आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘अवयव आणि ऊती दानाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतात प्रत्यारोपणाचे तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि कायदेशीर तरतुदींमध्ये सुधारणांची आवश्यकता’ या विषयावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे चिंतन शिबीर


ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत अशांना नवे आयुष्य देता यावे यासाठी अवयव दान आपल्या जीवनाचा भाग बनणे आवश्यक आहे – अतिरिक्त सचिव, आरोग्य मंत्रालय

Posted On: 30 AUG 2024 12:49PM by PIB Mumbai

 

ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत अशांना नवे आयुष्य देता यावे यासाठी अवयव दान आपल्या जीवनाचा भाग बनणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव एल. एस. चांगसन यांनी केले. ‘अवयव आणि ऊती दानाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतात प्रत्यारोपणाचे तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि कायदेशीर तरतुदींमध्ये सुधारणांची आवश्यकता’ या विषयावरील चिंतन शिबिराचे त्यांच्या हस्ते नवी दिल्ली उद्घाटन झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्य सेवा महासंचालक (डीजीएचएस) प्रा. डॉ, अतुल गोयल, राष्ट्रीय अवयव व ऊती प्रत्यारोपण संघटना – नोट्टोचे संचालक डॉ. अनिल कुमार, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव वंदना जैन आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

उद्घाटनाच्या भाषणात एल. एस. चांगसन म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात अवयव दानाचे महत्त्व मांडले आणि मृत्यूनंतर एका व्यक्तीने अवयव दान केले तर ज्यांचे वेगवेगळे अवयव निकामी झाले आहेत अशा जवळपास आठ रुग्णांना नवे आयुष्य मिळवून देता येते यावर त्यांनी भर दिला होता.”  देशातील अवयव निकामी झालेल्या रुग्णांच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी अवयव दानाला प्रोत्साहन देण्याच्या गरजेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांविषयी त्यांनी सांगितले, “भारत सरकारने अवयव दान व प्रत्यारोपणाबाबत ‘एक राष्ट्र, एक धोरण’ अवलंबिले आहे. यासंदर्भात राज्य सरकारांसह सल्लामसलतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी प्रामुख्याने सरकारी संस्थांमध्ये पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेत सुधारणा घडवून आणणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यावर आपण लक्ष केंद्रित करत आहोत.” अवयव दानाबाबत जनजागृतीसाठी सरकारने विविध राज्ये आणि संस्थांमध्ये ‘अंगदान जन जागरूकता अभियान’ हाती घेतल्याचे त्या म्हणाल्या.

डीजीएचएस डॉ. अतुल गोयल म्हणाले, “नोट्टोने भारतातील अवयव आणि ऊती प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात पुढाकार घेतला आहे. या चिंतन शिबिराने आपल्या व्यवस्थांच्या स्थितीबाबत आत्मपरीक्षण करण्याची संधी दिली आहे.” त्यांनी पुढे सांगितले, “आपल्या देशात परोपकाराची परंपरा आहे. जिवंतपणी अवयव दान करणारे आपल्याकडे आहेत मात्र त्याबरोबर मृत्यूनंतरच्या अवयव दानाला सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही रुग्णालयांमध्ये जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याची गरज आहे.”

दोन दिवसांच्या चिंतन शिबिरात अवयव दान व प्रत्यारोपणाशी संबंधित दहा मुख्य महत्त्वपूर्ण संकल्पना आणि इतर अनेक उपविषयांवर चर्चा अपेक्षित आहे.

चिंतन शिबिराची ठराविक उद्दीष्टे पुढीलप्रमाणे आहेत –

  • अवयव दान व ऊती दान आणि प्रत्यारोपणाला गती देण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत चर्चा करणे.
  • अवयव दान आणि गरजवंतापर्यंत अवयव पोहोचवण्याबाबत प्रक्रियेत सुधारणा घडवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आढावा घेऊन त्यावर चर्चा करणे.
  • अवयव दान व प्रत्यारोपणासंदर्भात अस्तित्वात असलेली कायद्याची चौकट अधिक बळकट करण्यासाठी कायदेशीर सुधारणांसाठी शिफारसींचा प्रस्ताव मांडणे.
  • अवयव दान आणि वाटपासाठी पूरक परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानात सुधारणा घडवून आणणे.
  • कायदेशीर चौकट भक्कम करणे, एक राष्ट्र एक धोरण, पारदर्शकतेची खात्री, व्यवस्थेत सुधारणा, अवयव प्रत्यारोपण परवडेल अशा किमतीत उपलब्ध करून देणे, सहज आणि रास्त प्रकारे व्हावे यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करण्याची उद्दीष्टे सत्रांच्या केंद्रस्थानी असतील.

राज्ये, बिनसरकारी संस्था, अवयव प्रत्यारोपण संघटना, प्रतिष्ठित प्रत्यारोपण व्यावसायिक आणि विविध सरकारी व खाजगी संस्थांच्या प्रतिनिधींसह तज्ञ या चिंतन शिबिरात सहभागी होणार आहेत.

***

S.Tupe/R.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2050269) Visitor Counter : 63