उपराष्ट्रपती कार्यालय

हवामान बदल हा कधीही स्फोट होऊ शकणारा टाईम बॉम्ब आहे, मानवजातीच्या अस्तित्वावरचे संकट आहे: उपराष्ट्रपतींचा इशारा


आकस्मिकपणे येणाऱ्या संकटांसाठी आपल्याकडे पर्यायी योजना नाही, आपल्याकडे केवळ एकच पृथ्वी ग्रह आहे – उपराष्ट्रपती

“एक पेड माँ के नाम” हे केवळ भावनात्मक आवाहन नव्हे तर ते एक क्रांतिकारी पाऊल आहे – उपराष्ट्रपती

Posted On: 19 JUL 2024 8:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जुलै 2024

हवामान बदल हा कधीही स्फोट होऊ शकणारा  टाईम बॉम्ब आहे आणि मानवजातीच्या अस्तित्वावरचे  हे संकट आहे असा सावधगिरीचा इशारा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला आहे. “पूर्वीच्या काळी हिरवागार स्वर्गासमान असलेल्या आपल्या ग्रहावर आता भूतकाळाची सावली देखील राहिलेली नाही.नैसर्गिक साधनसंपत्तीचे बेपर्वाईने केलेले शोषण आणि जंगलतोड या कारणांमुळे हवामानात झालेल्या बदलाच्या कारणाने आपला ग्रह आता मोठ्या आपत्तीच्या टोकावर उभा आहे,” ते म्हणाले. मानव जमात  कडेलोटाच्या टोकावर उभी आहे असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

“जैविक उर्जा: विकसित भारताकडे नेणारा मार्ग” या विषयावर आज नवी दिल्ली येथे आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय हवामानविषयक शिखर परिषदेच्या समारोप सत्रात बीजभाषण करताना उपराष्ट्रपती बोलत होते. ते म्हणाले की “आकस्मिकपणे येणाऱ्या संकटांसाठी आपल्याकडे पर्यायी योजना नाही, पृथ्वीशिवाय दुसरा कोणताही ग्रह नाही आणि म्हणून आपल्या ग्रहाचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे.”

प्रदीर्घ काळ पडणारा दुष्काळ, तीव्रतेने पसरणारे वणवे आणि अभूतपूर्व स्वरुपाची चक्रीवादळे अशासारखे हवामान बदलाचे विनाशकारी प्रकटीकरण अधोरेखित करत उपराष्ट्रपती धनखड यांनी ठामपणे सांगितले की “असे बदल केवळ असुरक्षित लोकसंख्येला धोक्यात टाकत नाहीत तर ते जैवविविधता आणि अन्न सुरक्षा यांच्यासाठी देखील धोका  निर्माण करतात आणि आपली नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच कृषी प्रणाली यांच्यावर लक्षणीय प्रमाणात ताण आणतात आणि त्यायोगे सामुदायिक  शक्तीपाताला कारणीभूत ठरतात.”  

आपल्या जुन्या मूल्यांचा संदर्भ देत,“निसर्गासोबत सुसंवादी सह अस्तित्व आणि आपल्या पर्यावरणाप्रती मनापासून आदर बाळगणे हे भारताच्या नागरी संस्कृतीच्या मूल्यांचे आंतरिक पैलू आहेत” याकडे उपराष्ट्रपतींनी निर्देश केला.

हवामानाप्रती न्याय्य वर्तणुकीवर भर देऊन उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले की हवामान बदलाचे संकट दुर्लक्षित तसेच असुरक्षित समुदायांना व्यस्त प्रमाणात प्रभावित करत असताना हवामानाप्रती न्याय्य वर्तणुक हा आपला मार्गदर्शक ध्रुव तारा असला पाहिजे.

हवामान बदलाच्या परिणामांची  सर्व सीमा ओलांडून सर्वत्र पुनरावृत्ती होत आहे हे सत्य अधोरेखित करत, उपराष्ट्रपती धनखड यांनी सर्व देशांची सरकारे, कॉर्पोरेट विश्वातील प्रमुख नेते आणि सर्वच लोकांसह सगळ्या हितसंबंधीयांना या संकटाचा सामना करण्यासाठी  सामुदायिक कृती करण्याचा आग्रह व्यक्त केला.

‘एक पेड माँ के नाम’ या अभियानात असलेल्या क्रांतिकारक क्षमतेची नोंद घेत ते म्हणाले की हे केवळ भावनात्मक आवाहन किंवा घोषणा नव्हे तर ते एक क्रांतिकारी पाऊल आहे. या उपक्रमामुळे दर वर्षी 1.4 अब्ज लोक प्रत्येकी एक झाड लावतील. याचा फार मोठा सकारात्मक आणि चढत्या भाजणीत वाढणारा प्रभाव पडेल. तो आपल्याला आपल्या अस्तित्वावरील संकटाशी लढण्यात मदत करेल, ही अशी समस्या आहे जी आपणच नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण आणि जंगलतोड करून स्वतःच निर्माण केली आहे,”

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा: 

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2034384
 
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2034488) Visitor Counter : 34


Read this release in: Urdu , English , Hindi , Tamil