ग्रामीण विकास मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात जळगाव येथे लखपती दीदी संमेलनाला केले संबोधित


11 लाख नवीन लखपती दीदींचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली

नरेंद्र मोदी यांनी 2500 कोटी रुपयांचा फिरता निधी - सामुदायिक गुंतवणूक निधी केला जारी तसेच 5,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज बचत गटांच्या खात्यात केले वितरित

आमचे सरकार माता-भगिनींचे जीवन सुखकर करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे- मोदी

जेव्हा एक बहीण लखपती दीदी बनते तेव्हा संपूर्ण कुटुंबाचे नशीब पालटते -पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी दुप्पट ताकदीने काम करण्याची प्रतिज्ञा करूया : शिवराज सिंह चौहान

Posted On: 25 AUG 2024 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्ट 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात जळगाव येथे लखपती दीदी संमेलनात सहभागी झाले. विद्यमान सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात अलीकडेच लखपती बनलेल्या 11 लाख नवीन लखपती दीदींना त्यांनी प्रमाणपत्रे प्रदान केली तसेच त्यांचा सत्कारही केला. पंतप्रधानांनी देशभरातील लखपती दीदींशी संवादही साधला. मोदी यांनी 2,500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी केला, ज्याचा  4.3 लाख बचत गटांच्या  सुमारे 48 लाख सदस्यांना फायदा होणार आहे.  त्यांनी 5,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित केले ज्याचा  2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना फायदा होणार आहे. लखपती दीदी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले असून सरकारने तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य  ठेवले आहे.

याप्रसंगी उपस्थित असलेल्या माता-भगिनींच्या प्रचंड जनसमुदायाप्रति  कृतज्ञता व्यक्त करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. लखपती दीदी संमेलनाच्या भव्य कार्यक्रमात मोठ्या संख्येने माता आणि भगिनींच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त करत मोदी म्हणाले, “आज देशभरातील  लाखो महिला बचत गटांसाठी 6000 कोटी रुपयांहून अधिक निधी वितरित करण्यात आला आहे ”. ते पुढे म्हणाले की,  हा निधी अनेक महिलांना ‘लखपती दीदी’ बनण्यास प्रोत्साहन देईल.  पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छाही  दिल्या.

महाराष्ट्रातील माता-भगिनी राज्याच्या वैभवशाली संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवतात, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. लखपती दीदी मोहीम ही केवळ माता-भगिनींच्या उत्पन्नाला चालना देण्याचा मार्ग नसून कुटुंब आणि भावी पिढ्यांना बळकटी देणारी एक मोठी मोहीम आहे, हे अधोरेखित करून यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे कुटुंबाची क्रयशक्ती देखील वाढते हे लक्षात घेऊन पंतप्रधान म्हणाले की, “येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक स्त्रीला हे माहित आहे की जेव्हा ती उपजीविका करू लागते तेव्हा तिचे समाजातील सामाजिक स्थान उंचावते”. "जेव्हा एक बहीण लखपती दीदी बनते तेव्हा संपूर्ण कुटुंबाचे नशीब बदलते", असेही ते म्हणाले.

आज भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात महिलांचे योगदान लक्षात घेत याच महिलांच्या विकासाकडे भूतकाळात दुर्लक्ष करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.  देशातील कोट्यवधी महिलांकडे कोणतीही मालमत्ता नाही त्यामुळे त्यांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी बँक कर्ज मिळण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  “म्हणून, मी महिलांवरील ओझे कमी करण्याचे वचन दिले होते आणि मोदी सरकारने एकामागून एक महिलांच्या हिताचे निर्णय घेतले.” असे त्यांनी सांगितले. मागील सरकारच्या सात दशकांच्या सत्ता काळाची वर्तमान सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळाशी तुलना करताना पंतप्रधानांनी टिप्पणी केली की भूतकाळातील इतर कोणत्याही सरकारपेक्षा सध्याच्या सरकारने महिलांच्या कल्याणासाठी अधिक काम केले आहे.

केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री  शिवराज सिंह चौहान यांनी लखपती दीदींच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. मुसळधार पाऊस पडत असूनही  मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल चौहान यांनी दीदींचे कौतुक केले. या भगिनींचा उत्साह आणि प्रेमाला मी वंदन करतो असे ते म्हणाले.

शिवराज सिंह म्हणाले की, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे की कोणतीही बहीण लाचार होऊ नये, कोणत्याही बहिणीच्या डोळ्यातून  अश्रू वाहू नये आणि तिच्या चेहऱ्यावर सदैव हास्य असावे. आणि हे साध्य करण्यासाठी मोदींनी लखपती दीदी अभियान सुरू केले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पामुळे एक कोटी लखपती दीदी बनल्या आहेत, हे सांगताना मला अभिमान वाटत असल्याचे कृषीमंत्री म्हणाले. आज 30,000 ठिकाणी उपस्थित 11 लाख दीदींना  लखपती दीदी प्रमाणपत्र मिळत  आहे आणि दीड कोटी दीदी या कार्यक्रमात सहभागी झाल्या  आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की,  100 दिवसांमध्ये 11 लाख दीदी लखपती बनवल्या जातील, मात्र 100 दिवस पूर्ण व्हायच्या आधीच 11 लाख लखपती दीदी बनल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने 3 कोटी लखपती दीदी बनतील  असा मला विश्वास आहे असे शिवराज  सिंह चौहान म्हणाले.

चौहान म्हणाले की, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सांगितले की, विकसित भारत घडवण्यासाठी मी तिप्पट ताकदीने काम करेन.  मला माझ्या बंधू आणि भगिनींना एकच सांगायचे आहे, पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी दुप्पट ताकदीने काम करण्याची प्रतिज्ञा करूया. ते म्हणाले की ज्या भगिनी लखपती झाल्या आहेत त्या इतर भगिनींना लखपती बनवतील आणि गरिबीमुक्त गावे बनवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यात आपण कोणतीही कसर सोडणार नाही असे ते म्हणाले. चौहान म्हणाले की, हीच प्रतिज्ञा घेण्याची वेळ आहे. ते म्हणाले की, तुम्ही सर्वजण  आपले दोन्ही हात वर करा आणि प्रतिज्ञा घ्या  घ्या की जर पंतप्रधान तिप्पट ताकदीने काम करत असतील  तर आम्ही दुप्पट मेहनत करू आणि इतर भगिनींना  लखपती बनवू तसेच  विकसित भारताची देखील उभारणी करू.

 

* * *

S.Patil/PM Release+S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2048779) Visitor Counter : 9