पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात भारताच्या भविष्यासाठी मांडला महत्त्वाकांक्षी दृष्टीकोन

Posted On: 15 AUG 2024 12:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्ट 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात, भारताच्या विकासाला आकार देणे, नवोन्मेषाला चालना देणे आणि विविध क्षेत्रांमध्ये देशाला जागतिक नेता म्हणून स्थापित करण्याच्या उद्देशाने भविष्यकालीन उद्दिष्टांची मालिका रेखाटली.

पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत : 

  1. जीवन सुगमता मोहीम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन मोडवर ‘जीवन सुगमता’ बहाल करण्याचा त्यांचा दृष्टीकोन मांडला. पद्धतशीर मूल्यांकन तसेच पायाभूत सुविधा आणि सेवांमध्ये सुधारणा करून शहरी भागातील जीवनाचा दर्जा वाढवण्याबाबतही त्यांनी सांगितले.
  2. नालंदा चैतन्याचे पुनरुज्जीवन: उच्च शिक्षण आणि संशोधनाला चालना देऊन भारताला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून स्थान मिळवून देणाऱ्या प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या चैतन्याचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. याच भावनेतून 2024 मध्ये नालंदा विद्यापीठाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
  3. भारतात निर्मित चिप-सेमीकंडक्टर उत्पादन: आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि तांत्रिक स्वयंपूर्णता वाढवणे हे उद्दिष्ट ठेवून सेमीकंडक्टर उत्पादनात जागतिक नेता बनण्याच्या भारताची वचनबद्धता पंतप्रधानांनी अधोरेखित केली.
  4. कौशल्य भारत: 2024 च्या अर्थसंकल्पाचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी भारतातील तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि देशाला जगाची कौशल्य राजधानी बनवण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांवर प्रकाश टाकला.
  5. औद्योगिक उत्पादनाचे केंद्र: भारताच्या अफाट संसाधनांचा आणि कुशल कर्मचाऱ्यांचा फायदा घेऊन देशाचे जागतिक उत्पादन केंद्रात रूपांतर करण्याची कल्पना पंतप्रधानांनी सांगितली.
  6. "डिझाइन इन इंडिया, डिझाईन फॉर द वर्ल्ड": पंतप्रधानांनी स्वदेशी डिझाईन क्षमता उदात्त असल्याचे सांगत या क्षमतेचा वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या गरजा पूर्ण करणारी उत्पादने तयार करण्याचे आवाहन केले.
  7. जागतिक खेळणी बाजाराच्या अग्रस्थानी : भारतात निर्मित विविध खेळणी उत्पादने बाजारात आणण्यासाठी भारताने आपल्या समृद्ध प्राचीन वारशाचा आणि साहित्याचा फायदा घेतला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. भारतीय व्यावसायिकांनी जागतिक खेळणी बाजारपेठेचे नेतृत्व केले पाहिजे, भारतीयांनी केवळ खेळण्यातच नव्हे तर खेळांच्या निर्मितीमध्ये देखील आपली चमक दाखवली पाहिजे, भारतीय खेळांनी जगभरात आपला ठसा उमटवला पाहिजे, असेही पंतप्रधान म्हणाले.
  8. हरित रोजगार आणि हरित हायड्रोजन मोहीम : हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांमध्ये हरित नोकऱ्यांच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी भर दिला. देशाचे लक्ष आता हरित वाढ आणि हरित नोकऱ्यांवर केंद्रित असून यामुळे पर्यावरण संरक्षणात योगदान देताना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले. हरित हायड्रोजन उत्पादन तसेच पर्यावरण संवर्धन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी जागतिक नेता बनण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
  9. स्वस्थ भारत मिशन: विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, भारताने ‘स्वस्थ भारत’ या मार्गावर चालणे आवश्यक असून याची सुरुवात राष्ट्रीय पोषण अभियानाच्या प्रारंभापासून झाली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
  10. राज्यस्तरीय गुंतवणूक स्पर्धा: पंतप्रधानांनी राज्य सरकारांना गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी, सुशासनाची हमी देण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर विश्वास सुनिश्चित करण्यासाठी स्पष्ट धोरणे विकसित करण्याचे आवाहन केले.
  11. जागतिक मानकानुरुप भारतीय मानके: भारतीय मानकांनी आंतरराष्ट्रीय मानकानुरुप बनण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे असे सांगत पंतप्रधान गुणवत्तेबद्दलच्या वचनबद्धतेसाठी ओळखल्या जाण्याच्या भारताच्या आकांक्षेबाबत बोलले.
  12. हवामान बदलाची उद्दिष्टे: 2030 पर्यंत 500 गीगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता साध्य करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. पॅरिस कराराची उद्दिष्टे पूर्ण करणारा जी-20 राष्ट्रांमधील भारत हा एकमेव देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
  13. वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार: देशाची वैद्यकीय शिक्षण क्षमता वाढवणे आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या वाढत्या मागणीला सामोरे जाण्याच्या उद्देशाने पुढील 5 वर्षांत 75,000 नवीन वैद्यकीय जागा जोडण्याची योजना पंतप्रधान मोदींनी जाहीर केली.
  14. राजकारणात नवतरुणांचा समावेश : पंतप्रधानांनी विशेषत्वाने तरुणांना राजकारणाचा कोणताही कौटुंबिक वारसा नाही अशा किमान 1 लाख तरुणांना राजकीय व्यवस्थेत सामील करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचा उद्देश घराणेशाही आणि जातिवाद या विघातक रुढींच्या विरोधात लढा देणे आणि भारताच्या राजकारणात नव तरुणांना समाविष्ट करणे हा आहे.

 

* * *

NM/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2045535) Visitor Counter : 24