संरक्षण मंत्रालय
डीआरडीओ आणि भारतीय नौदलाची ओदिशाच्या किनारपट्टीवरून VLSRSAM ची सलग दुसरी उड्डाण चाचणी यशस्वी
Posted On:
13 SEP 2024 2:47PM by PIB Mumbai
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाने, व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल (VLSRSAM) च्या एकापाठोपाठ एक यशस्वी उड्डाण चाचण्या केल्या आहेत. सलग दुसरी चाचणी 13 सप्टेंबर 2024 रोजी ओदिशातील चंडीपूर स्थित एकात्मिक चाचणी तळ येथून घेण्यात आली.
या क्षेपणास्त्राने अत्यंत कमी उंचीवरून उडणाऱ्या आणि रडारवर दिसू न येणाऱ्या अतिवेगवान हवाई लक्ष्यावर हल्ला केला आणि लक्ष्य निष्प्रभ करण्याची अचूकता आणि क्षमतेचे दर्शन घडवले. काल 12 सप्टेंबर 2024 रोजी पहिली चाचणी घेण्यात आली तेव्हाही VLSRSAM क्षेपणास्त्राने कमी उंचीवरील लक्ष्याचा भेद यशस्वीपणे पूर्ण केला. सलग घेण्यात आलेल्या या चाचण्या केवळ शस्त्र प्रणालीची विश्वासार्हता दर्शवत नाहीत तर प्रणालीतील विविध घटकांमध्ये अलीकडील काळात करण्यात आलेल्या सुधारणा देखील प्रमाणित करतात.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी डीआरडीओ , भारतीय नौदल आणि सर्व संबंधित चमूंचे कौतुक केले . ते म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे सशस्त्र दलांना तंत्रज्ञानाच्या बाबतीत आणखी चालना मिळेल.
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी देखील VLSRSAM प्रणालीच्या उड्डाण चाचण्यांमध्ये सहभागी चमूचे अभिनंदन केले.
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2054520)
Visitor Counter : 68