वस्त्रोद्योग मंत्रालय

वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम आणि कच्चा माल पुरवठा योजनेची अंमलबजावणी


विणकर मुद्रा कर्ज /सवलतीच्या दराने कर्ज योजना, वैयक्तिक विणकर आणि हातमाग संस्थांसाठी ‘मार्जिन मनी’ सहाय्य

Posted On: 20 AUG 2024 4:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2024

देशातील हातमाग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. हातमाग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हातमाग कामगारांच्या कल्याणासाठी, वस्त्रोद्योग मंत्रालय देशभरात राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम आणि कच्चा माल पुरवठा योजना राबवत आहे.

राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रमांतर्गत, पात्र हातमाग संस्था/कामगारांना सुधारित यंत्रमाग आणि उपकरणे, सौर दिवे , काम करण्यासाठी जागा , उत्पादन आणि रचना विकास, तांत्रिक आणि सामान्य पायाभूत सुविधा, देशांतर्गत/परदेशी बाजारपेठांमध्ये हातमाग उत्पादनांचे विपणन यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. विणकरांच्या मुद्रा कर्ज/सवलतीच्या दराने कर्ज योजनेअंतर्गत, वैयक्तिक विणकर आणि हातमाग संस्थांसाठी मार्जिन मनी सहाय्य; तीन वर्षांच्या कालावधीसाठी कर्जावर व्याजदरात  सवलत आणि पत हमी शुल्क  प्रदान केले जाते.

हातमाग कामगारांच्या कल्याणासाठी जीवन आणि अपघाती विमा संरक्षण, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती इत्यादीद्वारे तरतूद करण्यात आली आहे. हलाखीच्या स्थितीत असलेल्या 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या विणकरांसाठी आर्थिक सहाय्य पुरवण्याची तरतूद मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे.

कच्चा माल पुरवठा योजनेंतर्गत,मंत्रालय लाभार्थीच्या घरापर्यंत धाग्याची वाहतूक करण्यासाठी वाहतूक अनुदान तसेच कॉटन हँक यार्न, घरगुती रेशीम, लोकर आणि तागाचे धागे आणि नैसर्गिक तंतूंच्या मिश्रित धाग्याच्या किंमतीवर  15% सवलत देते.

हातमाग उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी, भारतीय हातमाग उत्पादनांना जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी हातमाग निर्यात प्रोत्साहन परिषद  आंतरराष्ट्रीय विपणन मेळावे/कार्यक्रम यात सहभाग तसेच त्यांचे आयोजन करत आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या राज्य हातमाग महामंडळे/सहकारी/संस्थांना  हातमाग विणकरांकडे उपलब्ध असलेले तयार कपडे खरेदी करण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली होती.


S.Bedekar/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2046978) Visitor Counter : 29