खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते हैदराबाद येथे खनिज उत्खनन हॅकेथॉनचे आणि राष्ट्रीय डीएमएफ पोर्टलचे उद्घाटन

Posted On: 20 JUL 2024 4:47PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री जी किशन रेड्डी यांनी आज हैदराबाद येथे नवोन्मेषी खनिज शोध तंत्रांवर भर देणाऱ्या खनिज उत्खनन हॅकेथॉनचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्यासह खाण मंत्रालयातील मान्यवर, राज्य सरकारचे अधिकारी, सरकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि उद्योग प्रतिनिधीही उपस्थित होते.

भू-भौतिकीय माहिती, बेसलाइन डेटा, उपलब्ध अन्वेषण डेटा अशा खनिज अन्वेषणविषयक माहिती संचांचे एकत्रीकरण करण्यासाठी, विशेषत: खोलवर असलेली खनिजे /दगडातील अशुद्ध धातूमध्ये लपलेली खनिजे शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र प्रशिक्षणासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देणे, हे या हॅकेथॉनचे उद्दिष्ट आहे.

ग्लिम्प्स ऑफ जिऑलॉजी अँड मिनरल रिसोर्सेस, तेलंगणाआणि मिनरल्स इन तेलंगणा स्पॉटलाइट्सया दोन पुस्तिकांचे प्रकाशनही त्यांनी केले. तेलंगणा राज्याची भूवैज्ञानिक रचना आणि खनिज क्षमता याविषयीच्या माहितीवर या पुस्तकांमध्ये भर दिला आहे.

प्रमुख आणि धोरणात्मक खनिज मिनरल ब्लॉक्सच्या ई-लिलावाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील 8 प्राधान्याने निवडलेल्या बोलीदारांना त्यांनी प्रमाणपत्रेही प्रदान केली.

नॅशनल डिस्ट्रिक्ट मिनरल फाऊंडेशन (डीएमएफ) पोर्टलचे उद्घाटनही रेड्डी यांनी या कार्यक्रमादरम्यान केले. देशभरातील जिल्हा खनिज प्रतिष्ठानांची माहिती एकत्रित करण्यासाठी हे पोर्टल मध्यवर्ती व्यासपीठ आहे. या पोर्टलमुळे डीएमएफ विषयक माहिती सहजपणे उपलब्ध होईल. त्याचबरोबर त्याअंतर्गत होणारी कामे आणि त्याच्या वापराचा मागोवाही घेता येणार आहे. या  पोर्टलमुळे पारदर्शकता वाढणार असून देशातील 645 डीएमएफचे तपशील मिळणार आहेत. केंद्रीकृत कामकाज, प्रकल्प निरीक्षण आणि गतिमान विश्लेषणे, तसेच प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वोत्तम पद्धती ही या पोर्टलची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

***

M.Pange/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2034664) Visitor Counter : 72