पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (113 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
Posted On:
25 AUG 2024 12:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2024
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा माझ्या सर्व कुटुंबियांचे स्वागत आहे.
आज पुन्हा एकदा आपण बोलू, देशाने साध्य केलेल्या यशाबद्दल आणि देशातील जनतेच्या सामुहीक प्रयत्नांबद्दल! 21 व्या शतकात भारतात एवढं काही घडत आहे, ज्यामुळे विकसित भारताचा पाया मजबूत होत आहे. जसे, या 23 ऑगस्टलाच आपण सर्व देशवासीयांनी पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला. मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी हा दिवस नक्कीच साजरा केला असेल, पुन्हा एकदा तुम्ही चंद्रयान-3 चे यश साजरे केले असेल. गेल्या वर्षी याच दिवशी चंद्रयान-3, चंद्राच्या दक्षिण भागात शिव-शक्ती पॉइंट या ठिकाणी यशस्वीपणे उतरले होते. भारत, हे गौरवास्पद यश मिळवणारा जगातील पहिला देश ठरला.
मित्रांनो, देशातील युवावर्गाला अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे देखील खूप फायदा झाला आहे, त्यामुळे मी असा विचार केला की आज 'मन की बात' मध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित माझ्या काही तरुण मित्रांशी का बोलू नये! माझ्यासोबत बोलण्यासाठी स्पेस टेक स्टार्ट अप- गॅलेक्स आय चा चमू सहभागी होत आहे. हा स्टार्ट-अप- नवं उद्योग, आयआयटी-मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केला होता. ही सर्व तरुण मंडळी- सुयश, डेनिल, रक्षित, किशन आणि प्रणित, आज दूरध्वनीवरून आपल्यासोबत आहेत. चला, या तरुणांचे अनुभव जाणून घेऊया.
पंतप्रधानजी: नमस्कार!
सर्व तरुण: नमस्कार!
पंतप्रधानजी: नमस्कार मंडळी!
सर्व तरुण (एकत्र): नमस्कार सर!
पंतप्रधानजी: बरं मित्रांनो, मला हे पाहून आनंद झाला की आय आय टी-मद्रासच्या महाविद्यालयीन कालखंडात निर्माण झालेली तुमची मैत्री आजही तेवढीच गाढ आहे. म्हणूनच तुम्ही एकत्र येऊन गॅलेक्स आय हा स्टार्टअप सुरू करण्याचे ठरवले. आणि आज मला त्याबद्दलही थोडे जाणून घ्यायचे आहे. याबद्दल मला जरा सांगा. सोबतच हे ही सांगा की तुमच्या तंत्रज्ञानाचा देशाला किती फायदा होणार आहे!
सुयश: हो सर, माझे नाव सुयश आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही एकत्र आहोत. सर्वजण आयआयटी-मद्रासमध्ये एकत्र भेटलो. आम्ही सगळे तिथे अभियांत्रिकीच्या वेगवेगळ्या वर्षात शिकत होतो. आणि त्यावेळी आम्ही असा विचार केला की हायपरलूप नावाचा एक प्रकल्प आहे, जो आम्हाला एकत्र करायचा होता. त्याच दरम्यान आम्ही एक चमू बनवला, त्याचे नाव होते 'आविष्कार हायपरलूप', यासोबत आम्ही अमेरिकेलाही गेलो. त्या वर्षी आमचा संघ आशियातील एकमेव संघ होता जो तिथे गेला आणि आपल्या देशाचा झेंडा….. आम्ही तिथे फडकवला. आणि आम्ही जगभरातील सुमारे 1500 (पंधराशे) संघांपैकी सर्वोत्तम 20 संघांमध्ये होतो.
पंतप्रधानजी: चला! पुढचे ऐकण्यापूर्वी यासाठी मला तुमचे अभिनंदन तर करु दे…
सुयश: खूप खूप आभार आपले! त्या यशप्राप्ती दरम्यान आमची मैत्री अधिक घट्ट झाली आणि अशा प्रकारचे अवघड प्रकल्प, आव्हानात्मक प्रकल्प करण्याचा आत्मविश्वासही आम्हाला आला. आणि त्याच वेळी, स्पेस एक्स पाहून आणि आपण अंतराळ क्षेत्राची दारं खाजगीकरणासाठी उघडण्याचा एक ऐतिहासिक निर्णय देखील 2020 मध्ये घेतला…तर आमचे एकंदर उत्साह खूप वाढला. आणि मी आता रक्षितला विनंती करतो की आम्ही आता काय निर्मिती करत आहोत आणि त्याचा फायदा काय आहे, हे त्याने सांगावे.
