सांस्कृतिक मंत्रालय
हर घर तिरंगा 2024 अभियानाचा एक भाग म्हणून सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थांनी आयोजित केलेल्या दिल्लीतील तिरंगा यात्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
Posted On:
13 AUG 2024 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2024
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भव्य उत्सवात, सांस्कृतिक मंत्रालयाच्या अकादमींच्या अंतर्गत येणाऱ्या 3 संस्था म्हणजे ललित कला अकादमी, साहित्य अकादमी आणि संगीत नाटक अकादमी यांनी एकत्रित येऊन दिल्लीत नेत्रदीपक तिरंगा यात्रा आयोजित केली होती.
या उत्साही कार्यक्रमात तरुण, कलाकार, सर्जनशील व्यावसायिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते शाळकरी मुले, युवा व्लॉगर्स, अधिकारी आणि सामान्य नागरिकांपर्यंत सर्व स्तरातील 2500 हून अधिक व्यक्तींनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला होता.
आजच्या दिवशी देशभक्तीच्या उत्साहात आणखी भर घालत, कला महाविद्यालयातील कलाकार आणि विद्यार्थ्यांनी 30 फूट लांब चित्तवेधक कॅनव्हास पेंटिंग तयार करण्यासाठी एकमेकांना सहकार्य केले. "हर घर तिरंगा" या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तरुण कलाकारांनी आपल्या सर्जनशीलता आणि प्रतिभेचे प्रदर्शन केले आणि समाजाला या उत्सवात सहभागी करून घेतले.
संगीत नाटक अकादमीच्या कलाकारांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाने कार्यक्रम आणखीनच चित्ताकर्षक आणि समृद्ध झाला. तिरंगा यात्रेच्या आधी आणि नंतर सादर करण्यात आलेल्या मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रमाने या उत्सवाच्या पटलावर चैतन्याचे रंग भरले.
तिरंगा यात्रेने भारताच्या सामायिक वारशाची आणि आपल्या सर्वांना एकत्र आणणाऱ्या देशभक्तीच्या भावनेची एक चैतन्यदायी आठवण म्हणून काम केले.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2045035)
Visitor Counter : 49