उपराष्ट्रपती कार्यालय
आर्थिक राष्ट्रवाद हा देशाचा आर्थिक विकास आणि आर्थिक स्वातंत्र्याचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन
हातमाग उत्पादने हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’, या उपक्रमाचा प्रमुख घटक आहे : उपराष्ट्रपती
भारतातील कॉर्पोरेट विश्वाने हातमाग उत्पादनांना प्रोत्साहन द्यायला हवे - उपराष्ट्रपतींची अपेक्षा
हातमाग उत्पादने भारतीय संस्कृतीला मूर्त रूप देत असून त्याचा फॅशन डिझायनिंगशी मेळ घालणे गरजेचे आहे : उपराष्ट्रपती
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 10 व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
Posted On:
07 AUG 2024 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2024
हातमाग उत्पादने हा पंतप्रधानांच्या ‘बी व्होकल फॉर लोकल’, या स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या उपक्रमाचा प्रमुख घटक असून,‘स्वदेशी चळवळी’च्या खऱ्या भावनेने हातमाग उत्पादनांचा प्रसार करायला हवा असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सांगितले.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 10 व्या राष्ट्रीय हातमाग दिना निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, आर्थिक राष्ट्रवाद हा देशाचा आर्थिक विकास आणि आर्थिक स्वातंत्र्याचा प्रमुख आधारस्तंभ आहे. हातमागाचे पर्यावरणीय आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, "हातमागाचा प्रचार करणे ही काळाची गरज आहे,देशाची गरज आहे आणि हवामान बदलाच्या दृष्टीने पृथ्वी ग्रहाची गरज आहे." रोजगार निर्मितीमध्ये, विशेषतः ग्रामीण महिलांसाठी हातमागाचे महत्व अधोरेखित करत, अशा उत्पादनांसाठी पुरेशा विपणन सुविधा सुनिश्चित करायला हव्यात असे उपराष्ट्रपती म्हणाले.त्यांनी भारतातील कॉर्पोरेट्सना, विशेषत: हॉटेल उद्योगाला हातमाग उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे आवाहन केले, आणि ते म्हणाले की, ही वचनबद्धता केवळ भारतीय संस्कृतीचा प्रचार करणार नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराच्या संधींना लक्षणीय चालना देईल.
आर्थिक राष्ट्रवाद हा आपल्या आर्थिक विकासाचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचे नमूद करून, उपराष्ट्रपती धनखड यांनी आर्थिक राष्ट्रवादाचे तीन प्रमुख फायदे सांगितले: पहिला फायदा,तो मौल्यवान परकीय चलन वाचवायला मदत करतो,दुसरा,आयात कमी करून रोजगाराच्या संधी निर्माण करतो,आणि स्थानिक लोकांच्या उपजीविकेचे रक्षण करतो,आणि तिसरा फायदा म्हणजे,देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देऊन तो उद्योजकतेला चालना देतो.
काही जण राष्ट्रीय हितापेक्षा मर्यादित आर्थिक लाभाला प्राधान्य देतात, याबद्दल चिंता व्यक्त करत,हा आर्थिक फायदा टाळता येऊ शकणार्या आयातीसाठी पर्याय ठरू शकतो का,असा सवाल त्यांनी उपस्थित केला.त्यांनी अधोरेखित केले की,कोणताही आथिर्क नफा, मग तो कितीही मोठा असला तरी,देशांतर्गत उद्योगांना चालना देण्याच्या आणि स्थानिक रोजगाराचे रक्षण करण्याच्या मूल्यापेक्षा अधिक असू शकत नाही.
देशांतर्गत उत्पादनांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने 07 ऑगस्ट 1905 रोजी सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत, उपराष्ट्रपती धनखड यांनी, स्वदेशी चळवळीच्या 110 व्या वर्धापन दिनानिमित्त 2015 मध्ये 07 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून घोषित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी निर्णयाची प्रशंसा केली.
वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा,वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव रचना शाह,यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
संपूर्ण मजकूर वाचण्यासाठी येथे क्लिक करावे:
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2042721)
Visitor Counter : 85