रक्षित: हो सर, तर माझे नाव रक्षित आहे. आणि या तंत्रज्ञानाचा आपल्याला कसा फायदा होईल, मी याचे उत्तर देतो.
पंतप्रधानजी: रक्षित, तुम्ही उत्तराखंड मधील नेमके कुठले आहात?
रक्षित: सर, मी अल्मोड्या चा आहे.
पंतप्रधानजी: अच्छा तर तुम्ही बाल मिठाईवाले आहात का?
रक्षित: हो सर! हो सर! आमची बाल मिठाई प्रसिद्ध आहे.
पंतप्रधानजी: आपले ते लक्ष्य सेन आहेत ना, ते मला नेहमी बालमिठाई खाऊ घालत असतात. बरं रक्षित, बोला!
रक्षित: तर आम्ही बनवत असलेले हे तंत्रज्ञान अंतराळातून ढगांच्या आरपार पाहू शकते आणि रात्रीही पाहू शकते, त्यामुळे आपण दररोज देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात वरुन स्पष्ट छबी टिपू शकतो. आणि यातून जी माहिती मिळेल ती आम्ही दोन क्षेत्रांच्या विकासासाठी वापरणार आहोत. एक म्हणजे भारताला अत्यंत सुरक्षित बनवणे. आपल्या सीमा, आपले महासागर, समुद्र, यांची आपण रोज टेहळणी करु शकतो. यामुळे शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येईल आणि आपल्या सशस्त्र दलांना गुप्त माहिती देता येईल. दुसरे क्षेत्र म्हणजे भारतातील शेतकऱ्यांना सक्षम करणे. म्हणून आम्ही भारतातील कोळंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधीच एक उत्पादन तयार केले आहे जे त्यांच्या कोळंबी शेतीच्या खाचरातील पाण्याची गुणवत्ता अंतराळातून मापू शकेल, ते ही सध्याच्या खर्चाच्या एक दशांश दराने! आणि आमची अशी इच्छा आहे की याही पुढे जाऊन आपण जगासाठी सर्वोत्तम दर्जाच्या उपग्रह प्रतिमा उपलब्ध करून द्याव्यात आणि ग्लोबल वार्मिंग-जागतिक तापमान वाढीसारख्या जागतिक समस्यांशी लढण्यासाठी आपण जगाला सर्वोत्तम दर्जाची उपग्रह माहिती प्रदान करुन द्यावी.
पंतप्रधानजी: याचा अर्थ असा की तुमचा चमू जय जवान सुद्धा करणार आणि जय किसान सुद्धा करणार!
रक्षित: हो सर अगदी!
पंतप्रधानजी: मित्रांनो, तुम्ही एवढे छान काम करत आहात… मला हे सुद्धा जाणून घ्यायचे आहे की तुम्ही बनवत असलेल्या तंत्रज्ञानाची अचूकता केवढी आहे?
रक्षित: सर, आपण 50 सेंटीमीटरपेक्षा कमी उकल काढू शकू…म्हणजे तेवढ्या रिझोल्यूशन पर्यंत जाऊ शकू. आणि आपण एका वेळी अंदाजे 300 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्राची छबी टिपण्यात सक्षम होऊ.
पंतप्रधानजी: चला, मला वाटतं की जेव्हा देशवासीय हे ऐकतील तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटेल. पण मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे.
रक्षित: होय सर.
पंतप्रधानजी: अंतराळ परिसंस्थेत सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. आता यामध्ये आणखी कोणते बदल होतील, असे तुमच्या चमूला वाटते ?
