पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे सेमीकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन


"भारताचे सेमीकंडक्टर क्षेत्र क्रांतीच्या उंबरठ्यावर असून उल्लेखनीय  प्रगतीसह या उद्योगात परिवर्तन  घडवून आणण्यासाठी सज्ज आहे"

"आजचा भारत जगाला विश्वास देत आहे ... जेव्हा परिस्थिती वाईट असते, तेव्हा तुम्ही भारताकडे आशेने पाहू शकता"

"भारताचा सेमीकंडक्टर उद्योग विशेष डायोडसह सुसज्ज आहे ज्यामध्ये ऊर्जा दोन्ही दिशांना वाहते"

"भारतात सध्या सुधारणावादी सरकार, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि नवीन तंत्रज्ञानाची  जाण असलेली देशाची महत्त्वाकांक्षी बाजारपेठ अशी त्रिमितीय शक्ती आहे"

"ही लहान चिप भारतात शेवटच्या गावापर्यंत सेवा वितरण सुनिश्चित करण्याचे  मोठे काम करत आहे"

“जगातील प्रत्येक उपकरणात भारताने बनवलेली चिप असावी  हे आमचे स्वप्न आहे”

“जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्यात भारत एक प्रमुख भूमिका बजावणार आहे”

इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे 100% काम  भारतात व्हावे हे आमचे लक्ष्य आहे.

"मग ते मोबाईल उत्पादन असो , इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा सेमीकंडक्टर्स असो, आमचे ध्येय सुस्पष्ट

Posted On: 11 SEP 2024 1:49PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे सेमीकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन केले. यानिमित्त आयोजित प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली.  11 ते 13 सप्टेंबर दरम्यान आयोजित या तीन दिवसीय परिषदेत भारताची सेमीकंडक्टर रणनीती आणि धोरण प्रदर्शित केले जाणार आहे  ज्यामध्ये  भारताला सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनवण्याची कल्पना आहे.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी सेमी(SEMI)च्या सर्व सदस्यांचे आभार मानले. ते म्हणाले जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाशी संबंधित कार्यक्रम आयोजित करणारा भारत हा जगातील आठवा देश आहे. “भारतात येण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी आहात”, असे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले  , “21 व्या शतकातील भारतात, चिप्स कधीही कमी होत नाहीत.” ते पुढे म्हणाले की, आजचा भारत जगाला आश्वस्त करतो की , "जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवते  तेव्हा तुम्ही भारताकडे आशेने पाहू शकता."

सेमीकंडक्टर उद्योग आणि डायोड यांच्यातील संबंध अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, भारताचा सेमीकंडक्टर उद्योग विशेष डायोड्सने सुसज्ज आहे ज्यामध्ये ऊर्जा दोन्ही दिशांना वाहते. त्यांनी स्पष्ट केले की उद्योग गुंतवणूक करतात आणि मूल्य निर्माण करतात, तर  सरकार स्थिर धोरणे आणि व्यवसाय सुलभता प्रदान  करते. सेमीकंडक्टर उद्योगात वापरल्या जाणाऱ्या एकात्मिक सर्किटप्रमाणे  भारत देखील एकात्मिक परिसंस्था उपलब्ध करून देतो असे सांगत त्यांनी  भारताच्या डिझाइनर्सची बहुचर्चित गुणवत्ता अधोरेखित केली. डिझाइनिंगच्या जगात  भारताचे योगदान 20 टक्के आहे आणि ते सातत्याने वाढत आहे, अशी माहिती देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत 85,000 तंत्रज्ञ, अभियंते आणि संशोधन आणि विकास तज्ञांचे सेमीकंडक्टर  कुशल मनुष्यबळ  तयार करत आहे. "भारताचे विद्यार्थी आणि व्यावसायिक यांना या उद्योगासाठी  तयार करण्यावर आमचा भर आहे", असे सांगत पंतप्रधानांनी अनुसंधान  राष्ट्रीय संशोधन  फाऊंडेशनच्या पहिल्या बैठकीची आठवण करून दिली, ज्याचे उद्दिष्ट भारताच्या संशोधन परिसंस्थेला नवी दिशा आणि ऊर्जा देणे हे  आहे. तसेच भारताने 1 ट्रिलियन रुपयांचा विशेष संशोधन निधी स्थापन केल्याचा त्यांनी उल्लेख केला.

अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विज्ञान क्षेत्रातील सेमीकंडक्टर आणि नवोन्मेषाची  व्याप्ती आणखी वाढेल आणि सेमीकंडक्टरशी संबंधित  पायाभूत सुविधांवर सरकारचा भर असल्याचे  पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले . भारतात सध्या सुधारणावादी सरकार, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि नवीन तंत्रज्ञानाची  जाण असलेली देशाची महत्त्वाकांक्षी बाजारपेठ अशी त्रिमितीय शक्ती आहे असे स्पष्ट करून पंतप्रधान म्हणाले की 3D शक्तीची एवढी व्याप्ती तुम्हाला इतरत्र सापडणे  कठीण आहे.

भारताच्या महत्त्वाकांक्षी आणि तंत्रज्ञानाभिमुख समाजाचे वेगळेपण अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, भारतातील चिप्सचा अर्थ केवळ तंत्रज्ञानापुरता मर्यादित नाही तर ते कोट्यवधी नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचे  माध्यम आहे. भारत हा अशा चिप्सचा मोठा ग्राहक आहे हे अधोरेखित करून, पंतप्रधान मोदी यांनी भर देत सांगितले की याच चिप्सवर आम्ही जगातील सर्वोत्तम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. "ही लहान चिप भारतात शेवटच्या गावापर्यंत सेवा  वितरण सुनिश्चित करण्यात उपयुक्त ठरत आहे", असे पंतप्रधान  मोदी म्हणाले. कोरोना संकटकाळाची आठवण करून देत  मोदी म्हणाले की,जगातील सर्वात मजबूत बँकिंग प्रणाली कोलमडून पडली तेव्हा  भारतातील बँका सुरळीत सुरू होत्या. “मग ते भारताचे यूपीआय असो, रुपे कार्ड असो, डिजी लॉकर असो किंवा डिजी यात्रा असो, अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म भारतातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहेत”,असे  त्यांनी नमूद केले.  पंतप्रधान म्हणाले की आत्मनिर्भर होण्यासाठी भारत प्रत्येक क्षेत्रात उत्पादन वाढवत आहे, मोठ्या प्रमाणावर हरित संक्रमण करत आहे आणि डेटा सेंटरची मागणी देखील वाढत आहे. “जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्यात भारत मोठी भूमिका बजावणार आहे”, असे ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की जे जे होईल ते ते पाहावे अशा आशयाची एक म्हण आहे मात्र आजचा युवा आणि आकांक्षी भारत त्या भावनेनुसार चालणारा नाही. देशांतर्गत सेमीकंडक्टर चिपचे उत्पादन वाढवणे हा नव्या भारताचा मंत्र आहे. सेमीकंडक्टरच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उचललेल्या विविध पावलांची माहिती त्यांनी दिली. सेमीकंडक्टर उत्पादन सुरू करण्यासाठी सरकार 50% आर्थिक सहाय्य देत असून यामध्ये राज्य सरकारेसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असे ते म्हणाले. या धोरणांमुळे भारताने अल्पावधीत 1.5 ट्रिलिअन रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित केली असून अनेकविध प्रकल्प प्रस्तावित आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. सेमीकॉन इंडिया कार्यक्रमाचा समावेशक दृष्टीकोन मांडताना हा कार्यक्रम आघाडीवरील फॅब्स, प्रदर्शनी फॅब्स, सेमीकंडक्टर पॅकेजिंग आणि पुरवठा साखळीतील विविध महत्त्वाच्या घटकांना आर्थिक पाठबळ देतो, असे ते म्हणाले. “जगातील प्रत्येक उपकरणात भारतीय बनावटीची चिप असावी हे आपले स्वप्न आहे,” या यंदा लाल किल्ल्यावरून केलेल्या घोषणेचे स्मरण त्यांनी केले. सेमीकंडक्टरचे ऊर्जाघर बनण्यासाठी आवश्यक ते सर्व काही करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

