रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान 2024 अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा केला प्रारंभ


या वर्षीच्या स्वच्छता पंधरवड्याच्या सुरुवातीला ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेत 30,000 हून अधिक लोकांचा सहभाग

Posted On: 17 SEP 2024 9:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2024

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज 'स्वच्छता ही सेवा' अभियान 2024 अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ केला. यावेळी रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा हे देखील उपस्थितीत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'एक पेड माँ के नाम' उपक्रमाच्या  आणखी विस्ताराअंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली आहे, तर स्वच्छ भारत अभियानाच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 2014 मध्ये सुरू झालेले  स्वच्छ भारत अभियान  हे स्वच्छ आणि हरित भारताच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

नितीन गडकरी आणि हर्ष मल्होत्रा यांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील ईस्टर्न पेरिफेरल द्रुतगती महामार्गाच्या दुहाई इंटरचेंज येथे वृक्षारोपण केले.

यावेळी नितीन गडकरी यांनी सर्व अधिकारी आणि उपस्थितांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली.

सरकारने प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या "एक पेड माँ के नाम" मोहिमेचाही समावेश आहे, असे नितीन गडकरी यांनी याप्रसंगी बोलताना अधोरेखित केले. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेणे तसेच इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे ही महत्त्वपूर्ण पावले आहेत यावर गडकरी यांनी भर दिला.

वाहनांमधून उत्सर्जित होणारे जीवाश्म इंधन हे प्रदूषणाचे प्रमुख स्रोत असल्याचे गडकरी यांनी निदर्शनास आणून देत त्यांनी पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरणाच्या महत्त्वावर भर दिला.  या प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि आयुर्मान कमी होते.  त्यामुळे, प्रत्येकासाठी निरोगी आणि चांगले जीवन सुनिश्चित करण्यासाठी प्रदूषण पातळी कमी करणे ही आपली जबाबदारी आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

या वर्षीच्या स्वच्छता पंधरवड्याच्या सुरुवातीला ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेत 30,000 हून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला.

शाश्वत राष्ट्रीय महामार्ग जाळे निर्माण करण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हरित महामार्ग (लागवड, प्रत्यारोपण, सुशोभीकरण आणि देखभाल), धोरण 2015 च्या अंमलबजावणीपासून राष्ट्रीय महामार्गांजवळ सुमारे 4 कोटी झाडे लावली आहेत आणि सुमारे 70,000 झाडांचे पुनर्रोपण केले आहे.

 

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2055827) Visitor Counter : 73