युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे कॉप 9 ब्युरो आणि खेळातील डोपिंग विरोधी युनेस्को आंतरराष्ट्रीय अधिवेशनाअंतर्गत निधी मंजूरी समितीच्या संयुक्त बैठकीचे आयोजन
राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था (NADA) आणि राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, दिल्ली यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2024 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2024
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार आणि रोजगार मंत्री,डॉ.मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे कॉप 9 (COP9) ब्युरोची दुसरी औपचारिक बैठक, आणि खेळातील डोपिंग (उत्तेजक सेवन) विरोधातील युनेस्को आंतरराष्ट्रीय अधिवेशनाअंतर्गत निधी मंजुरी समितीची तिसरी औपचारिक बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे देखील उपस्थित होत्या.डोपिंग विरोधातील लढ्यात जागतिक सहकार्य वाढवणे आणि खेळातील एकी, निष्पक्षता आणि सर्वसमावेशकतेच्या महत्त्वावर भर देणे, हे या दोन दिवसीय उच्चस्तरीय बैठकीचे उद्दिष्ट आहे.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला डॉ. मांडवीय यांनी निकोप खेळासाठीची भारताची वचनबद्धता आणि जागतिक डोपिंगविरोधी प्रयत्नांमध्ये असलेली प्रमुख भूमिका अधोरेखित केली. त्यांनी भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम’, अर्थात जग हे एक कुटुंब आहे, या तत्वज्ञानाचा पुनरुच्चार केला, आणि भविष्यातील पिढ्यांसाठी खेळांमधील एकता टिकवून ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या महत्वाच्या भूमिकेवर भर दिला.
रक्षा खडसे यांनी डोपिंगमुक्त क्रीडा संस्कृतीला पाठिंबा देण्याच्या सरकारच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला आणि भारताच्या या क्षेत्रातील वाढत्या भागीदारीवर भर दिला.

उद्घाटन सत्रात नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA), अर्थात राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था आणि राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, दिल्ली (NLU Delhi) यांच्यात महत्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. हा सामंजस्य करार राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था (NADA) आणि राष्ट्रीय कायदा विद्यापीठ (NLU), दिल्ली यांच्यातील डोपिंग विरोधी कायदा, धोरण आणि शिक्षणामध्ये सहकार्य वाढवण्यासाठीचे धोरणात्मक सहकार्य अधोरेखित करतो. हे सहकार्य, संयुक्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम विकसित करणे, शैक्षणिक संशोधन, जागरुकता वाढवण्यासाठी सेमिनार, कार्यशाळा आणि परिषदा आयोजित करणे, आणि डोपिंग विरोधी पद्धतींसाठी अधिक समावेशक आणि माहितीपूर्ण दृष्टीकोन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करेल.

हा सामंजस्य करार कायदे विषयक शिक्षण आणि डोपिंगविरोधी संशोधनासाठी, आणि या क्षेत्रात भारताचे नेतृत्व बळकट करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे. या भागीदारीद्वारे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर डोपिंगविरोधी उपक्रमांना पाठबळ देणारे कायदेशीर शिक्षण आणि संशोधनासाठी एक मजबूत चौकट तयार करण्याचे दोन्ही संस्थांचे उद्दिष्ट आहे.
उद्घाटन सत्राला अझरबैजान, बार्बाडोस, एस्टोनिया, इटली, रशिया, सेनेगल, टर्की, संयुक्त अरब अमिराती आणि झांबिया यासह विविध देशांतील उच्चस्तरीय मान्यवर उपस्थित होते. या दोन दिवसीय कार्यक्रमात हे प्रतिनिधी जागतिक डोपिंग विरोधी परिसंस्था आणि सहकार्याशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवरील चर्चा पुढे नेतील.
ही संयुक्त बैठक जागतिक क्रीडा प्रशासनातील, विशेषत: नैतिक क्रीडा पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि खेळातील डोपिंग विरोधातील युनेस्को आंतरराष्ट्रीय अधिवेशनासारख्या आंतरराष्ट्रीय चौकटीला पाठींबा देण्यामधील भारताचा वाढता प्रभाव अधोरेखित करते.
या बैठकींचे यजमान पद भूषवून, भारताने डोपिंग विरोधातील लढाईत प्रमुख देश म्हणून आपले स्थान बळकट केले आहे, आणि खेळांसाठी स्वच्छ आणि निष्पक्ष वातावरण निर्माण करण्यात योगदान दिले आहे.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2055692)
आगंतुक पटल : 105