नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमध्ये लोथाल येथे एनएमएचसीसह सागरी इतिहासाचे जतन करण्यासाठी भारत आणि व्हिएतनाम आले एकत्र


नवी दिल्ली येथील हैदराबाद हाऊस येथे भारत आणि व्हिएतनाम यांच्यात करारावर स्वाक्षऱ्या

Posted On: 01 AUG 2024 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024

समृद्ध आणि एकमेकांच्यात गुंफलेला सागरी इतिहास असलेले भारत आणि व्हिएतनाम हे दोन देश गुजरातमध्ये लोथाल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एनएमएचसी) विकसित करण्यासाठी एकत्र येत आहेत. अनेक शतकांपासून चालत आलेल्या सागरी संबंधांमध्ये रुजलेली ही भागीदारी या दोन्ही देशांमध्ये असलेला चिरस्थायी बंध आणि त्यांचा सामायिक वारसा जतन करुन साजरा करण्याप्रती त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील हैदराबाद हाऊस येथे  आज भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.दोन्ही देशांदरम्यान असलेली धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासोबतच हा सामंजस्य करार म्हणजे एनएमएचसी प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने पुढे टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

एनएमएचसीसंदर्भात दोन्ही देशांच्या एकत्र येण्यात या दोन्ही देशांच्या सागरी वारशाचे दर्शन घडवण्याच्या दृष्टीने उपयुक्त विविध पैलूंचा समावेश असणार आहे. सदर संकुलात भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर अधिक भर देण्याबरोबरच दोन्ही देशांच्या सामायिक सागरी इतिहासातील जवळीक आणि दीर्घकालीन अस्तित्व यावर अधिक भर  असेल. आगामी काळात दोन्ही देश आपापल्या सागरी इतिहासाशी संबंधित कलाकृती, प्रतिकृती, चित्रे, पुरातत्वीय डाटा तसेच इतर पुरातन वस्तू यांची देवाणघेवाण आणि कर्ज देण्यासंदर्भात एकत्र येऊन काम करतील. कलाकृतींच्या देवाण-घेवाणीसोबतच या सहयोगी संबंधाच्या माध्यमातून संरचना, तांत्रिक अंमलबजावणी तसेच देखभाल यांच्या संदर्भातील अनुभव देखील सामायिक केले जातील . एनएमएचसी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी एक शैक्षणिक आणि मनोरंजनपर जागा उभारणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

लोथल येथील राष्ट्रीय सागरी वारसा संकुलासंदर्भात भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सहकार्य म्हणजे आपला समृद्ध सागरी इतिहास जपण्याच्या सामायिक वचनबद्धतेमधील उल्लेखनीय टप्पा आहे. ही भागीदारी  आपल्या दोन राष्ट्रांमधील खोलवर रुजलेल्या संबंधांवर प्रकाश टाकते , शिवाय भविष्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण आणि धोरणात्मक सहकार्याची पायाभरणी देखील करते. समृद्ध भविष्याचा मार्ग प्रशस्त करताना आपल्या भूतकाळाचा सन्मान करणारा एक सेतू  आम्ही एकत्र उभारत  आहोत’, असे   केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय मंत्री  सर्बानंद सोनोवाल म्हणाले.

व्हिएतनाम आणि भारत आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने सागरी वारसा तसेच डिझाइनविषयक ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि सागरी वारसा आणि संवर्धन प्रयोगशाळा विकसित करण्यासाठी देखील सहकार्य करतील. राष्ट्रीय सागरी वारसा संकुल हे सांस्कृतिक देवाणघेवाण, संशोधन आणि शैक्षणिक उपक्रम आणि प्रदर्शन यावर अधिक भर देणारे शैक्षणिक केंद्र म्हणून उदयाला येईल. या उपक्रमामुळे व्हिएतनाम आणि भारत यांच्यातील समृद्ध सागरी इतिहासाचे संवर्धन तर होईलच शिवाय दोन्ही राष्ट्रांमध्ये  सामंजस्य आणि सहकार्य वृद्धिंगत होईल आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल.

राष्ट्रीय सागरी वारसा संकुल प्रकल्पासाठी गुजरात सरकारने सरगवाला गावात 400 एकर जमीन दिली आहे आणि प्रकल्पासाठी इतर  पायाभूत सुविधांचा विकास देखील हाती घेतला आहे.

टप्पा 1A चे बांधकाम जोरात सुरू आहे आणि 55% पेक्षा जास्त बांधकाम झाले आहे.हा प्रकल्प जनतेसाठी पुढील वर्षी खुला होईल. सागरी संकुलात जगातील सर्वात उंच दीपगृह संग्रहालय, जगातील सर्वात मोठी खुली जलचर गॅलरी आणि भारतातील सर्वात भव्य नौदल संग्रहालय असेल, ज्यामुळे ते एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येईल.


S.Kane/S.Chitnis/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2040373) Visitor Counter : 69