आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रस्त्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या 1000 विक्रेत्यांसाठी एफएसएसएआय’च्या प्रशिक्षण आणि जागरुकता कार्यक्रमाचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या उपस्थितीत भूषवले अध्यक्षपद

Posted On: 20 JUL 2024 6:09PM by PIB Mumbai

 

रस्त्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या 1000 विक्रेत्यांसाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) नवी दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित केलेल्या प्रशिक्षण आणि जागरुकता कार्यक्रमाचे अध्यक्षपद केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी भूषवले.  आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यादेखील यावेळी उपस्थित होत्या.

भारतात रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे महत्त्व अधोरेखित करत नड्डा यांनी, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी 100 रुपये नोंदणी शुल्क रद्द करण्याचे निर्देश एफएसएसएआयला दिले. अधिकाधिक फेरीवाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जास्तीत जास्त नोंदणी करून घेण्यासाठी एफएसएसएआयने रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी 100 रुपये नोंदणी शुल्क रद्द करावे, असे ते म्हणाले.

अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण (FoSTaC) प्रशिक्षणाला उपस्थित राहणाऱ्या सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नावीन्यपूर्ण स्ट्रीट सेफ रॅपिड टेस्टिंग किट उपलब्ध करून दिले जावेत, जेणेकरून देशभरातील खादयपदार्थ विक्रेते फेरीवाल्यांकडून सुरक्षित अन्नपदार्थांचा वापर होत असल्याचे सुनिश्चित होईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रशिक्षण आणि पुनर्अभिमुखता अशा दोन्ही प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या महत्त्वावर भर दिला. आपल्या व्यवसायाचा आणखी विस्तार करण्यासाठी पीएम स्ट्रीट व्हेन्डर आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी खाद्यपदार्थ विक्रेत्या फेरीवाल्यांना केले. त्याशिवाय देशातील 100 जिल्ह्यात 100 स्ट्रीट फूड स्ट्रीट्स बांधण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेला देखील त्यांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी, हे खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या योग्य आणि अयोग्य कृतींची माहिती असलेल्या आदर्श परिचालन प्रणालीचा देखील प्रारंभ केला. त्यांनी रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी, एका समर्पित पोर्टलचे देखील उद्घाटन केले, ज्यावर त्यांना आपल्या यशोगाथा आणि खाद्य सुरक्षेच्या स्रोतांची उपलब्धता सामाईक करता येईल.

केंद्रीय मंत्र्यांनी रस्त्यावरच तेल आणि दूध यांसारख्या घटकांची चाचणी करण्याची सोय असलेल्या फूड सेफ्टी ऑन व्हील्स या एफएसएसएआयच्या वाहनाची देखील पाहणी केली.

***

M.Pange/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2034723) Visitor Counter : 82