पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
पर्यावरण-स्नेही जीवनशैलीशी संबंधित वर्तणूक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने उपयुक्त उत्पादने आणि सेवांशी संबंधित कल्पना आमंत्रित करण्यासाठीच्या आयडियाज4लाइफ पोर्टलचा केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते प्रारंभ
निसर्ग रक्षणासाठी तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी त्याचे जतन करण्यासाठी शाश्वत उपभोगाच्या कल्पनेवर केंद्रीय मंत्री यादव यांनी दिला भर
Posted On:
29 JUL 2024 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जुलै 2024
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज दिल्ली येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत आयोजित कार्यक्रमात, केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांच्या उपस्थितीत आयडियाज4लाइफ या मंचाच्या कार्याची सुरुवात केली. पर्यावरण-स्नेही जीवनशैलीशी संबंधित वर्तणूक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने उपयुक्त उत्पादने आणि सेवांशी संबंधित कल्पना आमंत्रित करण्यासाठी हा मंच सुरु करण्यात आला आहे.उपलब्ध साधनसंपत्तीचा सजग आणि विचारपूर्वक वापर करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली कल्पना प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने वाटचाल करत विद्यार्थी, संशोधक विद्वान,शिक्षक तसेच नाविन्यपूर्ण संशोधन करणारे संशोधक यांच्या फळीने अभिनव आणि चौकटीबाहेरील कल्पना आणाव्यात असे आवाहन केंद्रीय मंत्री यादव यांनी केले.
आयडियाज4लाइफ या मंचाच्या शुभारंभ कार्यक्रमात उपस्थित सहभागी तसेच विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना ते म्हणाले की, विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच संशोधक, विद्वान यांनी लाईफ अभियानाच्या जागतिक उपक्रमात त्यांच्या अभिनव कल्पनांचे योगदान द्यावे म्हणून त्यांना प्रोत्साहित आणि प्रेरित करणे हा आयडियाज4लाइफ या मंचाची सुरुवात करण्यामागचा उद्देश आहे.
लाईफ अभियानाचे महत्त्व अधोरेखित करत केंद्रीय मंत्री म्हणाले की निसर्गाकडून आपल्याला सर्व प्रकारच्या मुलभूत गोष्टी मिळतात आणि त्या अत्यंत शुध्द स्वरुपात असतात मात्र परतफेड करताना आपण निसर्गाला अशुद्ध गोष्टी देत राहतो. ते म्हणाले की आता आत्मपरीक्षण करण्याची आणि निसर्गाचे रक्षण करून पुढील पिढ्यांसाठी तो टिकवून ठेवण्यात मदत करण्याची वेळ आली आहे. निसर्ग आपल्या जगण्यासाठी आपल्याला अन्न, तेल, उर्जा आणि औषधे यांचा पुरवठा करत असतो. आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट जर निसर्गाकडून मिळत असेल तर या निसर्गाचे जतन करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे असे ते पुढे म्हणाले.
केंद्रीय मंत्री म्हणाले की,आता आयडियाज4लाइफ सारख्या उपक्रमाची गरज निर्माण झाली आहे आणि हा उपक्रम यशस्वी करणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे. सर्व साधनसंपत्तीचा सजग आणि विचारपूर्वक वापर निसर्गाचे जतन करण्यात आपल्याला मदत करेल असे त्यांनी पुढे सांगितले.
‘Ideas4Life.nic.in’ हे पोर्टल सहभागींना त्यांच्या कल्पना यासेच नवोन्मेष ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2038793)
Visitor Counter : 62