संरक्षण मंत्रालय
भारत संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ बनत आहे आणि जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या स्वातंत्र्यदिन 2024 निमित्तच्या भाषणात प्रतिपादन
“भारत पूर्वी दहशतवादी हल्ल्यांचा बळी होता, आज तो मजबूत आणि धाडसी आहे; जे कोणी भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करतात, त्यांना भारतीय सशस्त्र दल चोख प्रत्युत्तर देतात” - पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2024 1:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2024
संरक्षण क्षेत्रात भारत ‘आत्मनिर्भरता’ प्राप्त करत आहे आणि गेल्या काही वर्षांत सरकारने उचललेल्या पावलांमुळे जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील प्रतिष्ठित लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केले.
एक वेळ अशी होती जेव्हा, संरक्षण अर्थसंकल्पाचा बहुतांश भाग परदेशातून शस्त्रे आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरला जात होता, परंतु आपल्या सरकारने देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी स्वदेशी उत्पादनावर लक्ष केंद्रित केले, हे पंतप्रधानांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. अनेक सकारात्मक स्वदेशी उत्पादनांच्या सूचींच्या अधिसूचना जारी करण्यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र दलांचे कौतुक केले. या सूचीमध्ये 5,600 हून अधिक वस्तू आहेत, ज्या नियुक्त केलेल्या वेळेनंतर केवळ भारतीय उद्योगाकडून खरेदी केल्या जात आहेत आणि यापुढेही केल्या जातील. एकेकाळी संरक्षण उपकरणांच्या आयातीवर पूर्णपणे अवलंबून असलेला भारत आज अनेक देशांमध्ये ही उपकरणे निर्यात करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
सरकारच्या निरंतर प्रयत्नांमुळे आर्थिक वर्ष (FY) 2023-24 मध्ये वार्षिक संरक्षण उत्पादनाने 1.27 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. याच आर्थिक वर्षात, संरक्षण निर्यातीने 21,083 कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांक गाठला, जो आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत 32.5% वाढला आहे, ही बाब लक्षवेधी आहे. याशिवाय, आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत संरक्षण निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीत 6,915 कोटी रुपयांच्या संरक्षण उपकरणांची निर्यात करण्यात आली आहे, आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 78% ने वाढ झाली आहे. 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत हा आकडा 3,885 कोटी रुपये इतका होता.
2016 च्या सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 च्या एअर स्ट्राइकचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात सांगितले की, एक काळ असा होता की जेव्हा देश दहशतवादी हल्ल्यांचा बळी होता; परंतु आज देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भारतीय सशस्त्र दलांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने आज आपला देश धाडसी आणि मजबूत बनला आहे. मातृभूमीची निस्वार्थीपणे सेवा करणाऱ्या आपल्या शूर सैनिकांचा देशाला अभिमान आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सर्व क्षेत्रांमध्ये महिलांच्या वाढत्या सहभागावर पंतप्रधानांनी भर दिला. महिला केवळ राष्ट्राच्या प्रगतीत सहभागी होत नाहीत तर त्या नेतृत्वाची भूमिका बजावत आहेत, असे ते म्हणाले. “लष्कर असो, नौदल असो, वायुसेना असो किंवा अंतराळ क्षेत्र असो, आम्ही आमच्या देशाच्या सतत वाढणाऱ्या नारी शक्तीचे साक्षीदार आहोत.”, असे त्यांनी सांगितले.
* * *
S.Nilkanth/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2045564)
आगंतुक पटल : 146