ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

वैध मापनशास्त्र (पाकिटबंद वस्तू) नियम, 2011 अंतर्गत नियम 3 मधील प्रस्तावित दुरुस्तीवर अभिप्राय सादर करण्याला केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाकडून मुदतवाढ


या सुधारणांमुळे किरकोळ विक्रीसाठी पाकिटबंद केलेल्या वस्तूंविषयी तपशील जाहीर करण्याबद्दल  उत्पादक/ वस्तू पाकिटबंद करणारी आस्थापने / आयातदार अशा सर्व भागधारकांमध्ये येणार स्पष्टता

Posted On: 02 AUG 2024 12:56PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने वैध मापनशास्त्र (पाकिटबंद वस्तू) नियम, 2011 अंतर्गतच्या च्या नियम 3 मधील प्रस्तावित दुरुस्तीवर अभिप्राय सादर करण्याला मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातले अभिप्राय सादर करण्याची याआधीची अखेरची तारीख 29.07.2024 होती, त्याला मुदतवाढ देत, आता अखेरची तारीख 30.08.2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

वैध मापनशास्त्र (पाकिटबंद / वेष्टणबंद वस्तू) नियम, 2011 नुसार ग्राहकांच्या हित लक्षात घेऊन पाकिटबंद करून विकल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंसाठी उत्पादक/ संबंधित वस्तू पाकिटबंद करणारे आस्थापन / आयातदाराचे नाव आणि पत्ता, मूळ देश, वस्तूचे सामान्य किंवा रुळलेले सर्वमान्य नाव, निव्वळ प्रमाण वा संख्या, उत्पादनाचा महिना आणि वर्ष, जास्तीत जास्त किरकोळ दर, प्रत्येक एककाचा विक्री दर, वस्तू वापरायोग्य असण्याची मर्यादा तारीख / कालांतराने वस्तू मानवी वापरासाठी अयोग्य होणार असल्यास ती कोणत्या तारखेपर्यंत वापरावी त्याची मर्यादा तारीख ही अनिवार्य असलेले हे सर्व तपशील जाहीर करणे बंधनकारक केले गेले आहे.

मात्र वर नमूद नियम 2011 अंतर्गत नियम 3 मध्ये 50 किलोपेक्षा  जास्त वजनाच्या पिशव्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या सिमेंट, खते आणि शेतमाल वगळून 25 किलो वजन किंवा 25 लिटरपेक्षा जास्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद वस्तूंना हे नियम लागू असणार नाहीत अशी तरदूत आहे. किरकोळ विक्रीसाठी असलेल्या पाकिटबंद  वस्तू 25 किलोपेक्षा जास्त नसतात असे गृहीत धरूनच ही तरतूद केली गेली आहे.

सद्यस्थितीत ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही स्वरुपातील  बाजारपेठांची व्याप्ती आणि विस्तार वाढत असल्याचे लक्षात घेऊन, पाकिटबंद वस्तूंच्या नियमांमध्ये एकरूपता प्रस्थापित करण्यासाठी वैध मापनशास्त्र (पाकिटबंद वस्तू) नियम, 2011 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या विचाराधीन आहे.

यासंदर्भात विभागाला विविध सूचना आणि अभिप्राय प्राप्त झाले असून, सध्या या सगळ्यांचा अभ्यास आणि सल्लामसलत सुरू आहे. दरम्यान या संदर्भातली मते / अभिप्राय सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशा मागणीचे विविध महासंघ, संघटना आणि इतर भागधारकांकडून केले गेलेले विनंती अर्जही विभागाला प्राप्त झाले आहेत.

त्यानुसार आता यासंदर्भातली मते / अभिप्राय ashutosh.agarwal13[at]nic[dot]in, dirwmca[at]nic[dot]in, mk.naik72[at]gov[dot]in इमेल आयडीवर पाठवता येतील. यासोबतच पुढे दिलेल्या दुव्याला भेट देऊन प्रस्तावित सुधारणाही पाहता येतील.:

https://consumeraffairs.nic.in/sites/default/files/file-uploads/latestnews/Amend%20Rule%203%20of%20the%20Legal%20Metrology%20%28Packaged%20Commodities%29%20Rules%2C%202011.pdf

सुधारित तरतुदीनुसार औद्योगिक ग्राहक किंवा संस्थात्मक ग्राहकांसाठी असलेल्या पाकिटबंद वस्तू वगळता किरकोळ विक्रीअंतर्गत विकल्या जाणाऱ्या सर्व पाकिटबंद वस्तूंना हे नियम लागू करण्याचा प्रस्ताव आहे.

या सुधारित तरतुदीमुळे पाकिटबंद वस्तूंसाठी एकसमान मानके / अटी - शर्ती स्थापित करण्याला मदत होणार आहे. यामुळे विविध ब्रँड आणि उत्पादनांमध्ये सुसंगतता येऊ शकेल, तसेच निष्पक्षताही वाढू शकेल. महत्वाचे म्हणजे यामुळे ग्राहकांना संबंधित उत्पादनाविषयी सर्व तपशील मिळणार असल्याने या माहितीच्या आधारे स्वतःसाठी योग्य वस्तूची  निवड करण्यातही त्यांना मदत होणार आहे.

***

S.Patil/T.Pawar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2040936) Visitor Counter : 36