राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय
गुजरातमधील गांधीनगर येथे, आयोजित करण्यात आली कोलंबो सुरक्षा कॉन्क्लेव्हची "कायदे, सायबर धोरणे आणि गुन्हेगारीच्या घटना कमी करण्याबाबत माहितीची देवाणघेवाण" या विषयावरील दुसरी परिषद
Posted On:
31 JUL 2024 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जुलै 2024
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयाने राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या सहयोगाने 30-31 जुलै 2024 रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे, कोलंबो सुरक्षा कॉन्क्लेव्हची "कायदे, सायबर धोरणे आणि गुन्हेगारीच्या घटना कमी करण्याबाबत माहितीची देवाणघेवाण" या विषयावरील दुसरी परिषद आणि सायबर सुरक्षेवरील संयुक्त कार्यगटाची बैठक यशस्वीपणे आयोजित केली.
या परिषदेत कोलंबो सुरक्षा कॉन्क्लेव्हचे सदस्य आणि निरीक्षक देशांच्या प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग दिसून आला. यामध्ये बांगलादेश, भारत, मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, श्रीलंका आणि कोलंबो सुरक्षा कॉन्क्लेव्ह सचिवालयाच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
सायबर सुरक्षा, महत्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण आणि तंत्रज्ञान हे कोलंबो सुरक्षा कॉन्क्लेव्हचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत. हा आधारस्तंभ महत्वाच्या पायाभूत सुविधा, सायबर गुन्हे, गुन्हेगारीच्या घटनेला प्रतिसाद आणि त्याचे निराकरण तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या संरक्षणावर अधिक सहयोगी आणि एकसंध दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देतो.
या परिषदेच्या माध्यमातून कोलंबो सुरक्षा कॉन्क्लेव्हचे सदस्य आणि निरीक्षक देशांमध्ये सायबर सुरक्षा धोरणे आणि कूटनीती, गुन्हेगारीच्या घटनांना प्रतिसाद आणि निराकरण, सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी डिजिटल न्यायवैद्यक तपासणी आणि सायबर धोक्यांबाबतची गुप्तचर यंत्रणा या विषयांवरील देवाणघेवाण सुरू झाली.
सायबरस्पेस अधिक सुरक्षित आणि लवचिक बनवण्यासाठी तंत्रज्ञानाची प्रगती, संशोधानापुढील आव्हाने आणि नवोन्मेशी दृष्टीकोन, या मुद्द्यांवर चर्चेचा भर राहिला. सहभागींनी सायबर सुरक्षा धोक्यांचे व्यवस्थापन करण्यामधील अनुभवांचे आदान-प्रदान केले, तसेच सायबर सुरक्षा परिप्रेक्षातील विशिष्ट आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी सहकार्य करण्याचा विचार मांडला.
कोलंबो सुरक्षा कॉन्क्लेव्ह अंतर्गत प्रादेशिक सुरक्षेला बळ देण्यासाठी आणि सामायिक हितसंबंध जपण्यासाठी सायबर सुरक्षा उपायांना बळकटी देण्याची वचनबद्धता दृढ करण्यावर, त्यासाठी अधिक व्यावहारिक दृष्टिकोन आत्मसात करण्यावर, तसेच सामायिक कृती निश्चित करण्यावरील एकमताने या परिषदेचा समारोप झाला.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2039916)
Visitor Counter : 58