संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एमएसएमई ना भांडवली बाजारात प्रवेश सुलभ करण्यासाठी संरक्षण मंत्रालय आणि एनएसई यांच्यात सामंजस्य करार

Posted On: 29 JUL 2024 9:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जुलै 2024


सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांचा (एमएसएमई ) भांडवली बाजारात  प्रवेश सुलभ करण्यासाठी संरक्षण मंत्रालय आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई ) यांनी 29 जुलै 2024 रोजी एका  सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारावर संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्या उपस्थितीत संरक्षण उत्पादन विभागाचे अतिरिक्त सचिव आणि एनएसई चे व्यवस्थापकीय संचालक यांनी स्वाक्षरी केली. संरक्षण क्षेत्रातील एमएसएमईंना एनएसई प्लॅटफॉर्म ‘एनएसई इमर्ज’ च्या माध्यमातून कार्यक्षम आणि पारदर्शक पद्धतीने त्यांच्या विकास योजनेसाठी भांडवल उभारण्यासाठी  सुविधा पुरवणे हा या सामंजस्य कराराचा हेतू आहे. एनएसई प्लॅटफॉर्म विविध गुंतवणूकदारांकडून इक्विटी भांडवल उभारण्यासाठी नवीन आणि व्यवहार्य पर्याय उपलब्ध करून देतो.

हा सामंजस्य करार पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल.या कालावधीत एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर निधी उभारणीसाठी संरक्षण मंत्रालयासोबत काम करणाऱ्या उद्योगांना मार्गदर्शन करण्यासाठी संरक्षण उत्पादन विभाग आणि एनएसई चर्चासत्रे, एमएसएमई शिबिरे, ज्ञान सत्रे, रोड शो आणि कार्यशाळांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबवतील. एमएसएमई ना मर्चंट बँकर्स, रजिस्ट्रार, ट्रान्सफर एजंट, डिपॉझिटरीज सारख्या मध्यस्थांशी जोडण्यात एनएसई मदत करेल आणि त्यांना भांडवली बाजार, भांडवल उभारणारी  यंत्रणा आणि नियामक अनुपालन आणि आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करेल.हा सामंजस्य करार एमएसएमई आणि संरक्षण क्षेत्रातील उदयोन्मुख कंपन्यांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यात , नवीन बाजारपेठा शोधण्यात आणि त्यांच्या संशोधन आणि विकास उपक्रमांना निधी पुरवण्यासाठी मदत करेल.


N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2038790)