संरक्षण मंत्रालय
नवी दिल्ली येथे अखिल भारतीय एनसीसी पायदळ सैनिक शिबिराची सुरुवात
या 12 दिवस चालणाऱ्या शिबिरात 1,547 छात्र सहभागी होणार
Posted On:
03 SEP 2024 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2024
नवी दिल्ली येथे आज 03 सप्टेंबर 2024 रोजी 12 दिवसीय अखिल भारतीय एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेतील पायदळ सैनिकांच्या शिबिराची सुरुवात झाली. एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक (ब) मेजर जनरल सिद्धार्थ चावला यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. या शिबिराचा समारोप 13 सप्टेंबर 2024 रोजी होणार असून यामध्ये देशभरातील 17 संचालनालयांतून आलेले मुलगे आणि मुलींसह एकूण 1,547 छात्रसैनिक सहभागी होणार आहेत.
या शिबिरात अडथळे पार करण्याचे प्रशिक्षण, नकाशावाचन तसेच इतर अनेक स्पर्धांसह व्यापक श्रेणीच्या उपक्रमांमध्ये उपस्थित छात्रसैनिकांना सहभागी करून घेण्यात येईल. सहभागी छात्रसैनिकांतील शारीरिक सहनशीलता, मानसिक तीक्ष्णता आणि संघभावनेने काम करण्याची वृत्ती यांची परीक्षा घेऊन या गुणांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने हे उपक्रम आखण्यात आले असून त्यातून सहभागींना गुंगवून टाकणारा प्रशिक्षण अनुभव मिळेल.
एनसीसीतर्फे युवा वर्गात जोपासली जाणारी धाडस, शिस्त आणि सन्मानाची भावना उद्घाटनपर भाषणात ठळकपणे मांडत मेजर जनरल चावला यांनी एनसीसीमुळे छात्रसैनिकांना उपलब्ध होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण संधी अधोरेखित केल्या. हे पायदळ सैनिक शिबीर सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकालीन इच्छित कार्यात उत्तम कामगिरी करण्यासाठी आणि देशाप्रती सकारात्मक योगदान देण्यासाठी प्रेरित करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
केवळ आर्मी विंगमधील छात्रसैनिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या सैनिक शिबिरात देशातील युवकांमध्ये नेतृत्वगुण आणि संघभावनेने काम करण्याच्या वृत्तीचा पाया रचण्याच्या उद्देशाने व्यापक प्रशिक्षण तसेच चरित्र विकास यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2051290)