उपराष्ट्रपती कार्यालय

भारताचा उदय हे जागतिक स्थैर्य आणि शांततेचे प्रतीक असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन

Posted On: 21 AUG 2024 3:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2024

ग्लोबल साउथच्या प्रगतीला चालना देण्यासाठी भारताचा समावेशक, बहुपक्षीय दृष्टीकोन महत्वाचा असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. ते आज 19व्या सीआयआय भारत-आफ्रिका व्यापार परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. भारताचा उदय, चैतन्यमय लोकशाही आणि मानवतेचा एक षष्ठांश अधिवास,जागतिक स्थैर्य आणि शांततेचे निदर्शक असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

‘एक भविष्य निर्माण करणे’, या संकल्पनेवर आधारित परिषदेत, राष्ट्रपतींनी सर्वांच्या कल्याणासाठी ‘एक भविष्य’ घडवण्याच्या दिशेने प्रयत्नांचा समन्वय साधण्याच्या गरजेवर भर दिला. लोकसहभाग हे अशा प्रयत्नांचे वैशिष्ट्य असल्याचे ते म्हणाले. एक भविष्य निर्माण करणे हे मानवतेच्या शाश्वततेसाठी अत्यंत आवश्यक असून, हे आव्हान स्वीकारण्यात विलंब होता कामा नये  असे ते म्हणाले.

हवामान बदलाचा 'टिकिंग बॉम्ब', म्हणजेच कधीही स्फोट होईल असा बॉम्ब आणि 'मानवतेसाठी सर्वात मोठा धोका' असल्याचे सांगून, उपराष्ट्रपतींनी सर्व देशांना एकत्रितपणे या आव्हानाचा सामना करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. मोठ्या प्रमाणातील सहभाग आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा आवश्यक तेवढाच वापर करण्याची गरज अधोरेखित करत, उपराष्ट्रपती म्हणाले की, आपल्याकडे वास्तव्यासाठी अन्य कोणताही ग्रह नाही.

भारत आणि आफ्रिका दरम्यान, सामायिक इतिहास, समान संघर्ष आणि न्याय्य आणि प्रगतीशील भविष्यासाठी परस्पर आकांक्षा, यासह खोलवर रुजलेल्या संबंधांकडे लक्ष वेधून, उपराष्ट्रपती धनखड यांनी दोन्ही देशांमधील आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय, सुरक्षा आणि राजनैतिक पैलूंसह भागीदारीचे विविध पैलू विषद केले.

पुनरुत्थानशील आफ्रिका आणि उगवता भारत, विशेषत: स्वच्छ तंत्रज्ञान, हवामानाशी जुळवून घेणारी शेती, सागरी सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि नील अर्थव्यवस्था, यासारख्या क्षेत्रांमध्ये दक्षिणेकडील देशांमधील सहकार्याला, मोठी चालना देऊ शकतील, असे ते म्हणाले.

2023 मध्ये भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, जी 20 चा स्थायी सदस्य म्हणून आफ्रिकन युनियनचा समावेश झाला, ही अत्यंत अभिमानाची आणि महत्त्वपूर्ण भू-राजकीय घडामोड असल्याचे सांगून, आफ्रिकन देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडी , जागतिक जैव इंधन आघाडी आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा गटात सहभागी झाल्याबद्दल  उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली.

S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2047294) Visitor Counter : 42