युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
खेळाडूंसाठी आर्थिक पाठबळ
Posted On:
05 AUG 2024 7:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2024
विविध योजना तसेच कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरुपात आर्थिक मदत देऊन केंद्र सरकार देशातील खेळाडूंना क्रीडाक्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. या योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
- खेलो इंडिया योजनेच्या ‘खेलो इंडिया केंद्रे तसेच क्रीडा अकादमीं’ या घटका अंतर्गत खेलो इंडिया योजनेतून निवड झालेल्या प्रतिभावंत खेळाडूला मान्यताप्राप्त खेलो इंडिया अकादमीमध्ये प्रवेशाचा पर्याय देण्यात येतो आणि त्या प्रत्येक खेळाडूला प्रशिक्षण खर्च, विशेष प्रशिक्षण, स्पर्धांमध्ये सहभाग, शिक्षण, साधनांचे पाठबळ, वैज्ञानिक पाठबळ आणि इतर बाबींसाठी दर वर्षाला 6.28 लाख रुपये (1.20 लाख रुपयांच्या किरकोळ खर्च भत्त्यासह) वित्तीय साहाय्य देण्यात येते.
- टार्गेट ऑलिम्पिक पोडीयम (टीओपीएस) योजनेतून भारतातील प्रमुख प्रतिभावंत खेळाडूंना ऑलिम्पिक तसेच पॅरालिम्पिक क्रीडास्पर्धांमध्ये उतरण्याची तयारी करण्यासाठी मदत दिली जाते. निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा विकास निधीतून (एनएसडीएफ)मंत्रालयाच्या नेहमीच्या योजनांद्वारे उपलब्ध नसलेले विशिष्ट प्रशिक्षण आणि इतर पाठबळ पुरवले जाते. खेळाडूंच्या प्रमुख गटाला दर महिन्याला किरकोळ खर्चासाठी (ओपीए) 50,000 रुपये भत्ता दिला जातो.सध्या 174 खेळाडू आणि 2 हॉकी संघ (महिला आणि पुरुष)यांची या योजनेअंतर्गत प्रमुख गट म्हणून निवड झाली आहे. टीओपीएस विकास गटातील खेळाडूंना 25,000 रुपयांचा ओपीए मिळत आहे.
- राष्ट्रीय क्रीडा महासंघाला मदत योजनेअंतर्गत (एएनएसएफ) खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (एनएसएफएस) आर्थिक मदत देण्यात येते.
- क्रीडापटूंसाठीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधी योजनेंतर्गत (पीडीयुएनडब्ल्यूएफएस) गरीब परिस्थितीत जगणाऱ्या क्रीडापटूंना प्रशिक्षण, क्रीडा साधनांची खरेदी, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग इत्यादींसाठी सरकार थेट आर्थिक मदत (अडीच लाख रुपयांपर्यंत) पुरवते.
- प्रतिभावंत खेळाडूंना निवृत्तीवेतन देऊन त्यांना खात्रीशीर मासिक उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार सक्रीय क्रीडाक्षेत्रातून निवृत्त झालेल्या खेळाडूंना गुणवंत खेळाडूंसाठी निवृत्तीवेतन योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करते. सध्या या योजनेतून पात्र माजी खेळाडूंना दर महिन्याला 12,000 रुपये ते 20,000 रुपये या दरम्यान निवृत्तीवेतन देण्यात येते.
- आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतील पदक विजेत्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना रोख रकमेचे बक्षीस देण्याच्या योजनेतून केंद्र सरकार अप्रतिम कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंना आगामी काळातील स्पर्धांसाठी प्रोत्साहित तसेच प्रेरित करण्यासाठी तसेच युवा पिढीला आदर्श म्हणून क्रीडा क्षेत्रात प्रवेश करण्याच्या दृष्टीने आकर्षित करण्यासाठी रोख रकमेचे पुरस्कार देते. या योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध क्रीडास्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंना रुपये 20,000 ते 75,00,000 रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जातात.
- उपरोल्लेखित योजनांसह, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूचा गौरव करण्यासाठी सरकार दर वर्षी मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कारासारख्या विविध विभागांच्या अंतर्गत राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देखील देते.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2041867)
Visitor Counter : 68