किशन: माझे नाव किशन आहे, गॅलेक्स आय सुरु झाल्यापासून आम्ही ईन-स्पेस येताना पाहिले आहे आणि आम्ही 'जिओ-स्पेशियल डेटा पॉलिसी' आणि इंडिया स्पेस पॉलिसी' यासारखी अनेक धोरणे येताना पाहिली आहेत आणि आम्ही गेल्या 3 वर्षांत अनेक बदल होताना पाहिले आहेत आणि अनेक प्रक्रिया, अनेक पायाभूत सुविधा आणि अनेक सुविधा पाहिल्या आहेत….. त्या इस्रोने उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याही अतिशय चांगल्या पद्धतीने! आता हेच पहा… आपण इस्रोमध्ये जाऊन आपल्या हार्डवेअरची चाचणी करू शकतो, हे आता अगदी सहज करता येते. 3 वर्षांपूर्वी या प्रक्रिया फारशा नव्हत्या आणि त्या आमच्यासाठी आणि इतर अनेक स्टार्ट-अपसाठी खूप उपयुक्त आहेत. आणि अलीकडील थेट परकीय गुंतवणुकीच्या धोरणांमुळे आणि सुविधांच्या उपलब्धतेमुळे, स्टार्ट-अप्स सुरु करण्यासाठी भरपूर प्रोत्साहन मिळत आहे आणि असे स्टार्ट-अप्स येऊ शकतात आणि अशा क्षेत्रात अगदी सहज आणि चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात….ज्यामध्ये एरवी विकास साधणे सहसा खूप कठीण, खर्चिक आणि वेळखाऊ होऊन जाते. परंतु सध्याची धोरणे आणि इन-स्पेस आल्यानंतर, स्टार्ट-अपसाठी अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. यावर माझा मित्र डेनिल चावडाही काही बोलू इच्छितो.
पंतप्रधानजी: डेनिल….बोला!
डेनिल: सर, आम्ही आणखी एक निरिक्षण केले आहे, आम्ही पाहिलंय… अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या विचारसरणीत आता बदल झाला आहे. पूर्वी त्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावेसे वाटायचे आणि तिथे जाऊन काम करावेसे वाटायचे…विशेष करुन अंतराळ क्षेत्रात! पण आता भारतात अंतराळ परिसंस्था खूप चांगल्या प्रकारे विकसित होत आहे हे बघता या मंडळींना भारतात परत येऊन या परिसंस्थेचा भाग व्हावेसे वाटत आहे. तर, हा असा खूप छान प्रतिसाद आम्हाला पहायला मिळतोय आणि यामुळेच आमच्याही कंपनीत असे काही लोक बाहेरुन परत येऊन काम करत आहेत.
पंतप्रधानजी: मला वाटते की, किशन आणि डेनिल यांनी या ज्या दोन्ही पैलूंचा उल्लेख केला, तुम्ही दोघांनीही उल्लेख केला….मला खात्री आहे की अनेकांचे याकडे लक्ष गेले नसेल की जेव्हा एका क्षेत्रात सुधारणा होते, तेव्हा त्या सुधारणांचे किती बहुविध परिणाम होतात! किती लोकांना फायदा होतो! आणि तुम्ही केलेल्या वर्णनावरून…कारण तुम्ही त्या क्षेत्रात आहात तर तुमच्या हे नक्कीच लक्षात येते आणि तुम्ही हेही पाहिले आहे की, देशातील युवावर्गाला आता या क्षेत्रात आपले भविष्य आजमावायचे आहे…. आपल्या गुणवत्तेचा उपयोग करायचा आहे. तुमचे निरीक्षण खूप चांगले आहे. दुसरा प्रश्न मी विचारू इच्छितो की, ज्या तरुणांना स्टार्ट-अप्स आणि अंतराळ क्षेत्रामध्ये यश मिळवायचे आहे त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
प्रणित: मी प्रणित बोलतोय आणि मी आपल्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे.
पंतप्रधानजी: हा प्रणित, बोला!
