संरक्षण मंत्रालय

लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर बनल्या लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिल्या महिला महासंचालक

Posted On: 01 AUG 2024 10:35AM by PIB Mumbai

लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांनी 1 ऑगस्ट 2024, रोजी लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या 'महासंचालक ' म्हणून पदभार स्वीकारला. या प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्ती झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. यापूर्वी एअर मार्शल पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर हॉस्पिटल सर्व्हिसेस मध्ये (सशस्त्र दल) महासंचालक पदावर कार्य करणाऱ्या देखील त्या पहिल्या महिला होत्या.

 

लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांनी पुण्याच्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयातून विशेष प्राविण्यासह पदवी प्राप्त केली. त्यानंतर डिसेंबर 1985 मध्ये त्या भारतीय हवाई दलाच्या सेवेत रुजू झाल्या. या व्यतिरिक्त त्यांनी फॅमिली मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असून माता - बाल आरोग्य आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनामध्ये पदविका प्राप्त केली आहे. तर नवी दिल्ली येथील एम्स मध्ये वैद्यकीय माहितीशास्त्र या विषयात 2 वर्षांचा प्रशिक्षण कार्यक्रमही पूर्ण केला आहे. याशिवाय त्यांनी इस्रायली संरक्षण दलांसोबत रासायनिक - जैविक - रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लियर युद्ध आणि स्वित्झर्लंडमधील स्पीझ येथे स्विस सशस्त्र दलांसह लष्करी वैद्यकीय नीतिशास्त्राचा अभ्यास केला आहे. भारतीय वायुसेनेच्या (IAF) वेस्टर्न एअर कमांड आणि ट्रेनिंग कमांडच्या  पहिल्या महिला प्रधान वैद्यकीय अधिकारी होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणामधील वैद्यकीय शिक्षण या विषयातील मसुदा लेखनासाठी लेफ्टनंट जनरल नायर यांचे डॉ कस्तुरीरंगन समितीमध्ये तज्ञ सदस्य म्हणून नामांकन करण्यात आले होते. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न एअर कमांड आणि चीफ ऑफ द एअर स्टाफ कमंडेशन्स तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.

***

JPS/Bhakti/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2040003) Visitor Counter : 53