माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मुंबईच्या सीबीएफसी मुख्यालयाकडून सुगम्यता मानकांसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन


कार्यशाळेने सुगम्यता मानकांनुसार तरतुदी आणि अनिवार्य बदलांविषयी हितधारकांना केले जागरुक

Posted On: 09 AUG 2024 5:15PM by PIB Mumbai

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 15.03.2024 रोजी श्रवण विकलांग आणि दृष्टी विकलांगांसाठी चित्रपटगृहांमध्ये फीचर फिल्म्सचे सार्वजनिक प्रदर्शन करताना सुगम्यता  मानकांबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली होती.

यासंदर्भात 9.8.2024 रोजी मुंबईत सीबीएफसीच्या मुख्यालयात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या मार्गदर्शक तत्वांनुसार अनिवार्य असलेल्या बदलांसह मार्गदर्शक तत्वांमधील तरतुदींबाबत हितधारकांना जागरुक करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता. सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी, संयुक्त सचिव(फिल्म्स) वृंदा मनोहर जोशी, सीबीएफसीचे सचिव राजेंद्र सिंग तसेच सीबीएफसीचे अधिकारी, निर्माता संघटनांचे प्रतिनिधी, श्रवण विकलांग आणि दृष्टीविकलांगांसाठी काम करणारे कार्यकर्ते आणि सिनेमा थिएटर संघटनांचे प्रतिनिधी या कार्यशाळेला उपस्थित होते.

या कार्यशाळेत अशी माहिती देण्यात आली की या मार्गदर्शक तत्वांनुसार चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांचे व्यावसायिक प्रदर्शन करण्यासाठी प्रमाणीकरणासाठी अर्ज करणाऱ्यांनी त्यांच्या चित्रपटांसाठी खालील वेळापत्रकानुसार सुलभता-सेवा देण्याची व्यवस्था करावी. 

a.    एकापेक्षा जास्त भाषांमध्ये प्रमाणित करण्यात येणार असलेल्या सर्व फीचर फिल्म्समध्ये श्रवण विकलांग आणि दृष्टी विकलांगांसाठी या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीच्या प्रभावी तारखेपासून म्हणजे 15.09.2024 पासून 6 महिन्यांच्या आत प्रत्येकी किमान एक म्हणजेच, क्लोज्ड कॅप्शनिंग (CC) / ओपन कॅप्शनिंग (OC) आणि ऑडिओ वर्णन (AD) , सुलभता वैशिष्ट्य प्रदान करणे आवश्यक आहे.

b.   राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी विचार व्हावा यासाठी तसेच गोव्यातील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून आयोजित होणाऱ्या इतर चित्रपट महोत्सवात भारतीय विभागात प्रदर्शित करण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या फीचर फिल्म्समध्ये 1 जानेवारी 2025 पासून क्लोज्ड कॅप्शनिंग आणि ऑडियो वर्णन समाविष्ट करणे अनिवार्य आहे.

c.    सीबीएफसीच्या माध्यमातून प्रमाणित करण्यात येत असलेल्या आणि चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यासाठीच्या (डिजिटल फीचर फिल्म्स) टीझर्स आणि ट्रेलर्ससह इतर सर्व फीचर फिल्म्समध्ये सीसी/ओसी आणि एडी या वैशिष्ट्यांचा 15.03.2026 पासून समावेश करणे अनिवार्य आहे.

यावेळी  माहिती देण्यात आली की भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सुलभता मानकांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि मार्गदर्शन  करण्यासाठी एक समर्पित समिती नेमली आहे, जिचे निम्मे सदस्य श्रवण/दृष्टी विकलांग व्यक्ती आणि चित्रपट उद्योगातील प्रतिनिधी आहेत.

हा उपक्रम दिव्यांग व्यक्तींचे अधिकार कायदा, 2016(RPwD Act) या कायद्याशी सुसंगत आहे आणि तो चित्रपटांसह माहिती आणि संप्रेषणात सार्वत्रिक सुगम्यता  आणि समावेशकतेला प्रोत्साहन देतो.

***

S.Kane/S.Patil/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2043860) Visitor Counter : 23


Read this release in: English , Hindi