प्रणित: सर, माझ्या काही वर्षांच्या अनुभवावरून मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. सर्व प्रथम, जर तुम्हाला स्वतःला स्टार्ट-अप सुरु करायचा असेल, तर हीच संधी आहे….कारण संपूर्ण जगात, भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेला देश आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे अमाप संधी आहेत. जसे…..वयाच्या 24 व्या वर्षी मला या विचारानेच अभिमान वाटतो की पुढच्या वर्षी आपला उपग्रह प्रक्षेपित होईल….ज्याच्या आधारावर आपले सरकार काही मोठे निर्णय घेईल आणि त्यात आमचाही छोटासा खारीचा वाटा असेल. अशा काही राष्ट्रीय प्रभावशाली प्रकल्पांवर काम करायला मिळावे…. हा असा उद्योग आहे आणि ही अशी वेळ आहे…..कारण या अंतराळ उद्योगाची आज ही सुरुवात होत आहे. त्यामुळे मी माझ्या तरुण मित्रांना सांगू इच्छितो की ही संधी केवळ प्रभाव निर्माण करण्यासाठीच नाही तर त्यांच्या स्वत:च्या आर्थिक वृद्धीसाठी आणि जागतिक समस्या सोडवण्याची संधी आहे. तर आपण आपापसात बोलत असतो की आपण लहानपणी म्हणायचो….. आपण मोठे झाल्यावर नट, खेळाडू बनू….तर अशा अनेक इच्छा प्रदर्शित व्हायच्या. पण आज जर आपण ऐकले की कोणी म्हणतोय…मोठा झाल्यावर त्याला उद्योजक व्हायचे आहे, त्याला अंतराळ उद्योगात काम करायचे आहे….. तर हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे की या संपूर्ण परिवर्तनात आम्ही एक छोटीशी भूमिका बजावत आहोत.
पंतप्रधानजी: मित्रांनो, प्रणित, किशन, डेनिल, रक्षित, सुयश, तुमची मैत्री एक प्रकारे जितकी गाढ आहे तितकाच तुमचा स्टार्ट-अप प्रबळ आहे. म्हणूनच तुम्ही लोक इतके छान काम करत आहात. मला काही वर्षांपूर्वी आयआयटी-मद्रासला भेट देण्याची संधी मिळाली आणि त्या संस्थेच्या उत्कृष्टतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. आणि अशीही आयआयटीबद्दल संपूर्ण जगात आदराची भावना आहे आणि जेव्हा इथून बाहेर पडणारे आपले लोक भारतासाठी काम करतात तेव्हा ते नक्कीच काहीतरी चांगले योगदान देतात. तुम्हा सर्वांना आणि अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या इतर सर्व स्टार्ट-अपना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तुम्हा पाचही मित्रांशी बोलून मला खूप आनंद झाला. बरं चला, खूप खूप धन्यवाद मित्रांनो!
सुयश: खूप खूप धन्यवाद!
मित्रांनो, एक प्रकारे प्रणित, किशन रक्षित आणि डनिल आणि सुयश यांची जितकी मैत्री मजबूत आहे. तितकंच मजबूत आपलं स्टार्ट अपही आहे.
माझ्य़ा प्रिय देशवासियांनो, या वर्षी मी लाल किल्ल्यावरून राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख युवकांना राजकीय व्यवस्थेशी जोडलं जाण्याचं आवाहन केलं होतं. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि यावरून किती मोठ्य़ा संख्येने आपले युवक राजकारणात येण्यास तयार आहेत. हे लक्षात येत फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची योग्य संधीची गरज आहे. या विषयावर मला देशभरातील युवकांची पत्रे मिळाली आहेत. समाजमाध्यमांवर मला जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे. लोकांनी मला अनेक प्रकारच्या सूचना पाठवल्या आहेत. काही युवकांनी मला पत्रात म्हटलं आहे की हे त्यांच्यासाठी खरोखरच अकल्पनीय आहे. आजोबा किंवा आईवडिलांचा राजकीय वारसा नसल्याने इच्छा असूनही ते राजकारणात येऊ शकत नव्हते. अनेक युवकांनी मला लिहीलें आहे की त्यांच्याकडे पायाभूत स्तरावरील काम करण्याचा चांगला अनुभव आहे आणि म्हणूनच ते लोकांच्या समस्या सोडवण्याच्या कामी मदत करू शकतात. काही युवकांनी हेही लिहलं आहे की घराणेशाहीच राजकारण नव्या प्रतिभावान शक्तींना पुढे येऊ देत नाही. काही युवकांनी म्हटलं की अशा प्रकारच्या प्रयत्नांनी आपल्या लोकशाहीला आणखी बळकटी मिळेल. मी या विषयी सूचना पाठवणाऱ्या सर्वांना धन्यवाद देतो. मला आशा आहे की आता आपल्या सामूहिक राजकीय पार्श्वभूमी नसलेले युवक सुद्धा राजकारणात पुढे येऊ शकतील. त्यांचा अनुभव आणि त्यांचा उत्साह देशाच्या उपयोगी पडेल.
