भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

जम्मू आणि काश्मिर तसेच हरियाणा विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सामान्य निरिक्षक, पोलीस आणि व्यय निरीक्षकांना माहिती देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून एक दिवसीय सत्राचे आयोजन

Posted On: 22 AUG 2024 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑगस्ट 2024

 

जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी या राज्यात तैनात केल्या जाणाऱ्या निरीक्षकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने आज एक माहिती सत्र आयोजित केले होते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. एस. एस संधू यांनी वैयक्तिकरित्या या निरीक्षकांना त्यांना सोपवण्यात आलेल्या  मतदारसंघातील त्यांच्या महत्त्वपूर्ण आणि जबाबदार भूमिकेची  माहिती दिली.

नवी दिल्लीतील रंग भवन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या माहिती सत्राला, प्रशासकीय सेवेतील तसेच पोलीस सेवेतील अधिकारी तसेच भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आणि इतर काही केंद्रीय सेवांमधील 400 हून अधिक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये सुमारे 200 सामान्य निरीक्षक, 100 पोलीस निरीक्षक आणि 100 व्यय  निरीक्षक तैनात केले जाणार आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निरीक्षकांना त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव करून दिली आणि  निरीक्षकांनी आयोगाचे प्रतिनिधी म्हणून व्यवसायिकपणे वागावे  तसेच उमेदवार आणि सर्वसामान्य जनतेसह सर्व संबंधितांसाठी ते सहज उपलब्ध असावेत यावर  भर दिला.  भाषेतील अडथळे दूर करून संवादात कोणतेही अंतर राहणार नाही याची काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.  पक्ष, उमेदवार, मतदार आणि आयोग यांचेही निरीक्षकांवर लक्ष असेल, असे सांगून मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी त्यांच्या सूचना  महत्त्वपूर्ण ठरतील.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडू नये यासाठी खोटे आरोप आणि अफवा पसरवणाऱ्यांच्या बाबतीत निरीक्षकांनी वेळोवेळी सावध राहून कारवाई करावी अशा सूचना त्यांनी  दिल्या.

निवडणुका मुक्त  आणि पारदर्शक  पद्धतीने पार पडाव्यात यासाठी  निरीक्षकांनी संपूर्ण निवडणूक व्यवस्थेकडे  लक्ष द्यावं यावर निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी भर दिला. या विधानसभा निवडणुका अटीतटीने लढवल्या जाणार आहेत हे नमूद करत  त्यांनी निरीक्षकांची भूमिका या निवडणुकांमध्ये महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. सुगम्यता, स्पष्टता  आणि वेळेवर प्रतिसाद देणे या गोष्टी निवडणुकांच्या आयोजनाभोवती सकारात्मक  वातावरण तयार करतात म्हणून त्या आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले.

सर्व निरीक्षकांना महत्त्वाच्या सूचनांची माहिती देण्यात आली जेणेकरून आयोगाच्या अनेक नव्या उपक्रम आणि निर्देशांबाबत ते सजग राहतील. दिवसभर  चाललेल्या या माहिती सत्रात निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ निवडणूक उपायुक्त, डीईसी आणि डीजी या अधिकाऱ्यांकडून निरीक्षकांना निवडणूक व्यवस्थापनाच्या विविध पैलूंबाबत सर्वसमावेशक आणि सविस्तर माहिती देण्यात आली.

प्रभावी आणि कार्यक्षम निवडणूक प्रक्रिया तसेच मतदात्यांच्या सुविधेसाठी निवडणूक आयोगाने हत्ती घेतलेले विविध माहिती तंत्रज्ञान उपक्रम आणि मोबाईल ॲप्लिकेशन्स याबद्दल निरीक्षकांना माहिती देण्यात आली. 

 

* * *

S.Kane/Shraddha/Vijaya/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2047729) Visitor Counter : 37


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu