माहिती आणि प्रसारण मंत्रालय
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ पटकथा लेखक प्रयोगशाळा (फीचर्स ) 2024 ने 21 राज्यांमधून सहा धडाडीच्या लेखक आणि पटकथांची केली निवड
Posted On:
20 AUG 2024 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2024
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) ला या वर्षी 21 राज्यांमधून 150 हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या , त्यापैकी 6 प्रकल्पांची एनएफडीसी पटकथा लेखक प्रयोगशाळेच्या 17 व्या आवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. देशभरातील प्रतिभावंतांना हेरून त्यांचा विकास करणे आणि प्रोत्साहन देणे यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. हे सहा पटकथा लेखक जाहिराती , लघुपट, कादंबरी, माहितीपट आणि चित्रपटांचे निर्माते –दिग्दर्शक आहेत. त्यांनी हिंदी, उर्दू, पहाडी, पंजाबी, आसामी, मल्याळम, कोन्याक, इंग्रजी आणि मैथिली सह अनेक भाषांमध्ये पटकथा लिहिल्या आहेत.
एनएफडीसी पटकथालेखक प्रयोगशाळा 2024 साठी निवडलेले 6 प्रकल्प पुढीलप्रमाणे आहेत:
1. हवा मिठाई (कँडी फ्लॉस) अनुरिता के झा – मैथिली आणि हिंदी
एक खेड्यातील 6 वर्षांचा मुलगा टुंडू आणि त्याचा जिवलग मित्र बुल्लू आपल्या आईचे प्रेम परत मिळवण्यासाठी, भगवान हनुमानजींच्या आख्यायिकेने प्रेरित सूर्याला गिळंकृत करण्यासाठी एका हृदयस्पर्शी आणि विलक्षण प्रवासाला निघतात.
2. आय विल स्माईल इन सप्टेंबर - आकाश छाबरा - हिंदी, उर्दू, पहाडी आणि पंजाबी
आपल्या आयुष्यातील प्रेमापासून विभक्त झाल्यानंतर तसेच त्यावेळी झालेल्या क्रूर भांडणात पुढले दात गमावल्यानंतर, जुन्या दिल्लीतील एक तरुण ब्रास बँड वादक आपला आनंद परत मिळवून आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.
3. कला काली (द आर्ट ऑफ द डार्क) अनाम डॅनिश - इंग्रजी आणि हिंदी
दोन भावंडं आपल्या मित्रांसोबत, त्यांच्यावरील पिढीगत शापाचा शोध घेण्यासाठी कुटुंबात झालेल्या एका मृत्यूचा तपास करतात आणि त्यांच्या कुटुंबातील काळ्या जादूची परंपरा वापरून शाप संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतात.
4. कोन्याक -उद्धव घोष -कोन्याक नागा आणि हिंदी आणि इंग्रजी
नागालँडच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भूमीत , कल्पित हेडहंटिंग जमातींमध्ये एक प्राणघातक संघर्ष सुरू होतो. थुंगपांग कोन्याक हा भविष्यसूचक दृष्टान्तांनी भारलेला आणि विश्वासघाताने पछाडलेला तरुण योद्धा , त्याच्या समुदायाचे रक्षण करण्यासाठी आणि सन्मान परत मिळवण्यासाठी एका मोहिमेवर निघाला असताना त्याचा पूर्वीचा मित्र जो आता प्राणघातक शत्रू बनला आहे तो संगबा त्याला भेटतो आणि अस्तित्वाच्या क्रूर संघर्षात भाऊ भावाच्या विरोधात जातो.
5. मंगल - द होली बीस्ट - त्रिपर्णा मैती - आसामी, मल्याळम आणि हिंदी
हत्तीच्या बछड्याच्या रूपात पकडलेल्या मंगलला मानवांच्या जगात प्रवेश केल्यावर प्रेम आणि नुकसान या दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन, हात बदलून, तो शेवटी एक पूजनीय देवता बनतो, मात्र जोपर्यंत तो मुक्त होण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत तो साखळदंडांनी बांधलेला असतो.
6. पीयूष की तो...निकल पडी (टू पी ऑर नॉट पी ) पीयूष श्रीवास्तव – हिंदी
पीयूष या 32 वर्षांच्या युवकाला त्याच्या सासरच्या पहिल्या भेटीत एका विनोदी दुःस्वप्नाचा सामना करावा लागतो जेव्हा पॅकिंगमधील चुकीमुळे त्याला ऍडल्ट डायपरशिवाय राहावे लागते; ज्यामुळे त्याची अंथरूण ओले करण्याची लाजिरवाणी समस्या सगळ्यांसमोर येण्याचा धोका असतो. आपले गुपित लपवत आपल्या पत्नीच्या मदतीने नवीन डायपर विकत घेण्यासाठी एका आनंददायी आणि हृदयस्पर्शी प्रवासाला तो निघालेला असतो.
S.Bedekar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2047058)
Visitor Counter : 86