या संधींचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी, एकमेकांच्या अनुभवातून शिकून ते ज्ञान सामायिक करण्यासाठी विविध राष्ट्रांचा सहभाग असलेला विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2024 म्हणजे जणु एक महत्वपूर्ण मंच होय.

भारतामध्ये रुचकर आणि वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती आहे. भारतीय अन्न परिसंस्थेचा कणा हा कृषक आहे. शेतकऱ्यांनीच उत्कृष्ट स्वयंपाकाच्या पौष्टिक आणि रुचकर परंपरांची निर्मिती सुनिश्चित केली आहे. आम्ही नाविन्यपूर्ण धोरणे आणि अंमलबजावणीवर भर देऊन त्यांच्या मेहनतीला पाठबळ देत आहोत.

आधुनिक युगात, प्रगतीशील कृषी पद्धती, भक्कम प्रशासकीय चौकट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे, भारताने खाद्यान्न क्षेत्रात नवोन्मेष, शाश्वतता आणि सुरक्षिततेसाठी जागतिक मानदंड निश्चित केले पाहिजेत यासाठी आमचा प्रयत्न आहे.

गेल्या 10 वर्षांमध्ये, आम्ही अन्न प्रक्रिया क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी व्यापक सुधारणा केल्या आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगात 100% थेट परदेशी गुंतवणूक, प्रधानमंत्री किसान संपदा योजना, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे औपचारिकीकरण, अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना यांसारख्या बहुआयामी उपक्रमांद्वारे आम्ही देशभरात आधुनिक पायाभूत सुविधा, मजबूत पुरवठा साखळी आणि रोजगार निर्मितीद्वारे एक मजबूत परिसंस्था निर्माण करत आहोत.

लघु उद्योगांना सक्षम बनवणे हा आमच्या दृष्टिकोनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या एमएसएमईची भरभराट व्हावी आणि त्याने जागतिक मूल्य साखळीचा अविभाज्य भाग व्हावे आणि त्याच वेळी महिलांना लघु उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करावे अशी आमची इच्छा आहे.

अशा वेळी, विश्व भारतीय खाद्य महोत्सव हा आमच्यासाठी उद्योजकांमधील संवाद आणि प्रदर्शने, खरेदीदार आणि विक्रीदारांमधील बैठका आणि देश, राज्य आणि क्षेत्र-विशिष्ट सत्रांद्वारे जगासोबत काम करण्यासाठी एक आदर्श मंच आहे.

याव्यतिरिक्त, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण एफएसएसएआय द्वारे जागतिक खाद्यान्न नियामक शिखर परिषदेचे आयोजन हे जागतिक आरोग्य संघटना, खाद्यान्न आणि कृषी संघटना सारख्या जागतिक नियामकांना आणि अनेक प्रतिष्ठित देशांतर्गत संस्थांना एकत्र आणून अन्न सुरक्षा, गुणवत्ता मानके आणि सर्वोत्कृष्ट पद्धती अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करेल.

तसेच अन्न सुरक्षा वाढविण्यासाठी आणि अन्नाची नासाडी कमी करण्यासाठी अन्न विकिरण, पोषण आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देण्यासाठी वनस्पती-आधारित प्रथिने, तसेच चक्राकार अर्थव्यवस्था यासारखे महत्त्वाचे विषय प्रदर्शित केले जातील.

चला सहभागी होऊया आणि एक शाश्वत, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि पौष्टिक जग निर्माण करण्याचे स्वप्न साकार करूया.


S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2056651) Visitor Counter : 62