सेमीकंडक्टर उद्योगाला आवश्यक महत्त्वाची खनिजे मिळवण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की अलीकडे घोषित केलेल्या क्रिटिकल मिनेरल मिशन अर्थात महत्त्वपूर्ण खनिज अभियानामुळे खनिजांच्या देशांतर्गत उत्पादनाला आणि आयातीला चालना मिळेल. सीमाशुल्कातून सवलत आणि महत्त्वाच्या खनिजांच्या खाणींच्या लिलावासाठी भारत वेगाने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. उच्च प्रतीच्या आणि भविष्यात वापरात येतील अशा चिपच्या निर्मितीसाठी भारतीय अंतराळ विज्ञान संस्थेत भारतीय तंत्रज्ञान संस्थांच्या सहयोगाने सेमीकंडक्टर संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा मानस त्यांनी जाहीर केला. आंतरराष्ट्रीय सहयोगाबाबत वार्ता करताना पंतप्रधानांनी ‘खनिज तेल मुत्सद्देगिरी’चे स्मरण करत आजघडीला जग ‘सिलिकॉन मुत्सद्देगिरी’च्या युगाकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले. भारत-प्रशांत आर्थिक चौकटीतील पुरवठा साखळी परिषदेच्या उपाध्यक्षपदी भारताची निवड झाली असून क्वाड सेमीकंडक्टर पुरवठा साखळी उपक्रमात भारत महत्त्वपूर्ण भागीदार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. तसेच, सेमीकंडक्टर क्षेत्रात जपान, सिंगापूर आदी देशांशी करार करण्यात आले असून अमेरिकेशी सहयोग दृढ करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.

भारताच्या सेमीकंडक्टर-केंद्रीत उद्देशाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना डिजिटल भारत अभियानाचे यश अभ्यासावे, अशी विनंती पंतप्रधानांनी केली. देशाला पारदर्शी, कार्यक्षम आणि गळतीपासून मुक्त प्रशासन मिळवून देण्याचे या अभियानाचे उद्दीष्ट असल्याचे सांगून त्याचे बहु गुणित परिणाम आज अनुभवास येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. डिजिटल भारताच्या यशासाठी गरजेच्या सुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या विकासाची सुरुवात परवडतील असे मोबाईल फोन आणि विदेच्या देशांतर्गत निर्मितीद्वारे केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. दशकभरापूर्वी मोबाईल फोनच्या सर्वात मोठ्या आयातदारांपैकी एक असलेला भारत आज मोबाईल फोनचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उत्पादक आणि निर्यातदार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 5G तंत्रज्ञान वापरात आणल्याला अवघी दोन वर्षे होत असताना 5G फोनच्या बाजारात भारताने वेगाने प्रगती केली असून आज देश जगातील 5G फोनची दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ आहे.

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचे मूल्य आज 150 अब्ज अमेरिकी डॉलर इतके असून चालू दशकाच्या अंती ते 500 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचे आणि 60 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की ही वाढ भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्राला थेट लाभदायक ठरेल. “भारतात 100% इलेक्ट्रॉनिक उत्पादन करण्याचे आमचे ध्येय आहे. भारत सेमीकंडक्टर चिपही बनवेल आणि अंतिम उत्पादनही इथेच निर्माण करेल,” त्यांनी सांगितले.

भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्र हे भारतासमोरील आव्हानांवरीलच नव्हे तर जागतिक आव्हानांवरील उत्तर आहे,” अशी आग्रही भूमिका पंतप्रधानांनी मांडली. डिझाईनच्या क्षेत्रातील ‘सिंगल पॉइंट ऑफ फेल्युअर’च्या मुद्द्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी व्यवस्थेचे एका घटकावरील अवलंबित्व समजावून दिले. हे तत्त्व पुरवठा साखळ्यांना तंतोतंत लागू होत असल्याचे ते म्हणाले. “कोविड असो वा युद्ध, पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्याचे दुष्परिणाम झाले नाहीत असा एकही उद्योग नाही,” असे त्यांनी सांगितले. चिवट पुरवठा साखळ्यांच्या महत्त्वावर भर देताना पंतप्रधानांनी भारताने विविध क्षेत्रांमध्ये अशा पुरवठा साखळ्या विकसित केल्याबाबत अभिमान व्यक्त केला आणि सांगितले की पुरवठा साखळ्यांची जपणूक करण्याच्या जागतिक मोहिमेत भारताचे महत्त्वाचे स्थान आहे.

तंत्रज्ञानातील सकारात्मक शक्ती लोकशाही मूल्यांसोबत जोडली गेल्यास ती अधिक वाढते,असे तंत्रज्ञान आणि लोकशाही मूल्ये यांच्यातील संबंधांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले.तंत्रज्ञानातून लोकशाही मूल्ये मागे घेतल्यास नुकसानही होते,असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.संकटकाळातही कार्यरत राहणारे जग निर्माण करण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्याचे   मोदींनी अधोरेखित केले.ते म्हणाले, “मोबाईलचे उत्पादन असो, वा इलेक्ट्रॉनिक्स  किंवा सेमीकंडक्टर, आमचे लक्ष्य स्पष्ट आहे—आम्हाला असे जग घडवायचे आहे जे कधीही थांबणार नाही किंवा आराम करत बसणार नाही, तर संकटकाळी सुध्दा सतत पुढेच जात राहील.आपल्या भाषणाचा समारोप करताना जागतिक प्रयत्नांना बळकटी देण्याच्या भारताच्या क्षमतांवर पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला आणि या  मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या सर्व हितसंबंधितांचे अभिनंदन केले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री  अश्विनी वैष्णव, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री  जितिन प्रसाद, सेमीचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी  अजित मनोचा,टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष आणि एनएक्सपी सेमीकंडक्टर्सचे प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ. रणधीर ठाकूर, रेनेसासचे प्रमुख कार्यकारी अधिकारी  कर्ट सिव्हर्सहिदेतोशी शिबाता आणि आयएमईसीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी  लुक व्हॅन डेन होव्ह हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

सेमीकंडक्टर डिझाइन, उत्पादन आणि तंत्रज्ञान विकास या क्षेत्रात भारताला जागतिक केंद्र म्हणून महत्त्वाचे स्थान मिळवून देणे,हे पंतप्रधानांचे ध्येय आहे.“सेमीकंडक्टरमधील भविष्यातील प्रगतीला आकार देणे” या संकल्पनेला समोर ठेवून 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान सेमीकॉन इंडिया 2024 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या  परिषदेत भारताचे सेमीकंडक्टर विषयक धोरण आणि व्यूहरचना यांचे प्रदर्शन केले जाईल ज्यामध्ये भारताला सेमीकंडक्टरमधील जागतिक केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.या परीषदेत सेमीकंडक्टर या क्षेत्रातील जागतिक  दिग्गजांच्या  नेतृत्वाच्या सहभाग असेल आणि जागतिक नेते, कंपन्या आणि सेमीकंडक्टर उद्योगातील तज्ञांना एकाच मंचावर एकत्र आणेल. या परिषदेत 250 हून अधिक प्रदर्शक आणि 150 वक्ते सहभागी होत  आहेत.

***

S.Patil/S.Kane/R.Bedekar/S.Patgonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2053726) Visitor Counter : 52