संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाचे वायनाड येथे बचाव आणि मदत कार्य जारी
Posted On:
03 AUG 2024 1:47PM by PIB Mumbai
केरळमधील वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त भागात, भारतीय नौदलाने प्रतिकूल हवामान आणि अतिशय दुर्गम भाग असूनही बचाव आणि मदत कार्य सुरू ठेवले आहे. मदतकार्यात वाढ करण्यासाठी आणि आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या स्थानिक समुदायाला मदत करण्यासाठी आयएऩएस झामोरिन येथून, अतिरिक्त कर्मचारी, स्टोअर्स, संसाधने आणि अत्यावश्यक पुरवठा जमा करण्यात आला. सुरू असलेल्या बचावकार्यात सध्या नौदलाचे 78 कर्मचारी सहभागी झाले आहेत. चुरूलमाला आणि मुंदक्कई भागातील विविध ठिकाणांवर ही पथके आपत्ती निवारण दले आणि स्थानिक प्रशासन यांच्यासोबत समन्वय राखून काम करत आहेत. यापैकी एक पथक आपत्तीग्रस्त लोकांना सामग्री, खाद्यपदार्थ आणि इतर तरतुदींचा पुरवठा अखंडित सुरू ठेवण्यासाठी नदीजवळच्या तळावर तैनात करण्यात आले आहे, तर इतर पथके या आपत्तीमधून बचावलेल्यांचा शोध घेण्याचे, ढिगारा उपसण्याचे आणि मृतदेह शोधण्याचे काम करत आहेत. वैद्यकीय मदत देण्यासाठी चुरुलमाला येथे एक वैद्यकीय तळ देखील उभारण्यात आला आहे.
तीन अधिकारी आणि 30 नाविकांच्या एका पथकाने 1 ऑगस्ट 2024 रोजी भूस्खलनामुळे संपर्क खंडित झालेल्या चुरुलमाला आणि मुंदक्कई या भागांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा बेली ब्रिज नदीवर बांधण्यासाठी भारतील लष्कराच्या प्रयत्नांना गती दिली. अवजड यंत्रसामग्री आणि रुग्णवाहिका या भागात आणणारे लॉजिस्टिक्स पाठबळ देण्यासाठी हा पूल अतिशय महत्त्वाचा ठरला आहे.
2 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय नौदलाने कालिकतहून परिचालन करणाऱ्या अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर आयएऩएस गरुडाच्या मदतीने आपत्तीमधून बचावलेल्यांचा आणि मृतदेहांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले.या हेलिकॉप्टरने आपत्तीग्रस्त भागात बचाव सामग्रीसह 12 राज्य पोलिस कर्मचाऱ्यांना या भागात उतरवले, ज्या भागात रस्तेमार्गाने प्रवास करणे अशक्य होते. कमी दृश्यमानता आणि आव्हानात्मक हवामानाची परिस्थिती असलेल्या दुर्गम डोंगराळ भागात हे काम करण्यात आले. भारतीय नौदल स्थानिक प्रशासनासोबत अतिशय निकटच्या समन्वयाने अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आणि त्यांना मूलभूत सुविधा आणि वैद्यकीय मदत पुरवण्याचे काम करत आहे.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2041124)
Visitor Counter : 64