पर्यटन मंत्रालय
पॅरिसमध्ये आयोजित इंटरनॅशनल फ्रेंच ट्रॅव्हल मार्केट अर्थात आयएफटीएम 2024 टॉप रेसा कार्यक्रमात भारताच्या सहभागामुळे अंतर्गामी पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा
जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना भारतातील पर्यटनविषयक विविध पर्यायांचा अतुल्य भारत पॅव्हेलियनमार्फत प्रचार
योगासनांविषयी प्रदर्शन पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण
Posted On:
18 SEP 2024 4:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2024
फ्रान्समध्ये पॅरिस येथे 17 ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित केलेल्या पर्यटन विषयक प्रमुख प्रदर्शनांपैकी एक, आयएफटीएम टॉप रेसा 2024 या प्रतिष्ठित पर्यटन व्यापार मेळाव्यात भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय सहभागी झाले आहे.
अतुल्य भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन भारताचे फ्रान्समधील राजदूत, एच. ई. जावेद अश्रफ, यांच्या हस्ते आणि पर्यटन मंत्रालय, मेघालय, जम्मू आणि काश्मीर राज्य पर्यटन विभाग तसेच देशातील प्रमुख प्रवासी व्यापार भागधारकांच्या उपस्थितीत झाले.
अतुल्य भारत पॅव्हेलियन हे आपल्या देशाची अनोखी संस्कृती, वारसा, पद्धती आणि आधुनिक प्रवासाच्या संधी यांचा अनोखा मिलाफ असलेला चैतन्यदायी अनुभव देतो. अतुल्य भारत पॅव्हेलियन विविध प्रकारच्या प्रवास उत्पादनांना अधोरेखित करण्याबरोबरच खाजगी पर्यटन कंपन्यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांना भेटण्याची संधी प्रदान करत आहे. या सोबतच भारत पॅव्हेलियनमध्ये देशातील समृद्ध योगाभ्यासाचे प्रदर्शन देखील असून ते सर्व अभ्यागतांचे लक्ष वेधून घेत आहे.
अंतर्गामी पर्यटनाला अधिकाधिक चालना देण्याच्या उद्दिष्टासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले अस्तित्व आणि स्थान अधिक प्रकर्षाने ठसवण्यासाठीचा भारताचा धोरणात्मक हेतू या सहभागातून दिसून येतो.
वर्ष 2023 मध्ये भारतात 9.24 दशलक्ष परदेशी पर्यटकांनी भेट दिली, त्यामध्ये फ्रान्समधील 0.18 दशलक्ष पर्यटकांचा सहभाग होता. भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या आगमनाच्या बाबतीत फ्रान्स ही अकरावी सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
या कार्यक्रमात ट्रॅव्हल एजन्सी, टूर ऑपरेटर, विमान कंपन्या, हॉटेल व्यावसायिक, क्रूझ लाइन्स, प्रवास तंत्रज्ञान प्रदाते, पर्यटन मंडळे आणि पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील इतर उद्योग आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होतात.
S.Pophale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2056088)
Visitor Counter : 36