उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उद्योग, व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राने टाळता येण्याजोगी आयात टाळावी आणि  स्थानिक उत्पादनाला प्राधान्य द्यावे असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे आवाहन

Posted On: 17 AUG 2024 3:08PM by PIB Mumbai

 

आपल्या देशाने आर्थिक राष्ट्रवाद स्वीकारायला हवा असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. ते आज स्वर्ण भारत ट्रस्ट, व्यंकटचलम येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. उद्योग, व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राने टाळता येण्याजोगी आयात टाळावी आणि  स्थानिक उत्पादनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

स्वदेशी’चा पैलू असलेल्या, आर्थिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेवर भर देत, तसेच ‘व्होकल फॉर लोकल’, अर्थात स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावर बोलताना उपराष्ट्रपती धनखड यांनी अनावश्यक आयातीचा अर्थव्यवस्थेवर होणारा नकारात्मक परिणाम अधोरेखित केला. जसे की, परदेशी चलनाचे भांडार रिते होणे, आणि भारतीय कामगारांच्या रोजगाराच्या संधी घटणे. “गालिचे, तयार कपडे, आणि खेळणी यासारख्या उत्पादनांसाठी आयातीवर अवलंबून राहिल्यामुळे आपण केवळ आपल्याकडील परदेशी चलन बाहेर पाठवत नाही, तर देशांतर्गत उद्योजकतेच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करतो,” उपराष्ट्रपती म्हणाले. त्यांनी उद्योगांना स्थानिक उत्पादनाला पाठिंबा देऊन या समस्येचे निराकरण करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे भारतीय कामगारांना काम मिळेल आणि उद्योजकतेला चालना मिळेल.   

उपस्थितांना संबोधित करताना, उपराष्ट्रपती धनखड यांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचा आवश्यक तेवढाच  वापर करण्याची तातडीची गरज अधोरेखित केली आणि नागरिकांनी आर्थिक सामर्थ्य नव्हे, तर गरजेवर भर देत नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करावा, असे आवाहन केले.

आर्थिक बळावर केलेला नैसर्गिक साधनसंपत्तीचा अती वापर, भविष्यातील पिढ्यांसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मूल्यवर्धनाशिवाय लोहखनिजासारख्या कच्च्या मालाच्या निर्यातीबद्दल चिंता व्यक्त करून उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, ही पद्धत केवळ देशाची रोजगार क्षमता कमी करत नाही, तर आर्थिक चौकटदेखील कमकुवत करते. “आपल्या बंदरांमधून देशातील लोहखनिज अतिरिक्त मूल्य न जोडता बाहेर जाताना पाहणे वेदनादायक आहे. एक देश म्हणून, आपल्याला दीर्घकालीन राष्ट्रीय हितांपेक्षा सहज आणि झटपट आर्थिक लाभाला प्राधान्य देणे परवडणारे नाही,”असे  ते म्हणाले.

उपराष्ट्रपती धनखड यांनी राजकीय, वैयक्तिक आणि आर्थिक हितसंबंधांपेक्षा देश हिताला प्राधान्य देण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आणि मानसिकतेतील हा बदल साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला.

***

S.Kakade/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2046291) Visitor Counter : 81