आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव गणपतराव जाधव यांनी हत्तीरोग (लिम्फॅटिक फायलेरियासिस) उच्चाटनासाठी वार्षिक राष्ट्रव्यापी व्यापक औषध सेवन मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा केला प्रारंभ
प्रविष्टि तिथि:
10 AUG 2024 2:53PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव गणपतराव जाधव यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) उच्चाटनासाठी वार्षिक राष्ट्रव्यापी व्यापक औषध सेवन मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला. जागतिक लक्ष्यपूर्ती आधी हत्तीरोग उच्चाटनाचे उद्दिष्ट भारतात साध्य करण्यासाठी या आजाराचा प्रादुर्भाव जास्त असणाऱ्या बिहार, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमधील 63 जिल्ह्यांकडे या उपक्रमात विशेष लक्ष दिले जात आहे आणि इथल्या स्थानिक भागात घरोघरी जाऊन प्रतिबंधात्मक औषधे दिली जाणार आहेत. यासोबतच, समूळ उच्चाटनासाठी एक स्पष्ट आराखडा तयार करण्यासाठी ‘हत्तीरोग निर्मूलन यावरील सुधारित मार्गदर्शक तत्त्वे’ आणि आयईसी सामग्रीचे यावेळी त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

आपल्या बीजभाषणात प्रतापराव जाधव म्हणाले की, "हत्तीरोग हा डासांमुळे होणारा आजार सोप्या उपायांनी टाळता येऊ शकतो, त्यामुळे त्याचा प्रसार रोखण्यासाठी व्यापक औषध सेवन मोहिमेच्या फेऱ्या महत्त्वाच्या आहेत."
सार्वजनिक आरोग्याप्रति सरकारची अतूट बांधिलकी अधोरेखित करत जाधव म्हणाले, “भारतातील 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसंख्येला प्रभावित करणाऱ्या हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जसे की डास चावणे टाळणे आणि संसर्ग प्रतिबंधक औषधे घेणे महत्त्वाचे आहे. हा रोग केवळ आरोग्य आणि निरामयतेवरच परिणाम करत नाही तर त्यामुळे होणाऱ्या लिम्फेडेमामुळे आजीवन अपंगत्व देखील येते, ज्याचे गंभीर परिणाम कुटुंबांवर होतात. मोहिमेच्या यापुढच्या फेऱ्या यशस्वी करण्यासाठी सर्व पात्र लोकसंख्येपैकी 90% लोकांनी या औषधांचे सेवन करणे अत्यावश्यक आहे.”

मातीच्या घरात राहणाऱ्या लोकांना अशा आजारांचा धोका अधिक असतो म्हणून सर्वांना पक्की घरे मिळावीत यासाठी प्रयत्न केले जात आहेत,असेही जाधव यांनी नमूद केले. लिम्फॅटिक फायलेरियासिस प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. लिम्फॅटिक फायलेरियासिसने बाधित लोकांना दिव्यांग प्रमाणपत्रे प्रदान केली जातात, याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
त्यांनी स्वत: औषध सेवन करून व्यापक औषध सेवन मोहिमेचा प्रारंभ केला आणि मोहिम यशस्वी करण्यात योगदान दिल्याबद्दल मंत्रालये, बचत गट आणि इतर हितधारकांच्या समर्पण आणि प्रयत्नांची प्रशंसा केली.
***
S.Kane/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2044080)
आगंतुक पटल : 146