मित्रांनो, स्वातंत्र्यसंग्रामात असे अनेक लोक प्रत्येक क्षेत्रात पुढे आले होते ज्यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यांनी स्वतःला देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिलं होते. आज आपल्याला विकसित भारत होण्याचं लक्ष्य़ साध्य़ करण्य़ासाठी पुन्हा त्याच प्रकारच्या भावनेची गरज आहे. मी आपल्या सर्व युवक मित्रांना सांगेन की त्यांनी या अभियानात स्वतःला जोडून घ्यावं. आपलं हे पाऊल आपलं आणि देशाचं भविष्य़ बदलवून टाकणारं ठरेल.
माझ्य़ा प्रिय देशवासियांनो, प्रत्येक घरी तिरंगा आणि संपूर्ण देशात तिरंगा या अभियानाने यावेळी अत्युच्य पातळी गाठली. देशाच्या कानाकोपऱ्यात या अभियानाशी संबंधीत छायाचित्र प्रचंड संख्येन आली आहेत आपण घरावर तिरंगा फडकलेला पाहिला, शाळा महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये तिरंगा फडकलेला पाहिला. लोकांनी आपल्या दुकानांमध्ये, कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवला. लोकांनी आपल्या डेस्क टॉप, गाड्या आणि मोबाईलवर तिरंगा लावला होता. जेव्हा लोक एकत्र येऊन आपल्या भावना प्रकट करतात तेव्हा या प्रकारची अभियाने प्रचंड यशस्वी होतात. आता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर जी छाय़ाचित्रे पहात आहात ती जम्मू काश्मीरच्या रियासीच इथे 750 मीटर लांब झेंड्यासहित तिरंगा रॅली काढण्यात आली आणि ही रॅली जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलावर काढण्यात आली होती. ज्यांनी ही छायाचित्र पाहिली त्याच मन आनंदाने भरून आलं. श्रीनगरच्या दाल सरोवरातील तिरंगा यात्रेची मनमोहक छाय़ाचित्र आपण सर्वांनी पाहिली. अरूणाचल प्रदेशच्या पूर्व कामेंग जिल्ह्यातही 600 फूट लांब तिरंग्यासह रॅली काढण्यात आली. देशाच्या अन्य राज्यातही सर्व वयाचे लोक, अशाच प्रकारे तिरंगा यात्रांमध्ये सहभागी झाले. स्वातंत्र्य दिन आता एक सामाजिक पर्व होत आहे. आपणही अनुभव घेतला असेल. लोक आपल्याघरांना तिरंगी माळांनी सजवतात. स्वयंसहाय्यता समूहाशी जोडल्या गेलेल्या महिला लाखो झेंडे तयार करतात. ई कॉमर्स मंचावर तिरंग्याशी संबंधीत रंगाच्या सामानाची विक्री वाढते. स्वातंत्र्य दिनी देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात स्थल, जल आणि नभ प्रत्येक ठिकाणी आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे तीन रंग दिसले. हर घर तिरंगा वेबसाईटवर पाच कोटीहून अधिक सेल्फी पोस्ट केल्या गेल्या. या अभियानानं संपूर्ण देशाला एका सूत्रानं बांधल आहे आणि हाच तर एक भारत श्रेष्ठ भारत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मनुष्य आणि प्राणी यांच्या प्रेमळ संबंधावर आधारित कितीतरी चित्रपट आपण पाहिले असतील. पण एक खरी गोष्ट आसामात घडतं आहे. आसामच्या तिनसुकिया जिल्ह्याच्या बोरेकुरी गावात मोरान समुदायाचे लोक राहतात