वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ फॉरिन ट्रेडच्या(आयआयएफटी) एनआयआरएफ मानांकनात 12 स्थानांची सुधारणा, 2023 मधील 27 व्या स्थानावरून 2024 मध्ये 15 व्या स्थानावर झेप


आंतरराष्ट्रीय व्यापारात भावी नेते घडवण्यामध्ये आयआयएफटी महत्त्वाची भूमिका बजावेल- पीयूष गोयल

Posted On: 13 AUG 2024 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 ऑगस्ट 2024

 

2023 मधील 27 व्या स्थानावरून यावर्षी 15 व्या स्थानावर येत इंडियन इन्स्टिट्युट ऑफ फॉरिन ट्रेड (आयआयएफटी) या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या संस्थेने शिक्षण  मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एनआयआऱएफ(National Institutional Ranking Framework) यादीत 12 स्थानांची अतिशय मोठी उसळी घेतली आहे. 2016 मध्ये एनआयआरएफ मानांकनाची सुरुवात झाल्यापासून या संस्थेच्या मानांकनात झालेली ही विक्रमी सुधारणा आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आयआयएफटीचे अभिनंदन करताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की, ही संस्था लवकरच जागतिक दर्जाच्या संस्थेत रुपांतरित होईल जी भारताच्या व्यापार आणि गुंतवणुकीच्या प्रभावी वाढीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देईल. 2023 मधील 27 व्या स्थानावरून या वर्षी 15 व्या स्थानावर येत इंडियन इन्स्टिट्युट ऑफ फॉरिन ट्रेड(आयआयएफटी)दिल्लीने उल्लेखनीय प्रगती केली आहे. जागतिक व्यापारात भारताच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर हे यश आंतरराष्ट्रीय व्यापारात भावी नेते घडवण्यात आयआयएफटीची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते, असे ते म्हणाले.

अलीकडच्या काही महिन्यांत संस्थेच्या विविध उपाययोजनांना मान्यता मिळाली आहे. संस्थेने आपले अध्यापन, अध्ययन आणि संसाधने, संशोधन आणि व्यावसायिक पद्धती, पदवीची फलनिष्पत्ती, व्याप्ती आणि सर्वसमावेशकता आणि धारणा सुधारण्यासाठी सर्वसमावेशक पुढाकार घेतला आहे. आयआयएफटी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवसायावर विशेष लक्ष केंद्रित करून जागतिक दर्जाच्या बी-स्कूलमध्ये जलद परिवर्तनाच्या मार्गावर आहे. पीएच.डी., एमबीए (इंटरनॅशनल बिझनेस), एमबीए(बिझनेस ऍनालिटिक्स) आणि एमए इकॉनॉमिक्स यांसारखे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अर्थसाहाय्य यातील विशेष बारकावे असलेले मोठ्या प्रमाणात मागणी असलेले शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणारी ती एक अद्वितीय संस्था बनत आहे.

नव्या उपक्रमांचा एक भाग म्हणून,  आंतरराष्ट्रीय वाटाघाटींसंदर्भात कॉर्पोरेट्स आणि धोरणकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय वाटाघाटी केंद्र (CIN) स्थापन करण्याची संस्थेची प्रक्रिया सुरू आहे. त्याशिवाय, निर्यातदार, सरकारे आणि व्यवसायांसोबत जवळून काम करण्यासाठी आणि हार्वर्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे केस स्टडी विकसित करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावरील भारतीय अनुभव उर्वरित जगासोबत सामाईक  करण्यासाठी, आयआयएफटी फॉरेन ट्रेड केस स्टडी सेंटर (FTCSC) ची स्थापना करत आहे.

या संस्थेची सरकारे, केंद्र आणि राज्यांशी जवळून काम करण्याची आणि उच्च-स्तरीय क्षमता उभारणी कार्यक्रमांव्यतिरिक्त समकालीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण संशोधन करण्याची योजना आहे. अपेडा सारख्या विविध निर्यात प्रोत्साहन संघटनांनी समकालीन संशोधनाच्या क्षेत्रावर पीएचडीच्या विद्यार्थ्यांना प्रायोजकत्व देण्याबाबत उत्सुकता दर्शवली आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाच्या सक्रीय सहकार्याने, दुबईमध्ये परदेशातील संकुल सुरू करण्याचा देखील आयआयएफटीचा विचार आहे.

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2045029) Visitor Counter : 58