गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
"स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता (4S)" 2024 साठी नवी दिल्लीत पूर्वावलोकन कार्यक्रमाचे आयोजन
सुमारे दोन लाख अत्यंत कठीण आणि अस्वच्छ ठिकाणांचे कालबद्ध आणि लक्ष्यित परिवर्तन करणे हे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे : मनोहर लाल
स्वच्छ भारत अभियान हे वर्तन बदलाचे जनआंदोलन बनले आहे आणि आता जागतिक स्तरावर बालमृत्यू, रोगराई कमी करण्यासाठी आणि सुधारित उपजीविकेच्या संधींसाठी एक शक्तिशाली माध्यम म्हणून ओळखले जाते.: सी आर पाटील
Posted On:
13 SEP 2024 6:58PM by PIB Mumbai
स्वच्छ भारत अभियानाची यावर्षीची संकल्पना असलेल्या ‘स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता (4S)’ 2024 मोहिमेअंतर्गत सुमारे दोन लाख अत्यंत कठीण आणि अस्वच्छ ठिकाणांचे कालबद्ध आणि लक्ष्यित परिवर्तन करणे हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.
ही स्वच्छता लक्ष्यित ठिकाणे (सीटीयू ) हे या वर्षाच्या मोहिमेचे मुख्य आकर्षण आहे आणि यात सीटीयू चिन्हांकित करणे आणि पोर्टलद्वारे मॅपिंग यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज नवी दिल्लीत सुषमा स्वराज भवन येथे झालेल्या या मोहिमेच्या पूर्वावलोकन कार्यक्रमात ही घोषणा केली.
केंद्रीय सार्वजनिक उपक्रम, उद्योग भागीदार आणि स्वयंसेवी संस्थांना स्वच्छता लक्ष्यित ठिकाणे -सीटीयू दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. या मोहिमेमध्ये श्रमदान आणि सामूहिक कृतीच्या माध्यमातून पर्यटन स्थळे, सार्वजनिक इमारती, व्यावसायिक क्षेत्रे, समुदाय शौचालये, सार्वजनिक शौचालये, जलाशय , प्राणीसंग्रहालये , अभयारण्य अशा विविध ठिकाणी महास्वच्छता अभियानांचा समावेश आहे.
नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी सर्व केंद्रीय मंत्रालये आणि राज्ये विविध उपक्रम आखत आहेत. हे अभियान 17 सप्टेंबरपासून सुरू होणार असून महात्मा गांधींच्या जयंती दिनी 2 ऑक्टोबर 2024 रोजी समाप्त होईल.
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, यावर्षी हे अभियान ‘स्वच्छता ही सेवा’ कडून ‘स्वच्छता हाच समाजातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि संस्कार’ अशी उत्तुंग भरारी घेत आहे.
ते म्हणाले की, हे जगातील सर्वात मोठे जनआंदोलन असल्यामुळे जागतिक स्तरावर आदर्श उदाहरण ठेवण्यासाठी हे अभियान संपूर्ण समाज आणि संपूर्ण सरकार दृष्टिकोन मांडण्याचे एक माध्यम आहे.
शहरी भागात अंदाजे 2,300 कचराभूमी असून तिथे 22 कोटी मेट्रिक टन कचरा आहे त्यापैकी 427 कचराभूमीतील 9 कोटी मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून 4,500 एकर जमीन मोकळी करण्यात आली आहे अशी माहिती मंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की अभियानाचे उद्दिष्ट घरोघरी जाऊन कचरा संकलन पद्धत बदलून कचऱ्यावर 100% प्रक्रिया याकडे वळवण्याचे आहे.
यावेळी बोलताना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील म्हणाले की, देशातील 93 टक्क्यांहून अधिक महिलांना शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार, या अभियानाने पहिल्या पाच वर्षात बालमृत्यूचे प्रमाण सुमारे तीन लाखांनी कमी केले आहे.पाटील म्हणाले की, 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून घोषणा केलेले स्वच्छ भारत अभियान हे वर्तणूक बदलाचे जनआंदोलन बनले आहे आणि आता बालमृत्यू, रोगराई कमी करण्यासाठी आणि सुधारित उपजीविकेच्या संधींसाठी एक शक्तिशाली माध्यम म्हणून ओळखले जाते.
या वर्षीचे स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता (4S) 2024 अभियान तीन मुख्य स्तंभांवर आधारित आहे:
1. स्वच्छता की भागिदारी – स्वच्छ भारतासाठी लोकसहभाग, जनजागृती आणि प्रोत्साहन
2. संपूर्ण स्वच्छता – कठीण आणि अस्वच्छ ठिकाणी (स्वच्छता लक्षित ठिकाणे )भव्य स्वच्छता मोहीम.
3. सफाईमित्र सुरक्षा शिबिर - एक खिडकी सेवा, सुरक्षा आणि स्वच्छता कामगारांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी ओळख शिबिरे.
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2054790)
Visitor Counter : 124