आणि याच गावात राहतात हुलॉक गिबन. ज्यांना होलो बंदर असं म्हटले जात. हुलॉक गिबन्सनी याच गावाला आपलं घर मानलं आहे आणि आपल्याला हे जाणून अत्यंत आश्चर्य वाटेल की इथल्या माणसांचे गिबन्सशी घनिष्ट मैत्रीचे संबंध आहेत. गावातील लोक आजही आपली पारंपरिक मूल्य जपतात आणि म्ह्णून त्यांनी आपल्या कृतीतून गिबन्सशी सबंध आणखी मजबूत केले. जेव्हा ग्रामस्थांना समजलं की गिबन्सना केळी खूप आवडतात तेव्हा त्यांनी केळ्य़ांची शेती सुरू केली. याशिवाय त्यांनी हे निश्चित केलं की आपल्या नातेवाईकांच्या जन्म आणि मृत्युशी संबंधीत रीतीरिवाज गिबन्सच्या बाबतीतही पाळले जातील. त्यांनी गिबन्सना नावही दिली आहेत. नुकताच या गिबन्सना कमी उंचीवरून जाणाऱ्या विजेच्या तारांच्या संकटाचा सामना करावा लागत होता. या लोकांनी हे प्रकरण सरकारसमोर आणल आणि लवकरच त्यावर तोडगाही काढला. मला सांगण्यात आलं की आता हे गिबन्स छायाचित्रासाठी पोजही देतात.
प्राणिमात्रांवर प्रेम करण्यात आपले अरूणाचल प्रदेशातील युवक मित्रही अग्रेसर आहेत. अरूणाचलमध्ये काही युवक साथीदारांनी थ्री डी प्रिटिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यास सुरूवात केली आहे का माहिती आहे कारण. शिंग आणि दात यासाठी होणाऱ्या शिकारी पासून त्या प्राण्यांना त्यांना वाचवायचा आहे नाबम बापू आणि लिखानाना यांच्या नेतृत्वाखाली हा चमू प्राण्यांच्या शिंग आणि दात अश्या वेगवेगळ्या अवयवांच्या 3D प्रतिमा तयार करत आहेत या प्रतिमा वापरुण टोपी आणि ड्रेस तयार केले जातात, अत्यंत कमालीचा हा पर्याय आहे ज्यात पर्यावरण पूरक साहित्याचा वापर केला जातो. अशा अद्भुत प्रयत्नांची प्रशंसा करू तितकी कमीच आहे. मी तर असे म्हणेन की अधिकाधिक स्टार्ट अप्सनी या क्षेत्रात याव त्यामुळे आपल्या पशुप्राण्यांचं संरक्षणही होईल आणि परंपराही चालत राहील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यात असे काही विशेष घडत आहे जे आपण अवश्य माहिती करून घ्यावं. तिथे आपल्या स्वच्छता कर्मचारी बंधुभगिनींनी कमाल केली आहे. या बंधुभगिनींनी आपल्याला कचऱ्यातून संपत्ती हा संदेश वास्तवात आणून दाखवला आहे. या टीमने झाबुआच्या पार्कमध्ये कचऱ्यापासून अद्भुत कलाकृती तयार केली आहे. आपल्या या कामात त्यांनी आसपासच्या क्षेत्रातील प्लॅस्टिक कचरा, वापरलेल्या बाटल्या, पाईप्स, टायर्स गोळा केले. या कलाकृतीत हेलिकॉप्टर्स, टायर आणि तोफांचाही समावेश आहे. सुंदर अश्या हॅगिंग फुलदाण्या तयार करण्यात आल्या आहेत. येथे वापरण्यात आलेल्या टायर्सचा उपयोग आरामशीर बाके बनवण्यासाठी केला गेला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या या पथकाने रिड्यूस, रियूज आणि रिसायकलचा मंत्र अंगीकारला आहे. त्यांच्या प्रयत्नांनी बाग अत्यंत सुंदर दिसू लागली आहे. ती पाहण्यासाठी, स्थानिकांसमवेत आसपासच्या जिल्ह्यातील लोकही येऊ लागले आहेत.
