संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माजी लष्करप्रमुख एस पद्मनाभन यांचे निधन

Posted On: 19 AUG 2024 8:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑगस्ट 2024

 

भारतीय लष्कराचे विसावे लष्करप्रमुख निवृत्त जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांच्या निधनाबाबत भारतीय लष्कराने तीव्र शोक व्यक्त केला आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि सर्व पदांवरील भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना आदरांजली वाहिली, तसेच त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रगट केली आहे.

जनरल पद्मनाभन यांचे काल रात्री चेन्नई येथे वयाच्या 83व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 

जनरल पद्मनाभन यांचा जन्म 5 डिसेंबर 1940 ला केरळात थिरुवनंतपुरम येथे झाला. देहरादूनच्या राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय (RIMC) तसेच खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएचे ते माजी विद्यार्थी होते. त्यांची नेमणूक 13 डिसेंबर 1959 रोजी रेजिमेंट ऑफ आर्टिलरीमध्ये झाली. 

आपल्या या  पूर्ण सेवाकाळात जनरल पद्मनाभन यांनी अनेक महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या निभावल्या. गजाला फील्ड रेजिमेंट,  दोन्ही इन्फंट्री ब्रिगेड तसेच आर्टीलरी ब्रिगेडमध्ये त्यांनी जबाबदाऱ्या निभावल्या. त्यांनी  दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये महत्वाची भूमिका बजावली.

लष्करप्रमुख म्हणून त्यांनी 1 ऑक्टोबर 2000 रोजी पदभार स्वीकारला.

आपल्या सहकर्मचाऱ्यांमध्ये पॅडी म्हणून ते ओळखले जात. सैनिकांचे कल्याण, भारतीय सेनेचे आधुनिकीकरण आणि धोरणात्मक दृष्टिकोन यांच्याबाबत कटीबद्धता  हा वारसा जनरल पद्मनाभन यांनी आपल्या मागे ठेवला आहे. ते भारताच्या राष्ट्रपतींचे मानद एडीसीसुद्धा होते. जनरल पद्मनाभन यांनी ‘ऑपरेशन पराक्रम’ च्या महत्त्वाच्या कालखंडात भारतीय लष्कराचे नेतृत्व केले. ते 43 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 डिसेंबर 2002 मध्ये लष्करातून निवृत्त झाले. त्यांचे निधन ही देशाच्या तसेच भारतीय लष्कराच्या दृष्टीने मोठी हानी आहे.

जनरल पद्मनाभन यांचे अविचल समर्पण आणि देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान यासाठी देश त्यांना नेहमी आठवणीत ठेवेल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

 

* * *

S.Kakade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2046759) Visitor Counter : 61