सांस्कृतिक मंत्रालय
जागतिक वारसा समितीचे प्रतिनिधी आणि सदस्य यांनी, दिल्ली आणि आसपासची ठिकाणे, तसेच जागतिक वारसा स्थळांना दिली भेट
Posted On:
28 JUL 2024 8:30PM by PIB Mumbai
जागतिक वारसा समितीच्या प्रतिनिधींनी आणि सदस्यांनी आज दिल्ली आणि आसपासची ठिकाणे, तसेच जागतिक वारसा स्थळांना भेट दिली. 21 जुलै 2024 पासून 7 दिवस जागतिक वारसा विषयांवर चर्चा केल्यानंतर आज रविवारी सुट्टीच्या दिवशी त्यांनी खरेदी, भारतीय खाद्यपदार्थ आणि इतर बऱ्याच बाबींचा मनसोक्त आनंद लुटला. खूप विचारविनिमयाअंती, जागतिक वारसा समितीने 26 आणि 27 जुलै 2024 रोजी 25 नवीन जागतिक वारसा स्थळे घोषित करत त्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला.
भारत प्रथमच जागतिक वारसा समितीची बैठक आयोजित करत असून, ही बैठक 21 ते 31 जुलै 2024 दरम्यान नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे होत आहे. जागतिक वारसा समितीची बैठक वर्षातून एकदा होते. जागतिक वारसा विषयक सर्व बाबींचे व्यवस्थापन करण्याची आणि जागतिक वारसा यादीत समाविष्ट करायच्या स्थळांबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी, या जागतिक वारसा समितीची तसेच तिच्या बैठकीची असते. 150 हून अधिक देशांतील 2000 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले आहेत.
या प्रतिनिधींना एक दिवस सुट्टी हवी असून त्यांना भारताचा वारसा मनसोक्त अनुभवायचा आहे अशी विनंती समितीच्या काही सदस्यांनी केल्यानंतर, तशी घोषणा करण्यात आली.
या प्रतिनिधींचा भारतातील मुक्काम संस्मरणीय बनवण्यासाठी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जागतिक वारसा समितीच्या 46 व्या बैठकीतील प्रतिनिधींसाठी दिल्ली आणि परिसरात वसलेली विविध ठिकाणे-स्मारके, तसेच जागतिक वारसा स्थळांना भेटी देण्याची सोय केली. या भेटीत प्रतिनिधींना आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी, या सुट्टीचे प्रयोजन करण्यात आले. या प्रतिनिधींना स्थानिक प्रदेश धुंडाळण्याची आणि या प्रदेशाचा सांस्कृतिक वारसा अनुभवण्याची संधी प्रदान करण्यात आली.
त्यांच्या या भेटीदरम्यान, या स्थळांचे सांस्कृतिक आणि नैसर्गिक महत्त्व पाहून हे प्रतिनिधी प्रभावित झाले आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या संवर्धनाच्या प्रयत्नांची वाखाणणी करत त्यांनी पोचपावती दिली. या स्थळांची साधनशुचिता आणि अस्सलपणा जपण्यासाठी झोकून देत करत असलेल्या कामाबद्दल, त्यांनी या स्थळांच्या व्यवस्थापकीय चमूचे कौतुक केले.
आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक आश्चर्ये भविष्यातील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या भारताच्या बांधिलकीची, त्यांचा हा दौरा साक्ष देतो.
आग्रा किल्ला आणि फतेहपूर सिक्री स्मारकांचा समूह या आग्रा येथील इतर दोन जागतिक वारसा स्थळांव्यतिरिक्त, अनेक प्रतिनिधींनी आग्रा या ऐतिहासिक शहराला भेट देणेही पसंत केले. इथे त्यांनी ताजमहाल या कालातीत जागतिक आश्चर्याचा मनमुराद आनंद लुटत, या वास्तुची प्रशंसा केली.
आग्रा येथील ताजमहालला भेट देणारे युनेस्कोचे प्रतिनिधी मंडळ
प्रतिनिधी मंडळाने आग्रा किल्ल्याला भेट दिली आणि या किल्ल्याचे वास्तुशास्त्र आणि सौंदर्याची प्रशंसा केली.
आणखी बऱ्याच प्रतिनिधींनी दिल्लीतील स्थळे- स्मारकांचा आनंद घेणे पसंत केले. यात शहरातील, हुमायूंचा मकबरा, कुतुब मिनार स्मारकांचा समूह आणि लाल किल्ला या तीन जागतिक वारसा स्थळांचा समावेश आहे. याशिवाय काही प्रतिनिधींनी सफदरजंग मकबरा आणि दिल्लीच्या जुन्या पाऊलखुणांना भेट दिली.
जागतिक वारसा केंद्राचे संचालक लाझारे एलौंडौ एसोमो यांनी कुतुबमिनार आणि तेथील स्मारके येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग-ASI ने केलेल्या कामांना भेट दिली आणि त्यांचे कौतुक केले.
46 व्या जागतिक वारसा समितीचे अध्यक्ष विशाल व्ही. शर्मा यांनी लाल किल्ला आणि तेथील संग्रहालयांना भेट दिली.
हुमायूनची कबर या जागतिक वारसा स्थळावर आपल्या सुट्टीचा आनंद लुटणारे प्रतिनिधी
नवी दिल्ली येथील सफदरजंग कबरीला भेट देणारे प्रतिनिधी
काही प्रतिनिधींनी अभानेरी येथील चांद बाओरी (बावडी) लाही भेट दिली
***
S.Patil/A.Save/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2038185)
Visitor Counter : 153