दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष टपाल तिकीट केले जारी
Posted On:
31 AUG 2024 7:43PM by PIB Mumbai
सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक विशेष टपाल तिकीट जारी केले. नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित जिल्हा न्यायाधीशांच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड, कायदा आणि न्याय तसेच संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
हे विशेष टपाल तिकिट, सर्वोच्च न्यायालयाचे भारतीय न्यायव्यवस्थेतील अमूल्य योगदान आणि राष्ट्राच्या कायदेशीर परिदृश्याला आकार देण्याच्या कामी न्यायव्यवस्थेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे प्रतीक आहे. 28 जानेवारी 1950 रोजी स्थापन झालेले सर्वोच्च न्यायालय, कायद्याचे शासन कायम राखण्यात, नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यात आणि देशभरात न्यायप्रशासन सुनिश्चित करण्यात आघाडीवर आहे.
दळणवळण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या टपाल विभागासाठी हे विशेष तिकीट जारी करणे अभिमानास्पद आहे. हे तिकीट म्हणजे भारताच्या न्यायिक इतिहासातील सर्वोच्च न्यायालयाच्या चिरस्थायी वारशाचा पुरावा आहे.
देशात न्यायाचे आणि कायद्याचे राज्य कायम राखण्यात सर्वोच्च न्यायालयाच्या वचनबद्धतेची साडेसात दशके साजरी केली जात असताना आयोजित करण्यात आलेला हा विशेष कार्यक्रम, भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे.
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
O
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2050487)
Visitor Counter : 62