मित्रांनो, मला आनंद आहे की आज आपल्या देशात अनेक स्टार्टअप टीम्स पर्यावरणाला चालना देण्यासाठी अशा प्रकारच्या प्रयत्नांत गुंतल्या आहेत. ई कॉन्शस नावाची एक टीम प्लॅस्टिक कचऱ्याचा उपयोग पर्यावरण स्नेही वस्तु तयार करण्या साठी करत आहे. ही कल्पना त्यांना आपली पर्यटन स्थळे विशेषतः पहाडी क्षेत्रात पसरलेला कचरा पाहून सुचली. अशाच लोकांच्या आणखी एका टीमने ईकोकारी नावाचं स्टार्ट अप सुरू केलं आहे. प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू ते तयार करतात. मित्रानो, खेळण्य़ांच रिसायलिंग हे असंच एक क्षेत्र आहे की ज्यात आपण सर्व मिळून काम करू शकतो. आपल्याला ही माहित असतं की खेळण्य़ांचा लवकरच मुलांना किती कंटाळा येतो. काही मुलं अशी असतात जी याच खेळण्यांची स्वप्ने पाहात असतात. ज्या खेळण्यांनी आता आपली मुलं खेळत नाहीत ती आपण जिथे त्यांचा उपयोग होईल अशा ठिकाणी देऊ शकतो. हा सुद्धा पर्यावरण रक्षणाचा उत्तम मार्ग आहे. आपण सर्वानी मिळून प्रयत्न केले तर पर्यावरणाच रक्षण होईल आणि देशही पुढे जाईल.
माझ्या प्रियदेशवासियांनो, काही दिवसांपूर्वीच आपण 19 ऑगस्टला रक्षाबंधनचा हा सण साजरा केला. त्याच दिवशी जगभरात संस्कृत दिनही साजरा करण्य़ात आला. आजही देशविदेशात संस्कृत विषयी विशेष रुची असलेली आढळते. अनेक देशांमध्ये संस्कृत भाषेशी संबंधित संशोधन आणि प्रयोग होत आहेत या पुढची चर्चा करण्यापूर्वी मी आपल्याला एक लहानशी ध्वनीफीत ऐकवतो.
#AUDIO CLIP#
मित्रानो, या ध्वनीफीतीचा संबंध युरोपातील एक देश लिथुएनियाशी आहे. तेथील एक प्राध्यापक व्हायटिस व्हिटुनास यांनी एक आगळा वेगळा प्रयोग केला आणि त्याला नाव दिलं आहे संस्कृत ऑन दि रिव्हर्स. काही लोकांचा एक समूह तेथे नेरिस नदीच्या किनारी जमला आणि त्यांनी वेदांच आणि गीतेच पठण केल. येथे असे प्रयत्न गेल्या काही वर्षापासून सुरू आहेत. आपणही संस्कृतला प्रोत्साहन देण्यासाठी असेच प्रयत्न करत रहा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या सर्वांच्या जीवनात तंदुरूस्तीला अत्यंत महत्व आहे. तंदुरूस्त रहाण्यासाठी आपल्याला आपले खाणे पिणे, राहणे याबाबतीत दक्ष राहावं लागतं. लोकांना फिटनेसे बद्दल जागरूक करण्यासाठीच तर आपण फिट इंडिया अभियान सुरू केलं. आरोग्य संपन्न राहण्यासाठी आज प्रत्येक वयोगटातील लोक, प्रत्येक वर्गातील लोक योगासनांचा आधार घेत आहेत. लोक आपल्या जेवणात सुपर फुड मिलेट्स म्हणजे श्रीअन्नाचा समावेश करू लागले आहेत. या सर्व प्रयत्नांचा असाच उद्देष्य आहे की प्रत्येक कुटुंब आरोग्यसंपन्न राहो. हाच या सगळ्या प्रयत्नांचा उद्देश आहे.
