गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज छत्तीसगडमधील रायपूर येथे अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या विभागीय कार्यालयाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन तसेच अंमली पदार्थांच्या स्थितीबाबत आढावा बैठकीचे भूषवले अध्यक्षपद


केंद्रीय गृहमंत्र्यांनी एनसीओआरडी यंत्रणे अंतर्गत सर्व 4 स्तरांवर नियमित बैठका घेण्याच्या गरजेवर दिला भर

Posted On: 25 AUG 2024 5:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्ट 2024

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज छत्तीसगडमधील रायपूर येथे अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या (एनसीबी) विभागीय कार्यालयाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे  उद्घाटन केले.  तसेच अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली छत्तीसगडमधील अंमली पदार्थांच्या स्थितीबाबत  आढावा बैठक देखील झाली. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, केंद्रीय गृह राज्यमंत्री  नित्यानंद राय, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा, केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, एनसीबीचे  महासंचालक, छत्तीसगडचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष म्हणजेच 2047 पर्यंत भारताला अंमली पदार्थमुक्त बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा  संकल्प आज देशातील प्रत्येक नागरिकाचा संकल्प बनत आहे. ते म्हणाले की, समृद्ध, सुरक्षित आणि वैभवशाली भारत निर्माण करण्यासाठी अंमली पदार्थमुक्त भारताचा संकल्प महत्त्वाचा आहे. अंमली पदार्थ ही केवळ भारताची समस्या नसून ती एक जागतिक समस्या आहे असे शाह म्हणाले.

भारतात आपण अंमली पदार्थांविरोधातील लढाई तीव्रतेने, गांभीर्याने आणि व्यापक रणनीतीसह लढलो तर आपण ही लढाई जिंकू शकतो असे अमित शाह यांनी अधोरेखित केले की. ते पुढे म्हणाले की भारतात अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीमुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका उद्भवू शकतो.  शाह म्हणाले की, अवैध अंमली पदार्थांच्या व्यापारातून कमावलेला पैसा दहशतवाद आणि नक्षलवादाला  प्रोत्साहन देतो आणि देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करतो. अंमली पदार्थांमुळे देशाची तरुण पिढी तर उध्वस्त होतेच, त्याचबरोबर  देशाची राष्ट्रीय सुरक्षाही कमकुवत होते असे ते म्हणाले.

अंमली पदार्थांविरुद्ध शून्य-सहिष्णुता धोरणावर सर्वांनी एकत्रितपणे पुढे जावे आणि अंमली पदार्थमुक्त भारताचा पंतप्रधान मोदींचा संकल्प पूर्ण करावा असे आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी केले.

अमित शाह म्हणाले की, आज एनसीबीच्या रायपूर विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण प्रदेशात अंमली पदार्थांवर नियंत्रण ठेवण्यात हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल असे ते म्हणाले. देशातील प्रत्येक राज्यात एनसीबीचे अस्तित्व असावे हा आमचा उद्देश आहे.  राज्य सरकारांच्या सहकार्याने मोदी सरकार प्रत्येक राज्यात एनसीबी कार्यालये स्थापन करून अंमली पदार्थांचा व्यापार संपुष्टात आणेल असे ते पुढे म्हणाले.

अंमली पदार्थ व्यापाराची पद्धत आज बदलली आहे आणि नैसर्गिक अंमली पदार्थांकडून आता कृत्रिम अंमली पदार्थांच्या दिशेने तो वळला आहे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सांगितले.  ते म्हणाले की छत्तीसगडमध्ये उपशामक औषधांचा वापर 1.45% आहे.  राष्ट्रीय स्तरावरच्या सरासरी वापरापेक्षा हे प्रमाण जास्त आहे. गांजाचा वापर सुद्धा 4.98 % आहे.  हे प्रमाणसुद्धा राष्ट्रीय पातळीवरील वापराच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. अंमली पदार्थ वाहतुकीचा  छडा लावण्यासाठी वैज्ञानिक कार्यपद्धतीचा वापर करण्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भर दिला. आपण ‘वरून खालपर्यंत’ आणि ‘खालून वरपर्यंत’  अशा दोन्ही पद्धतींचा वापर करून या वाहतुकीचे संपूर्ण जाळे निर्दयीपणे नष्ट करायला हवे, असे ते म्हणाले. अंमली पदार्थांच्या संपूर्ण जाळ्यावर आपण हल्ला केला नाही तर आपल्याला अंमली पदार्थ मुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, की अंमली पदार्थांचा व्यसनी  हा बळी असून जो त्याचा व्यापार करतो तो गुन्हेगार असतो. आपण चार तत्वांचे पालन करून या लढ्यात यशस्वी होऊ शकतो.  अमली पदार्थ विरोधी लढ्यातील चार तत्वे म्हणजे अमली पदार्थांचा शोध , अंमली पदार्थांच्या जाळ्याचा विध्वंस, गुन्हेगारांचा शोध आणि व्यसनींचे पुनर्वसन, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. अंमली पदार्थांविरोधी लढ्यात आपल्याला संपूर्ण सरकारी पद्धतीचा अवलंब करूनच यश मिळू शकेल असे हे त्यांनी सांगितले.

गेल्या दहा वर्षात अंमली पदार्थ नियंत्रण विभागाची कार्यक्षमता अत्यंत उत्तम झाली असल्याचे नमूद करून अमित शाह यांनी म्हटले की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अंमली पदार्थ विरोधी लढा गेल्या दहा वर्षात संस्थात्मक पातळीवर हाताळून एका निर्णायक टप्प्यावर आणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अंमली पदार्थ मुक्त भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी  सामान्य नागरिकांमध्ये तसेच  युवकांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करून  या लढ्याला  जनआंदोलनाचे व्यापक स्वरूप द्यावे लागेल असेही शाह यांनी सांगितले. नार्को समन्वय केंद्राच्या  चारही स्तरांवर नियमितपणे बैठका घेण्याची गरज आहे यावर गृहमंत्र्यांनी भर दिला ते म्हणाले की नुकत्याच सुरू केलेल्या मानस या पोर्टलचा वापर सगळ्यांकडून होणे आवश्यक आहे. अंमली पदार्थांना होणाऱ्या अर्थसहाय्याचा शोध घेण्यासाठी सगळ्या सरकारी संस्थांची मदत घ्यावी अशी सूचना शाह यांनी सर्व राज्यांना केली. संयुक्त समन्वयन समितीचा नियमित वापर करण्याच्या गरजेवरही शाह यांनी भर दिला ते म्हणाले की अंमली पदार्थाचे संपूर्ण जाळे उध्वस्त करण्यासाठी आंतरराज्य प्रकरणे अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडे सोपवली जायला हवीत.

 

* * *

S.Patil/Sushma/Vijaya/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2048758) Visitor Counter : 15