सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संस्कृती मंत्रालयाने 46व्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीसाठी सुरू केला पीएआरआय प्रकल्प


देशाच्या चैतन्यमयी सांस्कृतिक रचनेत योगदान देण्यासाठी संवाद, चिंतन आणि प्रेरणा जगवणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट

आगामी कार्यक्रमासाठी सार्वजनिक जागांच्या सुशोभीकरणासाठी देशभरातील 150 हून अधिक व्हिज्युअल कलाकारांची राष्ट्रीय राजधानीतील विविध स्थळांवर कलाकुसर

Posted On: 06 JUL 2024 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जुलै 2024


 

भारत दीर्घकाळापासून कलात्मक अभिव्यक्तीचे चैतन्यमयी केंद्र राहिले आहे. भारताला सार्वजनिक कलेचा इतिहास असून यातून देशाची सांस्कृतिक आणि अध्यात्मिक विविधता प्रतिबिंबित होते. प्राचीन शैलशिल्प मंदिरे आणि कलात्मक भित्तीचित्रांपासून ते भव्य सार्वजनिक शिल्प आणि गतिशील पथकलांपर्यंत भारतात  कलात्मक आश्चर्यांची रेलचेल दिसून येते.  ऐतिहासिकदृष्ट्या, कला ही दैनंदिन जीवन, धार्मिक प्रथा आणि सामाजिक चालीरीतींशी खोलवर गुंफलेली आहे, नृत्य, संगीत, नाट्य आणि दृश्य कला यासारख्या विविध माध्यमातून ती  प्रकट होते.

संस्कृती मंत्रालयाचा पीएआरआय प्रकल्प (भारताची सार्वजनिक कला ) ललित कला अकादमी आणि राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाद्वारे राबवला जात आहे. आधुनिक संकल्पना आणि तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करतानाच हजारो वर्षांच्या कलात्मक वारशातून (लोक कला/लोकसंस्कृती) प्रेरणा घेणारी सार्वजनिक कला पुढे आणण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून करण्यात येणार  आहे. भारतीय समाजातील कला जी आंतरिक मूल्ये धारण करते, ती या अभिव्यक्तींमधून अधोरेखित होते. सर्जनशीलता आणि कलात्मक अभिव्यक्तीप्रती भारताच्या  चिरस्थायी  वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे.

प्रकल्प पीएआरआय अंतर्गत पहिला उपक्रम दिल्लीत होत आहे. नवी दिल्ली येथे 21-31 जुलै 2024 दरम्यान  आयोजित जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्रासोबत हा उपक्रम जुळून येत आहे.

देशाचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा प्रतिबिंबित करणाऱ्या कलेचे सार्वजनिक ठिकाणी दर्शन महत्त्वपूर्ण आहे. सार्वजनिक प्रतिष्ठनांच्या माध्यमातून कलेचे लोकशाहीकरण शहरातल्या ठिकाणांचे रूपांतर सहज दृष्टीपथात येणाऱ्या कलादालनांमध्ये रूपांतरित करते. यामुळे संग्रहालये आणि कलादालनांच्या पारंपरिक ठिकाणांच्या मर्यादा ओलांडून कला पुढे जाते. रस्ते, उद्याने, पारगमन केंद्रे यांच्याशी कला जोडून, कलात्मक अनुभव प्रत्येकासाठी उपलब्ध असल्याची सुनिश्चिती असे उपक्रम करतात. हा सर्वसमावेशक दृष्टीकोन सामायिक सांस्कृतिक ओळख वृद्धिंगत  करतो  आणि सामाजिक एकसंधता वाढवतो, नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात कलेशी संलग्न होण्यासाठी प्रोत्साहित  करतो. पीएआरआय प्रकल्पाचा उद्देश संवाद, चिंतन  आणि प्रेरणा जागवून  राष्ट्राच्या चैतन्यमयी  सांस्कृतिक रचनेत योगदान देणे आहे.

देशभरातील 150 हून अधिक व्हिज्युअल आर्टिस्ट या प्रकल्पांतर्गत तयार होणारी विविध  भित्तिचित्रे, शिल्पे आणि कलाकुसर करण्यासाठी येथे एकत्र  आले आहेत. क्रिएटिव्ह कॅनव्हासमध्ये फड चित्रे  (राजस्थान), थंगका चित्रे  (सिक्कीम/लडाख), मिनिएचर पेंटिंग  (हिमाचल प्रदेश), गोंड कला (मध्य प्रदेश), तंजोर चित्रकला तामिळनाडू), कलमकारी (आंध्र प्रदेश), अल्पना  कला (पश्चिम बंगाल), चेरियल चित्रकला   (तेलंगणा), पिछवाई चित्रे  (राजस्थान), लांजिया सौरा (ओडिशा), पट्टाचित्र (पश्चिम बंगाल), बनी ठनी चित्रे  (राजस्थान), वारली (महाराष्ट्र), पिथोरा चित्रकला (गुजरात), आयपन (उत्तराखंड), केरळ म्युरल्स (केरळ),अल्पना कला (त्रिपुरा) शैलीतून प्रेरित अशा विविध शैलीतून प्रेरित आणि/किंवा या शैलींमध्ये रेखाटलेल्या कलाकृतींचा समावेश आहे. परंतु क्रिएटिव्ह कॅनव्हास उपक्रम एवढ्यावरच मर्यादित नाही.

पीएआरआय प्रकल्पासाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रस्तावित शिल्पांमध्ये निसर्ग, नाट्यशास्त्र यापासून प्रेरित, गांधीजी, भारताची खेळणी, आदरातिथ्य, प्राचीन ज्ञान, जीवन अशा विविध संकल्पनांचा समावेश आहे. परंतु या संकल्पनांपुरताच हा प्रकल्प मर्यादित नाही.

प्रस्तावित 46 व्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीशी अनुरूप  काही कलाकृती आणि शिल्पे भीमबेटका आणि भारतातील 7 नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांपासून प्रेरणा घेतात आणि त्यांना  प्रस्तावित कलाकृतींमध्ये विशेष स्थान देण्यात आले  आहे.

पीएआरआय प्रकल्पात महिला कलाकार मोठ्या संख्येने असून त्यांचा सहभाग भारतातील नारीशक्तीचे प्रतीक आहे. या उत्सवात सहभागी व्हा. पीएआरआय प्रकल्पातील कुठल्याही  निर्मितीसह सेल्फी घ्या आणि तुमचे फोटो #ProjectPARI सह सोशल मीडियावर सामायिक करा. कलाकृतींबद्दलची अधिक माहिती लवकरच https://lalitkala.gov.in/pariproject यावर उपलब्ध होईल.  


Jaydevi PS /S.Kakade/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2034053) Visitor Counter : 63