आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशात तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोमची एकूण 148 प्रकरणे नोंदवली गेली असून त्यात गुजरात मधील 140 जणांचा समावेश आहे. लागण झालेल्यांपैकी 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे; 51 प्रकरणांमध्ये चांदीपुरा विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.
Posted On:
01 AUG 2024 10:37AM by PIB Mumbai
यावर्षी जून 2024 च्या सुरुवातीपासून गुजरातमध्ये 15 वर्षांच्या खालील बालकांमध्ये तीव्र स्वरुपाच्या एन्सेफलायटीस सिंड्रोमची (एईएस) लागण झाल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 31 जुलै 2024 रोजी 148 एईएस प्रकरणे (गुजरातमधील 24 जिल्ह्यांतील 140, मध्य प्रदेशातील 4, राजस्थानमधील 3 आणि महाराष्ट्रातील 1 रुग्ण) आढळून आली आहेत. लागण झालेल्यांपैकी 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे; तर 51 प्रकरणांमध्ये चांदीपुरा विषाणूची (सीएचपीव्ही )लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.
आरोग्य सेवा महासंचालक आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे (ICMR) च्या महासंचालकांनी आज संयुक्तपणे या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला मध्य प्रदेशच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक, एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्पाचे (IDSP) विभाग आणि राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालये, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमधील राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथकाचे सदस्य, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि त्यातील प्राध्यापकवर्ग, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय वेक्टर जनित रोग नियंत्रण कार्यक्रमातील प्राध्यापक सहभागी झाले होते.
19 जुलै 2024 पासून एईएसच्या दररोज नोंद केल्या जाणाऱ्या नवीन प्रकरणांमध्ये घट होत असल्याचे दिसून येत आहे. गुजरात सरकारने वेक्टर नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणी, माहिती, शिक्षण आणि संप्रेषण धोरण, वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि यासाठी उभारलेल्या आरोग्यकेंद्रांकडे प्रकरणे वेळेवर पाठवणे यासारख्या सार्वजनिक आरोग्याच्या विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
गुजरात सरकारला सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना करण्याच्या कार्यात आणि या उद्रेकाची महामारीच्या अनुषंगाने तपासणी करण्यासाठी मदत करण्यासाठी राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथक (NJORT) तैनात करण्यात आले आहे. याशिवाय गुजरातच्या शेजारील राज्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि राष्ट्रीय कीटकजनित रोग नियंत्रण कार्यक्रम यांच्याकडून एईएस प्रकरणांचा अहवाल देणारे संयुक्त सल्लागार पत्रक देखील जारी केले जात आहे.
पार्श्वभूमी:
चांदीपुरा विषाणू (सीएचपीव्ही ) हा रैबडोविरिडे कुळातील एक सदस्य आहे ज्यामुळे देशाच्या पश्चिम, मध्य आणि दक्षिण भागात, विशेषतः पावसाळ्यात तुरळक घटना आणि उद्रेक होतो. वाळूवरील माश्या आणि इतर रोग-वाहक कीटकांद्वारे त्याचा प्रसार होतो. या आजारापासून बचाव करण्यासाठी वेक्टर-बोर्न /कीटक जनित रोग नियंत्रण, स्वच्छता आणि जागरूकता हे एकमेव उपलब्ध उपाय आहेत. या रोगाचा संसर्ग प्रामुख्याने 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये होतो आणि संसर्गामुळे आकडी , कोमा अर्थात बेशुद्धीची स्थिती उद्भवणे तसेच ताप देखील येऊ शकतो, ज्यामुळे काही प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो. 'सीएचपीव्ही' साठी कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नसले तरीही त्याचे उपचार केवळ लक्षणात्मक आहेत, परंतु एईएसमुळे बाधित रुग्णांना वेळेवर नियुक्त आरोग्य केंद्रांमध्ये पाठवले गेले तर ते त्यातून बरे होऊ शकतात.
***
JPS/Bhakti/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2040100)
Visitor Counter : 96