सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

‘संघर्ष टाळून शाश्वत विकासासाठी जाणिवपूर्वक संवाद’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघातर्फे आंतरराष्ट्रीय बौद्ध माध्यमांसाठी बैठकीच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन

Posted On: 11 SEP 2024 6:19PM by PIB Mumbai

 

संघर्ष टाळून शाश्वत विकासासाठी जाणीवपूर्वक संवाद’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ – आयबीसी आणि विवेकानंद आंतरराष्ट्रीय संघटना – व्हीआयएफ यांच्या सहयोगाने  आंतरराष्ट्रीय बौद्ध माध्यमांसाठी बैठकीच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय फूटबॉल संघाचे माजी कर्णधार बायचुंग भुतिया यांची या बैठकीला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. व्हीआयएफचे अध्यक्ष गुरुमूर्ती, आयबीसीचे महासचिव वेन जांगचुप छोईदेन, व्हीआयएफचे संचालक डॉ. अरविंद गुप्ता यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बैठकीची सुरुवात झाली. या प्रसंगी तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते ठरलेले रिकी केज उपस्थित होते.

सन्माननीय अतिथी बायचुंग भुतिया यांनी बौद्ध धम्म ही एक जीवनशैली असल्याचे अधोरेखित केले. “ भगवान बुद्धाची शिकवण शांतता आणि त्यागाचा संदेश देते,” असे ते म्हणाले. शांतता आणि बंधुभाव प्रस्थापित करण्यात बौद्ध धम्माची मोठी भूमिका असून या शिकवणीचा जगभरात प्रसार करण्याचे महत्त्वाचे कार्य माध्यमांचे आहे, असे त्यांनी सांगितले.

व्हीआयएफचे संचालक डॉ. अरविंद गुप्ता यांनी नागरी मूल्यांच्या पुनर्स्थापनेत विचार आणि कृती महत्त्वाच्या ठरतात असे सांगितले. या बाबींवर गेली कित्येक वर्षे हिंदू आणि बौद्ध विचारवंत चर्चा करत असल्याचे ते म्हणाले. बौद्ध धम्माच्या केंद्रस्थानी नैतिक वागणूक आणि ज्ञानप्राप्ती असून माध्यमांकडून संतुलित आणि नैतिक वार्तांकन होणे अनिवार्य आहे.

आयबीसीचे महासचिव शार्त्से खेन्सूर रिनपोशे जांगचुप छोईदेन यांनी बुद्धाच्या शिकवणीवर आधारित सत्य, करुणा आणि निस्वार्थी जगाच्या निर्मितीचे आवाहन केले. हाव आणि संघर्षात वाढ होत असताना बुद्धाचे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

व्हीआयएफचे अध्यक्ष गुरुमूर्ती यांनी गेल्या काहीशे वर्षांमध्ये जगाची प्रचंड हानी झाल्याकडे लक्ष वेधून घेत सांगितले की भारताने या काळात महान तत्त्वज्ञ परंपरांना जन्म दिला आहे. आधुनिक संवादात त्यांचे महत्त्वाचे स्थान असल्याचे ते म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधताना आयबीसीचे महासंचालक अभिजीत हल्दर यांनी सांगितले की या कार्यक्रमाला माध्यम प्रतिनिधींकडून लाभलेला उत्साही प्रतिसाद लक्षात घेऊन आयबीसी पुढील बैठकीचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करेल. संघर्ष टाळून शाश्वत विकास साध्य करण्यासाठी जगाने बुद्धाची शिकवण आत्मसात करण्याची हीच वेळ असल्याचे ते म्हणाले. भारत ही बुद्धाची भूमी असल्याने आम्हा सर्वांसाठी आकर्षण आहे, असे त्यांनी सांगितले.

***

S.Patil/R.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2053938) Visitor Counter : 30


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil