आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“विषाणू युध्द अभ्यास”: राष्ट्रीय वन हेल्थ अभियानाअंतर्गत महामारीविषयक सज्जतेबाबत मॉक ड्रील

Posted On: 03 SEP 2024 9:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 सप्‍टेंबर 2024

 

साथरोगांचे नियंत्रण करण्यासाठीच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत राष्ट्रीय वन हेल्थ अभियानाअंतर्गत (एनओएचएम) “विषाणू युद्ध अभ्यास” (विषाणूविरुद्धच्या लढ्याचा सराव) हे  मॉक ड्रील  घेण्यात आले. मानवी आरोग्य, पशुपालन तसेच वन्यजीवसंबंधी क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय संयुक्त साथरोग प्रतिसाद पथकाची (एनजेओआरटी) सज्जता आणि प्रतिसादात्मक कार्य यांचे मूल्यांकन करण्यासाठी ही सराव चाचणी घेण्यात आली. यासाठी वास्तव जगातील साथरोगाच्या फैलावाची कल्पना करण्यासाठी पशुजन्य आजाराच्या साथीचा फैलाव झाल्याचे दृश्य उभे करण्यात आले.

देशात प्रथमच करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या या सराव चाचणी उपक्रमाचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांनी कौतुक केले आहे. मनुष्यप्राणी, पशु आणि वनस्पती यांच्यासह पर्यावरणाचे देखील समग्रपणे आणि शाश्वत पद्धतीने आरोग्य राखण्यासाठी सहयोगाला प्रोत्साहन देऊन वन हेल्थ अभियानाची भूमिका यातून ठळकपणे मांडली गेली अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी), भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळ (आयसीएमआर), आरोग्य सेवा महासंचालनालय (डीजीएचएस), केंद्रीय पशुपालन आणि दुग्धविकास विभाग तसेच सामाजिक आरोग्य केंद्र यांतील डॉक्टर्स आणि कर्मचारीवर्ग या सराव चाचणीमध्ये सहभागी झाला होता.

ही सराव चाचणी पुढील दोन महत्त्वाच्या घटकांवर आधारित होती : अ) नकली साथीच्या प्रसारासाठी जबाबदार असलेल्या विषाणूच्या अस्तित्वासाठी तपासणी तसेच निश्चित निदान आणि ब)माणसांमध्ये तसेच प्राण्यांमध्ये या आजाराच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेली कार्यवाही. यासंदर्भातील प्रतिसादाचे स्वतंत्र निरीक्षकांकडून निरीक्षण करण्यात आले. एनजेओआरटीच्या निर्देशांनुसार जिल्हा आणि राज्य आरोग्य पथकांनी दिलेला प्रतिसाद बहुतांश वेळा त्वरित आणि सुयोग्य होता असे आढळून आले. या सरावानंतर आणखी सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्रे देखील निश्चित करण्यात आली.

विषाणू युध्द अभ्यास हा सराव एक यशस्वी उपक्रम म्हणून सिध्द झाला असून त्याद्वारे पशुजन्य आजारांच्या साथींप्रती भारताची सज्जता तसेच प्रतिसाद यांच्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने भविष्यातील धोरणे आखण्यासाठी सर्व संबंधित क्षेत्रांदरम्यान समन्वयीत आणि कार्यक्षम दृष्टीकोन जोपासण्याबाबत मौलिक विचारधन प्राप्त झाले.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2051543) Visitor Counter : 72