मित्रांनो, आपल कुटुंब, आपला समाज आणि आपला देश यांचं भविष्य आपल्या मुलांच्या भवितव्यावर अवलंबून आहे. आणि मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी त्यांना पोषणयुक्त आहार मिळणं गरजेचं आहे मुलांचं पोषण ही देशाची प्राथमिकता आहे. वास्तविक त्यांच्या पोषण आहारावर आपल सातत्यानं लक्ष असतं. परंतु देश त्यांच्या पोषण आहारावर एका विशिष्ट महिन्यात विशेष लक्ष देत असतो. या साठी प्रत्येक वर्षी देशभरात संपूर्ण सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. पोषणाबाबत लोकाना जागरूक करण्यासाठी पोषण मेळा, अनिमिया जागृती शिबीर, नवजात शिशुंच्या घरी भेट, वेबिनार, सेमिनार. असे अनेक उपाय अमलात आणले जातात. अनेक अंगणवाड्यांत आई आणि मुलांची समिती स्थापन केली गेली आहे. ही समिती कुपोषित मुलं, गर्भवती महिला आणि नवजात शिशुंच्या मातांवर देखरेख ठेवते. नवजात शिशुना सातत्यानं ट्रँक करून त्यांच्या पोषणाची व्यवस्था केली जाते. त्यांच्यावर सातत्याने देखरेख केली जाते गेल्या वर्षी पोषण अभियानाला नव्या शिक्षण धोरणाशी जोडलें गेलं आहे. पोषण सुद्धा शिक्षण सुद्धा या अभियानाच्या अंतर्गत मुलांच्या संतुलित विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात आल आहे. आपल्यालाही आपल्या क्षेत्रातील पोषणाप्रती जागरूकता अभियानाशी अवश्य जोडले गेलं पाहिजे, आपल्या एका लहानशा प्रयत्नाने कुपोषणाच्या विरोधातील या लढाईला खूप मोठ बळ मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळच्या मन की बातमध्ये इतकंच. मन की बात मधून आपल्याशी संवाद साधल्यानं मला नेहमीच प्रसन्न वाटतं. असं वाटतं की मी माझ्या कुटुंबामध्ये बसून हलक्या फुलक्या वातावरणात आपल्या मनातल्या गोष्टी तुमच्याशी बोलत आहे. तुमच्याशी मनाने जोडला जात आहे. आपल्या प्रतिक्रिया, आपल्या सूचना माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहेत. येत्या काही दिवसात अनेक सण येत आहेत. मी आपल्या सर्वांना त्यासाठी शुभेछा देतो. जन्माष्टमीचा सणही आहे. पुढच्या महिन्यात सुरूवातीला गणेशोत्सव आहे. ओणमचा सणही जवळच आहे. मिलाद- उन- नबीच्या सुद्धा शुभेच्छा देतो.
मित्रांनो, या महिन्याच्या 29 तारखेस तेलुगू भाषा दिनही आहे. ही खरोखरच अद्भुत भाषा आहे. जगभरातल्या सर्व तेलुगू भाषकांना तेलुगू भाषा दिनाच्या शुभेच्छा देतो.
प्रपंचं व्याप्तंगा उन्न
तेलुगू वारिकी,
तेलुगू भाषा दिनोत्सव शुभाकांक्षलू
मित्रांनो या पावसाळ्याच्या दिवसात काळजी घेण्याबरोबरच वर्षा जलसंचयन मोहिमेमध्ये आपण सहभागी व्हावं अशी मी आपल्याला पुनःपुन्हा विनंती करतो. एक पेड मा के नाम या अभियानाची मी आपणा सर्वांना आठवण करून देऊ इछितो, जास्तीत जास्त झाडं लावा आणि इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहन द्या. येत्या काही दिवसात पॅरिसमध्ये पॅरोऑलिम्पिक्स स्पर्धा होत आहे आपले दिव्यांग क्रीडापटू तिथे दाखल झाले आहेत एकशे चाळीस कोटी भारतीय या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. आपणही #CHEER4BHARAT# हँश टँग वापरुन आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्या पुढच्या महिन्यात आपण पुन्हा एकदा भेटू आणि अनेक विषयांवर चर्चा करू तोपर्यंत मला निरोप द्या अत्यंत आभार नमस्कार.
* * *
NM/AIR, Mumbai/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2048704)
Visitor Counter : 138
Read this release in:
Odia
,
Gujarati
,
Telugu
,
Manipuri
,
Assamese
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam